आझाद मैदानावर पॅनकार्डक्लब कंपनीच्या गुंतवणूकदारांचा आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 04:02 PM2018-10-09T16:02:31+5:302018-10-09T16:04:06+5:30

राष्ट्रशक्ती या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून राज्यातील तसेच कर्नाटक व गोवा येथील गुंतवणूकदारांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

The pessimism of the PanCardCollege company's investors at the Azad Maidan | आझाद मैदानावर पॅनकार्डक्लब कंपनीच्या गुंतवणूकदारांचा आक्रोश

आझाद मैदानावर पॅनकार्डक्लब कंपनीच्या गुंतवणूकदारांचा आक्रोश

Next

मुंबई : राज्यभरातच नव्हे तर देशभरात गाजत असलेल्या पॅनकार्ड कंपनीच्या गुंतवणूकदारांचा प्रश्न अधिकच संवेदनशील होत चाललेला असताना, राज्य किंवा केंद्र सरकार ठोस कारवाई करायला अद्यापही तयार नसल्याने, आज मुंबईच्या आझाद मैदानावर पॅनकार्ड कंपनीच्या हजारो बाधित गुंतवणूकदारांनी सरकारविरुद्ध टाहो फोडला. 


राष्ट्रशक्ती या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून राज्यातील तसेच कर्नाटक व गोवा येथील गुंतवणूकदारांचे मोठे संघटन उभे राहिले आहे. सुमारे २ वर्षे सातत्याने आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, मात्र हे सरकार ऐकायला तयार नाही. सरकारच्या संवेदना मेल्या आहेत का..? हे सरकार मृत झाले आहे का..? असा प्रश्न उपस्थित करीत पॅनकार्ड कंपनीच्या हजारो बाधित गुंतवणूकदारांनी आज मुंबईच्या आझाद मैदानावर, केंद्र व राज्य सरकारचा निषेध नोंदवत सर्वपित्रीला सरकारचे श्राद्ध घातले.


 राष्ट्रशक्ती संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत, राज्यभरातून हजारो गुंतवणूकदार आज आझाद मैदानावर जमले होते. यावेळी आंदोलनाला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने राज्याचे  प्रवक्ते नवाब मलिक यांनी उपस्थित राहून पाठींबा दिला व मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, “ज्या पद्धतीने कर्ज बुडवून पळून गेलेल्या  मोठ्या उद्योगपतींना, कर्ज दिलेल्या बँकांना शासनाने पतपुरवठा केला आणि पैसे दिले, त्याच धर्तीवर या बंद झालेल्या कंपनीच्या मिळकती सरकारने जप्त करून या छोट्या गुंतवणूकदारांचा परतावा शासनाने परत दिला पाहिजे, तसेच राष्ट्रशक्ती संघटनेच्या वतीने जो लढा उभा करण्यात आला आहे या लढ्यात सक्रीय सहभाग घेऊन गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळेपर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पूर्णपणे संघटनेच्या पाठीशी राहील, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.


 या आंदोलानाची सुरुवात सरकारला श्रद्धांजली अर्पण करून झाली. संघटनेच्या सर्वच वक्त्यांनी सरकारचा समाचार घेत निषेध नोंदवला. “कंपनीच्या मिळकतींच्या लिलावास ग्राहक मिळत नाही, अशी सबब सांगून सेबीने अनेक मिळकतींचे भाव ६० ते७० टक्क्याने कमी केले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांना परतावा मिळणे कठीण होणार आहे. राज्यातील ३५ लाख सामान्य गुंतवणूकदार या प्रकरणी बाधित झाले असताना सरकार या विषयावर संवेदनशील नाही. शेतकऱ्यांप्रमाणे गुंतवणूकदारांनीही आत्महत्या करायची सरकार वाट पाहत आहे का..? असा प्रश्न विचारात “राज्यातील ३५ लाख गुंतवणूकदार येणाऱ्या निवडणुकीत सरकारला खाली खेचतील” असा इशारा राष्ट्रशक्ती संघटनेने आझाद मैदानावर दिला. तर इन्व्हेस्टर्स वेल्फेअर फोरमने  “दि.२४ ऑक्टोबर च्या लिलावात सेबीला ग्राहक मिळाला नाही तर राज्य व केंद्र सरकारने कंपनीच्या मिळकती ताब्यात घेऊन गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत द्यावेत” अशी आग्रही मागणी केली.


मंत्रालयाच्या प्रतिमेचे श्राद्ध घातले
यावेळी व्यासपीठावर मंत्रालयाच्या प्रतिमेला हार घालून त्यासमोर पिंड ठेऊन श्राद्ध घालण्यात आले. “मुर्दाड सरकार हाय हाय, गुंतवणूकदारांना परतावा मिळालाच पाहिजे, अशा घोषणांनी आझाद मैदान गुंतवणूकदारांनी दणाणून सोडले. या वेळी राष्ट्रशक्तीचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी गेले असता मुख्यमंत्री यांचे वतीने महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ते स्वीकारले व याप्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले. यावेळी राज्यातील पुणे, मुंबई, अमरावती, नागपूर, अकोला, धुळे, नगर, शिरूर,जळगाव, भुसावळ, बेळगाव, सातारा, सांगली, कोल्हापूर, गडहिंग्लज, सिंधुदुर्ग, नाशिक, या परिसरातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदार आले होते. तर गोवा कर्नाटक राज्यातूनही गुंतवणूकदारांनी आंदोलनाला हजेरी लावली होती.

Web Title: The pessimism of the PanCardCollege company's investors at the Azad Maidan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.