जनजागृतीनेच कर्णबधिर मुलांना सामान्य शाळेत शिक्षण शक्य

By Admin | Published: September 28, 2016 02:38 AM2016-09-28T02:38:54+5:302016-09-28T02:38:54+5:30

जन्मत: कर्णबधिर असणाऱ्या मुलांचे जन्मावेळी अथवा पुढच्या एक ते दोन महिन्यांत निदान झाल्यास ही मुले सामान्य शाळेत शिक्षण घेऊन सामान्यपणे आयुष्य जगू शकतात.

Public awareness of the deaf children can be done in general school | जनजागृतीनेच कर्णबधिर मुलांना सामान्य शाळेत शिक्षण शक्य

जनजागृतीनेच कर्णबधिर मुलांना सामान्य शाळेत शिक्षण शक्य

googlenewsNext

मुंबई : जन्मत: कर्णबधिर असणाऱ्या मुलांचे जन्मावेळी अथवा पुढच्या एक ते दोन महिन्यांत निदान झाल्यास ही मुले सामान्य शाळेत शिक्षण घेऊन सामान्यपणे आयुष्य जगू शकतात. पण, जनजागृतीच्या अभावामुळे वयाच्या दोन ते अडीच वर्षांनंतर या मुलांना डॉक्टरकडे आणले जाते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होत असल्याची माहिती तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली.
मूल जन्माला आल्यावर त्यात कोणते व्यंग नाही ना, हे पाहणे अत्यंत गरजेचे असते. अजूनही आपल्याकडे अनेक ठिकाणी मुलांच्या श्रवण क्षमतेची तपासणी केली जात नाही. श्रवण क्षमता तपासणी करण्याचे तंत्रज्ञान ठरावीक रुग्णालयांतच उपलब्ध आहे. त्यामुळे अजूनही कर्णबधिरपणाविषयी म्हणावी तितकी जनजागृती झालेली दिसत नाही. त्यामुळे मूल आवाजाला प्रतिसाद देत नसले तरीही पालक याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. अनेकदा मूल साडेतीन-चार वर्षांचे झाल्यावर शाळेत जाऊ लागते. त्या वेळी त्याची श्रवण क्षमता कमी असल्याचे शिक्षकांकडून सांगितल्यावर डॉक्टरांकडे नेण्यात येते, असे कपूर रुग्णालयाच्या कान-नाक-घसा विभागाचे डॉ. समीर भार्गव यांनी सांगितले.
डॉ. भार्गव यांच्या म्हणण्यानुसार, लहान मुलांना लसीकरण करणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे तपासण्या करणे आवश्यक आहे. श्रवणक्षमतेची तपासणी केल्यास नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. मुलांवर लवकर उपचार सुरू झाल्यास त्यांच्या बोलण्याच्या क्षमतेचा विकास चांगला होतो.
नायर रुग्णालयाच्या कान-नाक-घसा विभागाचे डॉ. संजय छाब्रिया यांनी सांगितले, हजार मुलांमागे ३ ते ४ मुले ही कर्णबधिर जन्माला येतात. पण, त्यांचे निदान होण्याचे वय हे दीड ते चार वर्षे आहे. काहीच
मुलांचे वय काही महिन्यांचे असताना ते कर्णबधिर असल्याचे निदान होते. त्यानंतर त्यांच्या कानांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार सुरू केले जातात. लहानपणीच त्यांना आवाज ऐकण्याची सवय लावल्यास ते बोलूही शकतात. त्यामुळे शालेय शिक्षणासाठी ते सामान्य मुलांच्या शाळेत सहज प्रवेश घेऊन त्यांच्याबरोबर शिकू शकतात. (प्रतिनिधी)

मोठ्या आवाजाने घटतेय श्रवणक्षमता
गेल्या काही वर्षांत शहरी भागात आवाजाच्या प्रदूषणात वाढ झालेली आहे. त्यामुळे निश्चितच त्याचा श्रवणक्षमतेवर परिणाम होताना दिसत आहे. श्रवणक्षमता घटत असल्याचे तरुणांमध्ये दिसून येत आहे. ट्रॅफिक पोलिसांमध्येदेखील सतत गाड्यांचे आवाज कानावर पडत असल्यामुळे श्रवणक्षमता कमी होते.
औद्योगिक क्षेत्रात आवाजाची पातळी ८० डेसिबलपर्यंत असावी असा नियम आहे. पण, त्यापेक्षा मोठा आवाज सातत्याने होत राहिल्यास त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या कानावर होऊ शकतो. त्याचप्रमाणे ड्रमचा आवाज हा ९० ते ९५ डेसिबल इतका असतो.
सातत्याने चार तास हा आवाज कानावर पडल्यास कानांना इजा होऊ शकते. डीजेचा आवाज हा १०० डेसिबल इतका असतो. अर्धा तास हा आवाज ऐकल्यास श्रवणक्षमतेवर परिणाम होतो. मोठ्या आवाजात इअरफोनवर गाणी ऐकल्यामुळेही त्याचा परिणाम होत असल्याचे कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. संजय छाब्रिया यांनी स्पष्ट केले.

आवाजाचा अन्य अवयवांवरही परिणाम
सातत्याने मोठा आवाज कानावर पडत राहिल्यास त्याचा परिणाम फक्त श्रवणक्षमतेवर होत नाही; तर त्यामुळे रक्तदाब वाढतो. अनेकदा हृदयविकार होऊ शकतात, तर काहींच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.

Web Title: Public awareness of the deaf children can be done in general school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.