विधानसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेतेपद तूर्त शाबूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 04:04 AM2017-10-02T04:04:07+5:302017-10-02T04:04:20+5:30

नारायण राणे यांनी स्वतंत्र राजकीय पक्षाची घोषणा केली असली तरी त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे आणि समर्थक आमदार कालिदास कोळंबकर सध्या ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या भूमिकेत आहेत

Opposition leader of Congress in the Legislative Assembly | विधानसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेतेपद तूर्त शाबूत

विधानसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेतेपद तूर्त शाबूत

Next

मुंबई : नारायण राणे यांनी स्वतंत्र राजकीय पक्षाची घोषणा केली असली तरी त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे आणि समर्थक आमदार कालिदास कोळंबकर सध्या ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या भूमिकेत आहेत. राणे यांनी काँग्रेसला रामराम ठोकला तेव्हाच नितेश आणि कोळंबकर यांची तटस्थतेची भूमिका निश्चित झाली असली तरी त्यामुळे विधानसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेतेपद मात्र तूर्तास शाबूत असल्याचे चित्र आहे
काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर नारायण राणे याच जागेवर भाजपाच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवू शकतात. मात्र विधानसभेची पोटनिवडणूक म्हणावी तेवढी सोपी नसल्याची जाणीव राणे व कोळंबकर यांना आहे. २०१४ च्या निवडणुकीत नितेश राणे कणकवली तर कालिदास कोळंबकर वडाळा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. या दोघांनी काँग्रेस सोडली असती तर विधानसभेतील आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला असता. कोकणात अजूनही शिवसेनेची ताकद आहे, तर वडाळा मतदारसंघात कालिदास कोळंबकर यांचे काम मोठे असले तरी मागील निवडणुकीत त्यांची दमछाक झाली होती. अवघ्या काही शे मतांनी ते निवडून आले होते. सध्याचे राजकीय वातावरण लक्षात घेता पोटनिवडणूक सोपी नसल्याने नितेश आणि कोळंबकर यांनी सध्या तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसमध्येच राहणे पसंत केल्याची चर्चा आहे.
नितेश राणे आणि कालिदास कोळंबकर यांच्या या भूमिकेमुळे विधानसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेतेपद तूर्तास शाबूत असल्याचे चित्र आहे. विधानसभेत काँग्रेसचे ४२ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१ इतके संख्याबळ आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे आहे.
नारायण राणे यांच्यासोबत नितेश राणे आणि कालिदास कोळंबकर यांनी काँग्रेसचा त्याग केला असता तर काँग्रेसचे संख्याबळ ४० वर आले असते आणि विरोधी पक्षनेतेपदाची माळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळ्यात पडली असती.

Web Title: Opposition leader of Congress in the Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.