एमआयएमची ‘ऑफर’ ‘मविआ’ने फेटाळली; म्हणाले, ही तर भाजपची ‘टीम बी’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 07:59 AM2022-03-20T07:59:55+5:302022-03-20T08:00:27+5:30

‘औरंगजेबासमोर गुडघे टेकणाऱ्यांसोबत युती होण्याचा प्रश्नच नाही’ असे सांगत शिवसेनेने लगेच हात झटकले.  एमआयएमला आघाडीत घेण्याची शक्यता काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी फेटाळली.

MVA nixes AIMIM offer to join state government | एमआयएमची ‘ऑफर’ ‘मविआ’ने फेटाळली; म्हणाले, ही तर भाजपची ‘टीम बी’

एमआयएमची ‘ऑफर’ ‘मविआ’ने फेटाळली; म्हणाले, ही तर भाजपची ‘टीम बी’

Next

मुंबई : खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाने महाविकास आघाडीसोबत जाण्याचा प्रस्ताव दिल्याने शनिवारी त्याचे तीव्र राजकीय पडसाद उमटले. मात्र, तिन्ही पक्षांनी ही ऑफर स्पष्ट शब्दात फेटाळली. 

‘औरंगजेबासमोर गुडघे टेकणाऱ्यांसोबत युती होण्याचा प्रश्नच नाही’ असे सांगत शिवसेनेने लगेच हात झटकले.  एमआयएमला आघाडीत घेण्याची शक्यता काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी फेटाळली. यानिमित्ताने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. 

समविचारी पक्ष एकत्र येणे ही आनंदाची बाब असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. पण समविचारी कोण हे तपासून बघावे लागेल, असे सांगत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या विधानाला एकप्रकारे ‘खो’ दिला. खासदार इम्तियाज जलील हे एमआयएमचा राजीनामा देऊन आले, तर त्यांना राष्ट्रवादीत घ्यायला काहीच हरकत नाही. नक्कीच पवार साहेब त्यांना पक्षात घेतील, अशी ‘काउंटर ऑफर’ राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिली. जलिल यांच्याशी मी अनौपचारिक चर्चा केली. महाविकास आघाडीसोबत जाण्याच्या एमआयएमच्या प्रस्तावावर आघाडीचे नेते निर्णय घेतील, असे मी त्यांना सांगितल्याची प्रतिक्रिया आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. 

राजेश टोपे माझ्या निवासस्थानी आले होते. तेव्हा, उत्तर प्रदेशमध्ये एमआयएममुळे भाजप जिंकल्याचे ते म्हणाले. त्यावर मी म्हणालो की, हे आरोप एकदाचे संपू द्या. काँग्रेस-राष्ट्रवादीला प्रस्ताव देत आहोत.  एमआयएमला आघाडीत घेण्याचा माझा निरोप शरद पवार यांना द्या. तुमच्या तीनचाकी रिक्षाला आमचेही एक चाक जोडून द्या. मोटार कार करा आणि बघा ती कशी चालते. 
 - इम्तियाज जलिल, खासदार, एमआयएम

एमआयएमने आधी ते भाजपची ‘बी टीम’ नाहीत, हे सिद्ध करावे. त्यांच्यावर लोकांचा विश्वास कमी झाला आहे. राजेश टोपे सांत्वनासाठी गेले होते. त्यांनी राजकीय चर्चा केली नसेल, अशी माझी खात्री आहे. 
    - जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी

Web Title: MVA nixes AIMIM offer to join state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.