मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले, आमचे १३ खासदार पुन्हा लढणार; शिंदेंच्या शिलेदाराचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 12:23 PM2023-11-21T12:23:35+5:302023-11-21T13:00:41+5:30

रामटेक मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

Shiv Sena MP from Ramtek constituency Kripal Tumane reaction on loksabha election 2024 seat sharing | मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले, आमचे १३ खासदार पुन्हा लढणार; शिंदेंच्या शिलेदाराचा गौप्यस्फोट

मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले, आमचे १३ खासदार पुन्हा लढणार; शिंदेंच्या शिलेदाराचा गौप्यस्फोट

मुंबई - लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र राज्यात झालेल्या मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, याबाबत अनिश्चिता आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या शिवसेनेच्या काही विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाणार असल्याचीही चर्चा रंगत असते. या पार्श्वभूमीवर रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी जागावाटपाबाबत गौप्यस्फोट केला आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तयारीला लागण्याचे आदेश दिले असून शिवसेनेचे सर्व खासदार पुन्हा निवडणूक लढवणार आहेत, असा दावा तुमाने यांनी केला आहे.

लोकसभेच्या जागावाटपावर बोलताना खासदार कृपाल तुमाने म्हणाले की, "आमचे १३ खासदार पुन्हा निवडणूक लढवणार आहेत. या सर्व उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. माझ्या निवडणूक तयारीविषयी सांगायचं झाल्यास, माझ्या मतदारसंघातील ५८ सर्कलमध्ये ५८ मेडिकल कॅम्प घेण्यात येणार आहेत. आज चौथा मेडिकल कॅम्प झाला असून फेब्रुवारीपर्यंत ५८ मेडिकल कॅम्प पूर्ण करणार आहोत. सर्वच उमेदवार आपआपल्या मतदारसंघात काम करत आहेत. मी पाच वर्ष मुंबई, दिल्लीत फार कमी असतो. कारण मी मतदारसंघात राहणं पसंत करतो आणि मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. शिवसेनेच्या सर्व १३ खासदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाला लागण्याचे निर्देश दिले असून तुम्हाला निवडणुका लढवायच्या असल्याचं सांगितलं आहे," अशी माहिती त्यांनी दिली.

तिकीट कापण्याच्या चर्चेवर काय म्हणाले कृपाल तुमाने? 

काही महिन्यांपूर्वी एक सर्व्हे करण्यात आला होता आणि त्यामध्ये निवडणुकीत काही चेहरे बदलण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या, असा प्रश्न माध्यमांकडून कृपाल तुमाने यांना विचारण्यात आला. यावर बोलताना खासदार तुमाने यांनी म्हटलं की, "हा  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विषय आहे, ते याबद्दल निर्णय घेतील. मात्र आम्ही सर्व १३ खासदार शिवसेनेकडून निवडणूक लढवणार आहोत."

दरम्यान, राज्यात महायुतीचे ४५ खासदार निवडून येतील आणि आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा भक्कम साथ देऊ, असा विश्वासही कृपाल तुमाने यांनी व्यक्त केला आहे. 

Web Title: Shiv Sena MP from Ramtek constituency Kripal Tumane reaction on loksabha election 2024 seat sharing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.