भाजपाच्या पक्ष फोडणीला नेते बळी पडले, महाराष्ट्राच्या दृष्टीने खेदजनक; राजेश टोपेंचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 03:57 PM2024-01-04T15:57:50+5:302024-01-04T16:04:27+5:30

शरद पवारांनी नेहमी शाहू- फुले- आंबेडकर यांच्या विचारांना धरून काम केल्याचं राजेश टोपे म्हणाले.

Rajesh Tope said that Sharad Pawar always worked according to the ideas of Shahu-Phule-Ambedkar. | भाजपाच्या पक्ष फोडणीला नेते बळी पडले, महाराष्ट्राच्या दृष्टीने खेदजनक; राजेश टोपेंचं वक्तव्य

भाजपाच्या पक्ष फोडणीला नेते बळी पडले, महाराष्ट्राच्या दृष्टीने खेदजनक; राजेश टोपेंचं वक्तव्य

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डी येथे शिबिर होत आहे. आज या शिबिराचा दुसरा दिवस असून माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राजेश टोपे यांनी भाषण करत कार्यकर्त्यांना आवाहन केले. 

राजकारणातील कुठेतरी निष्ठा व नैतिकता लोप पावत असताना आजचा हा विचार फार महत्वाचा आहे. सह्याद्री कधी हिमालयापुढे झुकला नाही, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांनी आपल्याला स्वाभिमानाने जगण्याचा विचार दिला. भाजपाच्या पक्ष फोडणीला नेते बळी पडले हे महाराष्ट्राच्या अस्मितेच्या दृष्टीने अत्यंत खेदजनक बाब असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितले. 

राजकारणाच्या गढूळ वातावरणात निष्ठावान व चांगले लोक राहावेत हे मतदार बघत आहेत. निष्ठेच्या दृष्टिकोनातून आपल्या पक्षाचे महत्व वेगळे आहे, त्यामुळे आपल्याला निष्ठेची ज्योत तैवत ठेवणे आवश्यक आहे. आपल्या पक्षाच्या दृष्टीने शक्ती स्थळ व आश्वासक चेहरा हे शरद पवार आहेत व तेच या क्षेत्रातले बाप माणूस आहेत. शरद पवार एक व्यक्ती नाहीत तर ती एक विचारधारा आहे, त्यामुळे या विचारांना अनुसरून आपण आपल्या पक्षाला विजयाकडे घेऊन जायचे आहे. शरद पवारांनी नेहमी शाहू- फुले- आंबेडकर यांच्या विचारांना धरून काम केल्याचं राजेश टोपे म्हणाले.

आज आपला देश सातत्याने धार्मिक मुद्द्यांवर राजकारण करत आहे व माणसात माणूसपण ठेवत नाही आहे म्हणून 'देश गलत लोग चला रहे है' अशी परिस्थिती आहे. या विचारधरेला विरोध करण्यासाठी शरद पवार काम करत आहेत, त्यांना साथ देण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे. शरद पवारांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्याला एकत्रितपणे लढले पाहिजे. शरद पवारांचा तरुण पिढीवर विश्वास आहे व त्यांना त्यांच्यातच आपल्या पक्षाचे भविष्य दिसत आहे. शरद पवारांनी आपल्या रक्तात भिनलेल्या पुरोगामी विचारांनी राज्याला पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचं राजेश टोपेंनी सांगितले.

राज्यामध्ये नोकर भरती केली जात नाहीय- 

शरद पवारांच्या विचारांना पाईक असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. तरुणांसाठी या सरकारने काय केले? सर्व मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला जात आहेत, यासाठी गावागावातील तरुणांना जागरूक करण्याचे काम केले पाहिजे. राज्यामध्ये नोकर भरती केली जात नाही, आरोग्यसारख्या महत्वाच्या विभागामध्ये देखील नाही. जातीवाद व महागाई यांसारख्या गोष्टींवर बोलण्याची अत्यंत गरज आहे. सध्या हे लोक फार खूणशी राजकारण करत आहेत, आपल्याला संघर्ष करावे लागेल. शरद पवारांसारखे उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्या सोबत असताना आपण घाबरून जाण्याचे काम नाही, आपल्याला धाडसी वृत्ती मनामध्ये ठेवावी लागेल.

Web Title: Rajesh Tope said that Sharad Pawar always worked according to the ideas of Shahu-Phule-Ambedkar.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.