ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 20  - राज्यातील निवासी डॉक्टरांना होणा-या मारहाणीचा निषेध व्यक्त करण्यासाठी राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजा आंदोलन पुकारले आहे.  सायन रुग्णालयात शनिवारी रात्री सुरक्षारक्षकांसमोर रुग्णांच्या नातेवाईकांनी निवासी डॉक्टर रोहित कुमार यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणाचा विरोध दर्शवण्यासाठी मुंबईसह राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी बेमुदत बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. दरम्यान, रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून तात्काळ उपाययोजना करण्यात येत आहेत, असे आश्वासन  केईएमचे हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी दिलं आहे. 
 
दरम्यान, सायन निवासी डॉक्टर मारहाण प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली. मात्र या आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आल्याची माहिती सायन पोलिसांनी दिली. या हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यभरातील शासकीय आणि महापालिका रुग्णालयांतील ४ हजार ५०० निवासी डॉक्टरांनी रविवारी सायंकाळी आठ वाजल्यापासून मासबंक केला आहे. तर रविवारी सायंकाळी सायन रुग्णालयातही निवासी डॉक्टरांनी कँडल मार्च काढून या प्रकरणी निषेध नोंदविला. या घटनेनंतर पुन्हा एकदा राज्यभरातील निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
 
सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरवर झालेला हल्ला दुर्दैवी असून याप्रकरणी त्वरित पोलीस प्रशासनाला कळवून कार्यवाही करण्यात आली आहे. यानंतर भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी आणि डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुलेमान मर्चंट यांनी दिली.
तर दुसरीकडे, औरंगाबादमधील घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनाही मारहाण झाल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी संतप्त झालेल्या निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केले. डॉ. उमेश काकडे आणि डॉ. विवेक बडगे असे मारहाण करण्यात आलेल्या डॉक्टरांची नावं आहेत . प्लास्टर बदलण्याच्या कारणावरुन रूग्णासोबत असलेल्या चौघांनी या दोन डॉक्टरांना धक्काबुकी केली. यावेळी प्लास्टर कट करण्याच्या कटरने त्यांना मारण्याचाही प्रयत्न करण्यात आला.  
 
 
 

मुंबई : सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टर मारहाणीविरोधात निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनामुळे रूग्णांचे हाल होत आहेत. रूग्णालयाचे सर्व गेटबंद केल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.

दरम्यान, पुण्यात 250 निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर असून 145 निवासी डॉक्टर आपले कर्तव्य बजावत आहेत. यामुळे पुण्यात केवळ अत्यावश्यक शस्त्रक्रिया होणार आहे. अन्य शस्त्रक्रियेवर सामूहिक रजेचा परिणाम होत आहे.