राज्यातील धरणांत अवघा १४ टक्केच जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 05:52 AM2019-05-22T05:52:39+5:302019-05-22T05:52:40+5:30

औरंगाबाद विभागात ठणठणाट : मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा

Only 14 percent water storage in dams in the state | राज्यातील धरणांत अवघा १४ टक्केच जलसाठा!

राज्यातील धरणांत अवघा १४ टक्केच जलसाठा!

Next

पुणे : राज्यातील धरणसाठ्यात वेगाने घट होत असून, पुणे, कोकण, नागपूर आणि औरंगाबाद विभागातील पाणी पातळीत मोठी घट नोंदविण्यात आली आहे. राज्यात अवघा १४ टक्के पाणीसाठा असून, औरंगाबाद विभागातील धरणांमध्ये अवघे ३ टक्के पाणी शिल्लक आहे.


राज्यातील तापमानाचा पारा पुन्हा चाळीशीपार गेला असून, विदर्भ आणि मराठवाड्यातील कमाल तापमान तर ४२ ते ४६ अंश सेल्सिअस दरम्यान आहे. गेल्या २६ दिवसांमध्ये राज्यातील उपयुक्त साठ्यात २९० अब्ज घन फुटांवरून (टीएमसी) २०२.१३ टीएमसीपर्यंत घट झाली आहे.


जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता १ हजार ४४४ टीएमसी आहे. मंगळवार अखेरीस अमरावतीत २१.२२ टक्के, औरंगाबाद २.९२, कोकण ३४.७८, नागपूर ९.०६, नाशिक १३.७५ आणि पुणे विभागामध्ये १४.१५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी राज्यात याच कालावधीत २५.२५ टक्के पाणीसाठा होता. नागपूर विभागाचा (१२.८९ टक्के) अपवाद वगळता गेल्या वर्षी सर्वच विभागात २० टक्क्यांच्यावर पाणीसाठा होता. गेल्यावर्षी शेवटच्या टप्प्यात मान्सूनने पाठ फिरविली होती. यंदाही पावसाची सरासरी कमी असेल असा पहिला अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. जून महिन्यामध्ये हवामान विभागाचा दुसरा अंदाज जाहीर होईल. अंदमानात मान्सून दाखल झाला असून केरळात तो महिनाअखेरीस दाखल होण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रवासावर पाण्याचे नियोजनही अवलंबून राहणार आहे.

बहुतांश जिल्ह्यांत तापमान चाळीशीपुढे असून, विदर्भात ते ४५च्या घरात आहे. या वातावरणामध्ये पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढतो. जून महिन्यात पावसाचा जोर कमी राहणार असून, सरासरीपेक्षा पर्जन्यमान कमी राहील. राज्यात १० जूनपर्यंत कमाल तापमान असेच असेल. या काळात बाष्पीभवनाचा वेगही अधिक असणार आहे. त्यानुसार उपलब्ध पाण्याचे नियोजन करावे लागेल. - जीवनप्रकाश कुलकर्णी, हवामान तज्ज्ञ.

विभाग उपयुक्त २१ मे अखेरीस
पाणीसाठा पाणीसाठा
अमरावती १४८.०६ ३१.४१
औरंगाबाद २६०.३१ ७.७२
कोकण १२३.९४ ४३.१०
नागपूर १६२.६७ १४.७३
नाशिक २१२ २९.१४
पुणे ५३७.१२ ७६
एकूण १४४४.१३ २०२.१३

Web Title: Only 14 percent water storage in dams in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.