#Puneribappa : पुण्यात दगडूशेठसह मानाचे पाच बाप्पा विराजमान 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 09:14 PM2018-09-13T21:14:38+5:302018-09-13T21:14:56+5:30

गणाधीश जो ईश सर्वांगुणांचा, मुळारंभ तो आरंभ निर्गुणांचा... अशा गणाधिपती गणरायाच्या स्वागताकरिता अवघे शहर त्याच्या भक्तिरसात न्हावून निघाले.

#Puneribappa: Ganeshotsav starts at Pune | #Puneribappa : पुण्यात दगडूशेठसह मानाचे पाच बाप्पा विराजमान 

#Puneribappa : पुण्यात दगडूशेठसह मानाचे पाच बाप्पा विराजमान 

Next

पुणे : गणाधीश जो ईश सर्वांगुणांचा, मुळारंभ तो आरंभ निर्गुणांचा... अशा गणाधिपती गणरायाच्या स्वागताकरिता अवघे शहर त्याच्या भक्तिरसात न्हावून निघाले. मोरयाच्या नामाचा गजर, त्याला ढोल ताशांच्या गगनभेदी आवाजाची मिळालेली साथ, पुष्पवृष्टीचा वर्षाव, रांगोळीचे गालिचे, आकर्षक फुलांनी सजविलेले मिरवणूकीचे रथ अशा भावपूर्ण आणि चैतन्यमयी वातावरणात लाडक्या बाप्पाचे शहरात आगमन झाले. अखंड उत्साह, जल्लोष आणि आनंदात मानाच्या पाचही गणपती मोठ्या दिमाखात मखरात विराजमान झाले. त्यानंतर मुहूर्तावर त्यांची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. 

           गुरुवारी सकाळापासूनच शहरात प्रसन्न वातावरण पाहवयास मिळाले. साधारण 9 च्या दरम्यान श्रींच्या मिरवणूकांना सुरुवात झाली. यात पुण्यनगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्री कसबा गणपती मंडळाच्या मिरवणूकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शिस्तबध्दपणा, आणि मोरयाचा जप करीत फुलांची उधळण करीत या मानाच्या गणपतीची मिरवणूक बघण्याकरिता व ग्रामदैवताचे दर्शन घेण्याकरिता नागरिकांनी गर्दी के ली होती.   दुपारी 12 च्या दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली. यानंतर अभिनेते सुबोध भावे, वेदमुर्ती प्रकाश दंडगे, बास्केटबॉल संघाच्या कर्णधार शिरीन लिमये, आयुर्वेद तज्ञ डॉ.योगेश बेंडाळे यांना श्री कसबा गणपती पुरस्कार तर ज्येष्ठ विधिज्ञ अँड.भास्करराव आव्हाड यांना अँड.भाऊसाहेब निरगुडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तांबडी जोगेश्वरी या मानाच्या दुस-या गणपतीची मिरवणूकीत न्यु गंधर्व बँडपथक, शिवमुद्रा आणि ताल ही ढोलपथके सहभागी झाले होते. या ढोल पथकांच्या दणदणाटी आवाजाने वातावरण भारावून गेले होते. हे वादन ऐकण्यासाठी नागरिक दाटीवाटीने उभे होते. दुपारी 12 नंतर श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. 

            मानाच्या तिस-या श्री गुरुजी तालीम मंडळाच्या श्रींच्या मिरवणूकीच्या रथाची सजावट अतिशय सुंदररीत्या करण्यात आली होती. सुभाष सरपाले यांनी सजविलेल्या आकर्षक सजावटीत आणि गणरायाच्या जयघोषात मोठ्या भक्तिभावाने श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. गणपती चौक येथून सकाळी दहाच्या सुमारास मानाच्या चौथ्या श्री तुळशीबाग मंडळाच्या श्रींच्या मिरवणूकीला प्रारंभ झाला. श्रींच्या रथाची सुंदर सजावट जोडीला ढोल, ताशांचा गजर, तरुणाईचा जल्लोष आणि उत्साह अशा भावपूर्ण वातावरणात विपूल खटावकर यांनी साकारलेल्या काल्पनिक गणेश महालात श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. श्रीराम आणि शिवमुद्रा या ढोलताशा पथकांनी केसरीवाडा या मानाच्या पाचव्या श्रींच्या मिरवणूकीत रंगत आणली. बहारदार व जोशपूर्ण वादनाने उपस्थितांना त्यांनी ठेका धरण्यास भाग पाडले. यासोबत बिडवे बंधुचे नगारावादन पथक सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरले.  

’श्रीमंत’’ मिरवणूकीत गणराय राजेश्वर महालात  

पुष्परथातून निघालेल्या दगडूशेठ हलवाईच्या श्रींच्या मिरवणूकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या मिरवणूकीची बात काही औरच होती.  यात दिमाखदार आगमन मिरवणुकीने वाजत गाजत श्री राजराजेश्वर मंदिरात दगडूशेठ हलवाई गणपतीचे विराजमान झाले. मुख्य मंदिरापासून सकाळी ८.३० वाजता श्रीं च्या मिरवणुकीला सुरुवात झाली. तांबडी जोगेश्वरी मंदिर, अप्पा बळवंत चौक, नगरकर तालीम चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडई मार्गे उत्सव मंडपात आली. मिरवणुकीमध्ये अग्रभागी देवळणकर बंधूंचा चौघडा, गायकवाड बंधू सनई, मयूर बँड, प्रभात बँड, दरबार बँड, महिलांचे मानिनी ढोल-ताशा पथकाने सर्वांची मने जिंकुन घेतली. सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी मोरगाव येथील महान गाणपत्य श्री गणेश योगींद्राचार्यांच्या परंपरेतील डॉ.धुंडीराज पाठक शास्त्री यांच्या हस्ते विधीवत श्रींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.  

 

Web Title: #Puneribappa: Ganeshotsav starts at Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.