पुणे : विश्रांतवाडी ते संगमवाडी बीआरटी मार्ग आज बंद
By Admin | Updated: June 28, 2016 17:19 IST2016-06-28T17:19:05+5:302016-06-28T17:19:05+5:30
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा बुधवारी (दि.29) रोजी पुणे मुक्कामी दाखल होत आहे. आळंदी रस्त्याने विश्रांतवाडी ते संगमवाडी या

पुणे : विश्रांतवाडी ते संगमवाडी बीआरटी मार्ग आज बंद
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २८ - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा बुधवारी (दि.29) रोजी पुणे मुक्कामी दाखल होत आहे. आळंदी रस्त्याने विश्रांतवाडी ते संगमवाडी या मार्गावरून हा सोहळा शहरात येणार असल्याने या मार्गावरील बीआरटी सेवा दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहे. वारक-यांची सुरक्षा लक्षात घेऊन हा मार्ग बंद ठेवण्याच्या सूचना पुणे महापालिकेने पीएमपी प्रशासनास केल्या होत्या. त्यानुसार, हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पीएमपीकडून देण्यात आली. दरम्यान, पालखी पुण्यात आल्यानंतर मार्गावर येणा-या वारक-यांची संख्या लक्षात घेऊन पुढील रात्री काही फे-या करण़्यात येणार असल्याचेही पीएमपी कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मागील वर्षी पालखी सोहळयादरम्यान, हा बीआरटी मार्ग बंद होता. त्यानंतर सप्टेंबर 2015 मध्ये या मार्गाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर या मार्गावर पीएमपीचे नियमित संचलन सुरू आहे. दरम्यान, पालखी मार्गावरच बीआरटीची स्वतंत्र लेन आहे. त्यामुळे पालखी बरोबर येणारे वारकरी या लेनमधूनच पुढे संगमवाडी पर्यंत येतात. त्यामुळे या मार्गात बस सेवा सुरू ठेवल्यास अपघातांची शक्यता आहे. या शिवाय या मार्गावर वॉर्डन अथवा वाहतूक पोलिसांची नेमणूक केली तरीही अनेक ठिकाणी मार्गात जाण्यासाठी रस्ता असल्याने वारकरी मार्गात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील सर्व संचलन संपूर्ण दिवसभर बंद ठेवण्याचा निर्णय पीएमपीने घेतला आहे. पालखी सोहळा शहरात आल्यानंतर मार्गावरील गर्दीची शक्यता लक्षात घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे पीएमपीकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, पालखी कालावधीत विश्रांतवाडी मधून शहरात इतरत्र होणारे संचलन फाईव्ह नाईन चौकातून येरवडा, पुणे स्टेशन, स्वारगेट,महापालिका भवन, हडपसरसाठी सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.