पुस्तकांच्या गावात ‘कवितेचं गाणं होतांना...!’ सलील कुलकर्णी उलगडणार कवितेचा गाण्यापर्यंतचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 04:12 PM2017-12-11T16:12:28+5:302017-12-11T16:13:02+5:30

‘कवितेचं गाणं होतांना...’ या सुरेल कार्यक्रमाच्या माध्यमातून, सुप्रसिद्ध संगीतकार व गायक सलील कुलकर्णी कवितांचा गाण्यांपर्यंतचा प्रवास, पुस्तकांच्या गावात उलगडणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.

Salil Kulkarni to unveil poetry song | पुस्तकांच्या गावात ‘कवितेचं गाणं होतांना...!’ सलील कुलकर्णी उलगडणार कवितेचा गाण्यापर्यंतचा प्रवास

पुस्तकांच्या गावात ‘कवितेचं गाणं होतांना...!’ सलील कुलकर्णी उलगडणार कवितेचा गाण्यापर्यंतचा प्रवास

Next

मुंबई : ‘कवितेचं गाणं होतांना...’ या सुरेल कार्यक्रमाच्या माध्यमातून, सुप्रसिद्ध संगीतकार व गायक सलील कुलकर्णी कवितांचा गाण्यांपर्यंतचा प्रवास, पुस्तकांच्या गावात उलगडणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली. शनिवार, दि. २३ डिसेंबर, २०१७ रोजी पुस्तकांचं गाव (भिलार) येथील श्री जननीमाता मंदिराजवळील सभागृहात दु. ३.०० ते सायं. ५.३० या वेळात डॉ. सलील कुलकर्णी ही शब्द-सुरांची मैफील सादर करणार आहेत.

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, अनेक संत कवयित्री आदी संत कवींपासून ते कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, विंदा करंदीकर, सुधीर मोघे इत्यादी आधुनिक कवींपर्यंतच्या कवितांमधील लय व गेयता, कवितेचं गाण्यात होणारं अलगद रूपांतर आणि कवितेचा आशय यांबाबतचा रसास्वाद घेण्यासाठी दि. २३ डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील रसिकांनी पुस्तकांच्या गावी आवर्जून यावे, असे आवाहन विनोद तावडे यांनी केले आहे.

स्मरण विंदांचे (१६ सप्टेंबर), वाचन प्रेरणा दिन (१५ ऑक्टोबर), दिवाळी अंक प्रदर्शन व हीरक महोत्सवी दिवाळी अंकांच्या संपादकांचा गौरव (नोव्हेंबर) इत्यादी दर्जेदार कार्यक्रमांनंतर 'कवितेचं गाणं होतांना...' हा आणखी एक उत्कृष्ट कार्यक्रम पुस्तकांच्या गावी संपन्न होत आहे. सलील कुलकर्णी यांनी आत्तापर्यंत 'कवितेचं गाणं होतांना...' या संकल्पनेवर आधारीत मालिकेचे  २५ भाग वेबसीरीजच्या माध्यमातून प्रसारीत केले आहेत. या वेबसीरीजचा समारोप भिलारमध्ये होत आहे. या कार्यक्रमात कविता आणि गाण्यांचं सादरीकरण करत, सलील कुलकर्णी, त्यांनी स्वत: संगीत दिलेल्या गीतांबाबत आणि पं. हृदयनाथ मंगेशकर, श्रीधर फडके आदि संगीतकारांच्या रचनांबाबतही,रसिकांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली.

निसर्गरम्य गाव, नीरव शांतता आणि सुमारे २५००० पुस्तकं यांचा हजारो रसिक-वाचक भिलारला भेट देऊन आनंद घेत आहेत. वाचनसंस्कृती संवर्धन साधणारे आणि साहित्यिक व सांस्कृतिक जाणिवा समृद्ध करणारे, उपक्रम योजले जात आहेत. या पार्श्वभूमीवर पुस्तकांच्या गावी 'कवितेचं गाण होतांना...' हा आशयघन कार्यक्रम अनुभवण्यासाठी अवश्य यावे, असे आग्रही निमंत्रण रसिक-वाचक-पर्यटकांना देतानाच विनोद तावडे यांनी कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून पूर्वनोंदणी आवश्यक आहे, अशी माहितीही दिली.

Web Title: Salil Kulkarni to unveil poetry song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.