धनगर समाजाच्या मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी पनवेलमध्ये रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 05:43 AM2019-02-28T05:43:26+5:302019-02-28T05:43:36+5:30

पोलिसांची कारवाई : आरक्षणासाठी विधान भवनावर काढला मोर्चा

Police prevented Dhangar community from panval in Panvel | धनगर समाजाच्या मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी पनवेलमध्ये रोखले

धनगर समाजाच्या मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी पनवेलमध्ये रोखले

Next

पनवेल : धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी महाड चवदार तळे ते मुंबई विधानभवनावर धडकणाऱ्या हजारो मोर्चेकऱ्यांना बुधवारी नवी मुंबई पोलिसांनी पनवेलमध्ये रोखले. या मोर्चात राज्यभरातील धनगर समाजाचे बांधव मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी आले होते. मोर्चेकºयांना रोखण्यासाठी मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा मुंबई-गोवा महामार्गासह सायन-पनवेल महामार्गावर उपस्थित होता .


धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. महाड चवदार तळे येथून मानवंदना दिल्यांनतर पनवेल, कामोठेवरून आंदोलनकर्त्यांची पदयात्रा विधानभवनावर धडकणार होती. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, रायगड जिल्ह्यातून धनगर समाजाचे बांधव या वेळी उपस्थित होते. मात्र, पनवेलमध्ये आंदोलनकर्ते दाखल होताच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरु वात केली. सायंकाळी ५.१५ च्या दरम्यान आंदोलनकर्ते पळस्पे फाटा ते कळंबोली याठिकाणी दाखल झाले होते. या वेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे शासनाच्या निषेधार्थ कळंबोली सर्कल याठिकाणी काही वेळ ठिय्या मांडला. या वेळी सायन-पनवेल महामार्गावर सुमारे ३० मिनिटे वाहतूककोंडी झाली होती.


धनगर आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून शासन दरबारी पडून आहे. सध्याच्या राज्य शासनाचे शेवटचे अधिवेशन सुरू आहे. याकरिता अखेरचा लढा असल्याचे सांगत धनगर समाज विधिमंडळावर धडकणार होते. याकरिता महाड चवदार तळे सत्याग्रहाची ग्वाही देत आंदोलनकर्त्यांनी शासनाला शेवटचा दणका देण्याचा निश्चय केला होता. मात्र, हे आंदोलनकर्ते विधिमंडळावर धडकण्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी रोखल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती. या वेळी शासनाविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली . विशेष हणजे पिवळे झेंडे, मेंढरासह आंदोलनकर्ते विधिमंडळावर धडकणार होते. मात्र, पोलिसांनी कार्यकर्त्यांनाच ताब्यात घेतले. आंदोलनकर्त्यांना विविध ठिकाणाहून ताब्यात घेतल्याची माहिती परिमंडळ दोनचे उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली.

कळशांमध्ये पाणी भरत मुंबईकडे कूच
धनगर समाजाच्या महाड ते मुंबई या आरक्षण पदयात्रेस बुधवारी महाड येथील चवदार तळ्यावरून प्रारंभ झाला. महाड येथून या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नसल्याने पोलिसांनी धनगर समाजाच्या नेत्यांना महामार्गावरच रोखले. त्यानंतर काही तासांनी धनगर समाजाचे नेते आणि हजारो कार्यकर्ते आपल्या मेंढरांसह चवदार तळ्यावर दाखल झाले. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’ अशा घोषणा देत धनगर समाजाने चवदार तळ्याचा परिसर दणाणून सोडला. त्यानंतर या सर्व कार्यकर्त्यांनी चवदार तळ्याचे पाणी कळशांमध्ये भरून घेत मुंबईच्या दिशेने कूच केली.

Web Title: Police prevented Dhangar community from panval in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.