राज्यातील १०५ कारखान्यांचे हंगाम बंद, ऊस गाळपात सोलापूर राज्यात प्रथम, कोल्हापूर द्वितीय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 07:27 AM2024-03-26T07:27:24+5:302024-03-26T07:27:35+5:30

पाऊस कमी पडल्याने पाण्याची अडचण असतानाही कोल्हापूर जिल्ह्यापेक्षा सोलापूरचे गाळप अधिक झाले आहे.

Season closure of 105 factories in the state, sugarcane sludging is first in the state, Solapur, second in Kolhapur | राज्यातील १०५ कारखान्यांचे हंगाम बंद, ऊस गाळपात सोलापूर राज्यात प्रथम, कोल्हापूर द्वितीय

राज्यातील १०५ कारखान्यांचे हंगाम बंद, ऊस गाळपात सोलापूर राज्यात प्रथम, कोल्हापूर द्वितीय

सोलापूर : उन्हाचा तडाखा सुरू होताच हंगाम संपवून साखर कारखान्यांचे पट्टे पडू लागले आहेत. राज्यात १०५ हून अधिक साखर कारखान्यांचे गळित हंगाम बंद झाले असून, यंदाही ऊस गाळपात सोलापूर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. पाऊस कमी पडल्याने पाण्याची अडचण असतानाही कोल्हापूर जिल्ह्यापेक्षा सोलापूरचे गाळप अधिक झाले आहे.

राज्यात यंदा पाऊस कमी पडल्याने याचा ऊस पिकावर परिणाम होईल. यामुळे गाळप हंगाम कमी होईल, असा अंदाज होता. मात्र बहुतेक साखर कारखान्यांकडे पुरेशी ऊस तोडणी यंत्रणा नसल्याने कारखाने पूर्ण क्षमतेने चालले नाहीत. त्यामुळे अनेक साखर कारखान्यांचा हंगाम लांबला आहे.

यंदा फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यानंतर साखर कारखाने बंद होण्यास सुरुवात झाली. आजअखेर शंभरहून अधिक साखर कारखान्यांचा पट्टा पडला आहे. सोलापूर जिल्ह्यात तीन-चार साखर कारखाने सुरू असून, ते मार्चपर्यंत चालतील, असे सांगण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील १०-१२ साखर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू आहेत.

 यंदा राज्यात २०७ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला. आतापर्यंत १० कोटी २३ लाख मेट्रिक टन गाळप झाले असून, १० कोटी ४० लाख क्विंटल साखर तयार झाली आहे.
 सोलापूर जिल्ह्याचे गाळप एक कोटी ५९ लाख टन झाले असून, कोल्हापूरचे एक कोटी ४८ लाख टन झाले आहे. पुणे व अहमदनगर जिल्ह्यांचे गाळप प्रत्येकी एक कोटी २२ लाख टन, तर सातारा जिल्ह्याचे गाळप एक कोटी ३ लाख मेट्रिक टन झाले आहे.

बारामती ॲग्रोचा उच्चांक 
बारामती ॲग्रोचे गाळप २२ लाख मेट्रिक टनपर्यंत गेले असून, अद्याप कारखाना सुरू आहे. दौंड शुगरचे ऊस गाळप १७ लाख ३० हजार तर विठ्ठलराव शिंदेचे गाळप १७ लाख १६ हजार मेट्रिक टन झाले आहे.

Web Title: Season closure of 105 factories in the state, sugarcane sludging is first in the state, Solapur, second in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.