उस्मानाबाद : नोटाबंदी, जीएसटीच्या अंमलबजावणीतील गोंधळाने घसरलेली अर्थव्यवस्था, शेतक-यांना देशोधडीला लावणारे, युवकांचा रोजगार हिरावून घेणारे निर्णय, घोटाळ्यांमुळे सामान्य माणूस त्रस्त आहे. त्यामुळे या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याचा निर्धार करीत काँग्रेसने उस्मानाबादच्या जनआक्रोश सभेत ह्यबोलो जवानों हल्लाबोल, मोदी सरकारपर हल्लाबोलह्ण असा नारा दिला़ यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांनी हा जनतेचा हल्लाबोल सरकार उलथवून टाकेल, असा विश्वास व्यक्त केला. काँग्रेसच्या वतीने उस्मानाबाद येथे रविवारी मराठवाडा विभागीय जनआक्रोश सभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश होते.

मंचावर प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते आ. राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री पतंगराव कदम, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री आ. अब्दुल सत्तार, आ. अमित देशमुख, आ. शरद रणपिसे, आ. मधुकरराव चव्हाण, आ. बसवराज पाटील, आ. अमर राजूरकर, आ. त्र्यंबक भिसे, जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मोहन प्रकाश म्हणाले, भाजपा नेत्यांमध्ये सत्तेचा प्रचंड अहंकार आला आहे. त्यामुळे सामान्य जनता, प्रशासन वैतागून गेले आहे. शेतकरी शेतमाल भावासाठी, तर युवक रोजगारासाठी हैराण आहे. निवडणुकीपूर्वी दोन दाढीवाले काळेधन आणू म्हणून ओरडत होते. प्रत्येकी १५ लाख रुपये मिळतील, असे आश्वासनही ते देत होते, याला जनता भुलली. १५ लाख सोडा १५ हजार तरी द्या. आम्ही केलेल्या कामांचे उद्घाटन करीत फिरणारे मोदी मागील साठ वर्षांत काय केले म्हणून विचारतात. जेव्हा आमचे पूर्वज गोळी लागली तरी खांद्यावरचा झेंडा पडू देत नव्हते, हौतात्म्य पत्करत होते तेव्हा मोदींचे पूर्वज इंग्रजांची गुलामी करण्यात दंग होते. सध्या मोदी हे विदेशी शक्तींच्या विचारधारेवर देश चालवत आहेत. त्यामुळे यांना आम्ही काय केले हे विचारण्याचा अधिकारच उरत नाही. जनआक्रोश ही केवळ सत्तेची लढाई नसून, ही सामान्यांच्या हक्काची व न्यायाची आहे. या लढाईला साथ द्या, असे आवाहन प्रकाश यांनी केले.

माजी मुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण म्हणाले, तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतरही या सरकारने जनतेच्या हातावर केवळ स्वप्ने ठेवली आहेत. राज्यात फडणवीस नव्हे, तर फसणवीस सरकार आहे. ८९ लाख शेतक-यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी देवू, अशी घोषणा फडणवीस करीत होते. आजतागायत ३४ हजार शेतक-यांनाही ते देऊ शकले नाही. त्यात ऊर्जामंत्री शेतक-यांना सात दिवसात कृषी पंपाचे बिल भरायला सांगतात. तुम्ही वीज तोडून तर बघा, रस्त्यावर उतरून आम्ही उत्तर देवू, असा इशारा चव्हाण यांनी दिला. आमचे सरकार असताना शेतकरी आत्महत्या प्रकरणात सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करा म्हणणा-या फडणवीस यांच्यावर आता १२ हजार आत्महत्यानंतर का गुन्हा दाखल करू नये? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. भाजपवाल्यांनी महाराष्ट्र व देश सोडल्याशिवाय जनतेला अच्छे दिन येणार नाहीत, असे चव्हाण म्हणाले.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, भ्रष्टाचारमुक्त सरकार देवू असे भाजपवाले सांगत होते. मात्र त्यांच्याच सरकारात एक अधिकारी पोस्टींगसाठी सात कोटी रुपये मागितले जातात, असे जाहीरपणे सांगतो. चिकी घोटाळा, गृहनिर्माणमध्ये घोटाळा झाला हे कसले भ्रष्टाचारमुक्त सरकार आहे. त्यांच्या निर्णयांनी शेतकरी अडचणीत आला, युवक बेरोजगार झाले, व्यापारी बुडाले, अर्थव्यवस्था कोलमडली, सरकार चाललंय की जनावरांचा बाजार हेच कळेनासे झाले आहे. राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, हे सरकार ह्यगेम चेंजरह्ण नव्हे, तर ह्यनेम चेंजरह्ण आहे. आमच्या योजनांची केवळ नावे बदलली जात आहेत. शेतकरी, शिक्षक, एसटी कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी सगळेच संपावर जात आहेत. इतकी अस्वस्थता राज्यात पसरली आहे. जनआक्रोश ही या असंतोषाला वाचा फोडण्याची एक सुरुवात आहे.
पतंगराव कदम म्हणाले, भाषण व आश्वासनावर हे सरकार आले आहे. महिलांना वाटले गॅस फुकट देणार; पण तो दुप्पट झाला, युवकांचा रोजगार गेला, विकासदर खुंटला. आता महाराष्ट्र तापला आहे, त्याची सुरुवात नांदेडातून झाली. हर्षवर्धन पाटील म्हणाले, हे सरकार भांडवलदारांच्या हिताचे आहे. सामान्यांना त्रास होत आहे. पुढील निवडणुकीत सरकार विरोधात मतदान होईपर्यंत आता स्वस्थ बसणार नाही. आ. अमित देशमुख म्हणाले, काँग्रेसच्या काळातील कर्जमाफीने शेतकरी सुखावला होता. आताच्या कर्जमाफीसाठी शेतकºयांना परीक्षा द्यावी लागते, इतकी दयनीय अवस्था आहे. आता लवकरच ह्यअच्छे दिन आनेवाले हैं, क्योंकी फडणवीस जानेवाले हैंह्ण अशी टिप्पणी देशमुख यांनी केली. यावेळी गटनेते आ. शरद रणपिसे, माजी मंत्री आ. मधुकरराव चव्हाण, माजी राज्यमंत्री आ. बसवराज पाटील, सुभाष झांबड यांचीही भाषणे झाली.
दाढीवाल्यांनी भुलविले...
मोहन प्रकाश यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व रामदेवबाबा यांचा थेट नामोल्लेख न करता पांढरी दाढीवाले व काळी दाढीवाले असा उल्लेख करीत निवडणुकीपूर्वी त्यांनी जनतेला भूल घातल्याचे सांगितले. दोघेही काळे धन आणून प्रत्येकाच््या खात्यात १५ लाख येतील असे सांगत होते; पण अजून छदामही आला नाही. त्यांनी प्रत्येकाच्या खात्यात १५ हजारतरी टाकावेत, असे आव्हानही प्रकाश यांनी दिले.
मराठवाड्यावर मुख्यमंत्र्यांकडून अन्याय
सगळे प्रकल्प विदर्भाकडे जात आहेत. मुख्यमंत्री मराठवाड्यावर अन्याय करीत आहेत, असा थेट आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सभेत केला. एकही उद्योग सुरू होत नाही. बँक सरकारला फसवते, त्याची चौकशी करावी. कर्जमाफीसाठी सरकार ३० टक्के विकासकामांना कात्री लावते, असा उलट प्रवास सुरू असल्याचे त्यांनी म्हणाले.
अकलेचे दिवाळे निघाले
दारुविक्री वाढविण्यासाठी एक मंत्र्याने दारुला महिलेचे नाव द्यावे, अशी टिप्पणी केली होती. त्यावर अशोकराव चव्हाण यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, सरकारच्या अकलेचे दिवाळे निघाले आहेत.
शिवसेना लाचार
भाजपा सरकारची तीन वर्षे साजरी करीत आहे. याचवेळी सत्तेतून बाहेर पडू, असे सातत्याने सांगणा-या सेनेने खोटे बोलण्याची तीन वर्षे साजरी करावी, असा सल्ला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिला. सेनेत स्वाभिमान उरला नसून, त्यांचे पदाधिकारी वर्षावर लाचारी पत्करत असल्याची टीकाही विखे यांनी केली.