सर्वधर्म समभाव

By Admin | Published: July 26, 2015 03:02 AM2015-07-26T03:02:17+5:302015-07-26T03:02:17+5:30

बहुजनहिताय बहुजनसुखाय भागवत धर्माचा १३व्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी पाया रचला. चातुर्वर्ण्य व्यवस्थेला जोरदार शह देत संतांची वारकरी परंपरा महाराष्ट्राच्या भूमीत भक्कमपणे रुजविली.

Secularism | सर्वधर्म समभाव

सर्वधर्म समभाव

googlenewsNext

- डॉ. एस. एन. पठाण

(लेखक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूरचे माजी कुलगुरू आहेत.)

बहुजनहिताय बहुजनसुखाय भागवत धर्माचा १३व्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी पाया रचला. चातुर्वर्ण्य व्यवस्थेला जोरदार शह देत संतांची वारकरी परंपरा महाराष्ट्राच्या भूमीत भक्कमपणे रुजविली. ज्ञानदेवांना वेदापेक्षा गीता श्रेष्ठ वाटली. गीता ही कृष्णाने, एका गवळ्याने - भारतीयांचे सावळे परब्रह्म असलेल्या विठ्ठलाने अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी सांगितली होती. ज्ञानदेवांनी सर्वधर्म समभाव असलेल्या आणि अखिल मानवजातीला शिरोधार्य असलेल्या गीतेवर अत्यंत सुंदर असे काव्यभाष्य केले, भावार्थदीपिका लिहिली.

तुकाराम महाराज समाजसुधारक
समता हाच संत साहित्याचा अंतरिक प्रवाह होता आणि संतांनी यातून समाजाचे लौकिक आणि पारलौकिक सुख शोधले. म्हणूनच संत तुकाराम महाराज धर्मसुधारकापेक्षाही समाजसुधारक म्हणून अधिक महत्त्वाचे वाटतात. त्यामुळेच तर त्यांची सुफी संत अनगडशहा बाबा यांच्याशी भेट झाली. संतांनी त्या काळात सर्वधर्म समभाव निर्माण केला.

महायोगी, मानवता यात्री श्री. एम. (पूर्वाश्रमीचे मुमताज अली खान, केरळ) यांना वयाच्या २४व्या वर्षी संतश्रेष्ठ माउलींचा साक्षात्कार झाला. याची रोमहर्षक कहाणी त्यांनी स्वत: इंद्रायणी तटावरच सांगितली आणि हज्जारो वारकरी आश्चर्यचकित झाले. त्यानंतर माउलीच्या समाधीचे त्यांनी मोहन भागवत यांच्यासोबत घेतलेले दर्शन म्हणजे जणू ‘माउलीच्या मंदिरात पसायदानाचा घडलेला हा साक्षात्कारच’ म्हणावा लागेल.

संसार - परमार्थाची सांगड घालणाऱ्या आणि त्यातून भक्ती व कर्मयोग यांचा समन्वय साधणाऱ्या या तत्त्वज्ञानाचा सर्व वारकरी संतांनी स्वीकार केला. म्हणूनच ‘ज्ञानदेवे रचिला पाया’ असे आपण म्हणतो. जगासाठी पसायदान मागणाऱ्या ज्ञानदेवापासून प्रेरणा घेऊन कन्याकुमारीपासून २५०० मैलांचा पायी प्रवास करत श्री एम (पूर्वाश्रमीचे मुमताज अली खान, वय ६६) आषाढी वारीच्या वेळी आळंदीत दाखल व्हावेत हासुद्धा योगायोगच.
विश्वाच्या कल्याणाचे स्वप्न
ज्ञानेशांनी पसायदानातून संपूर्ण विश्वाच्या कल्याणाचे स्वप्न पाहिले. अद्वैत सिद्धान्तांची मांडणी करून सर्वत्र एकच असे आत्मतत्त्व संचार करते असे मांडले. हिंंदू असो अथवा इस्लाम, दोन्ही धर्मांत परमात्म्याचे अस्तित्व मान्य केले आहे. तोच विश्वाचा निर्माता आहे, हेही मान्य केले आहे. वारकरी संतांनी तर ईश्वराला ‘तूज सगुण म्हणू की निर्गुण रे? असे विचारले आहे तर समर्थांनी राम म्हणजेच आत्माराम असे समीकरण मांडले आहे. प्रार्थना करताना शरीर आणि मन निर्मळ असले पाहिजे हे हिंंदू-मुस्लिमांना मान्य आहे. अर्थात प्रत्येक धर्मात थोडे वेगळेपण असणे हे स्वाभाविक आहे. अशी सामंजस्याची व परमसहिष्णुतेची भूमिका घेतल्यामुळे हिंंदू आणि मुसलमान आपण दोघे भाऊ-भाऊच आहोत असे संतांना वाटते. नाथांचे गुरू जनार्दन स्वामी आणि त्यांचे गुरू चाँद बोधले (सुफींच्या कादरी शाखेचे चांद कादरी) होते. तर शेख महंमद यांची गुरुपरंपरा सुफींच्या कादरी शाखेची असतानाही ते वारकरी सांप्रदयाचेदेखील मानले जातात. ते विठ्ठलभक्त होते व त्यांनी विठ्ठल भक्तीवर शेकडो अभंग लिहिले. अंबर हुसेन हे मुसलमान संतकवी यांनी ‘अंबर हुसैनी’ ही गीताटीका लिहिली तर समर्थ रामदासांनी मुसलमानी अष्टंक लिहिले. हीच परंपरा संतांना अपेक्षित आहे.

Web Title: Secularism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.