शिष्यवृत्तीसाठी बहुसंच प्रश्नपत्रिका

By admin | Published: February 18, 2017 04:07 AM2017-02-18T04:07:31+5:302017-02-18T04:07:31+5:30

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २६ फेब्रुवारी रोजी घेतल्या जाणाऱ्या पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेस राज्यातील ९ लाख ४८ हजार

Multiple question papers for scholarship | शिष्यवृत्तीसाठी बहुसंच प्रश्नपत्रिका

शिष्यवृत्तीसाठी बहुसंच प्रश्नपत्रिका

Next

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २६ फेब्रुवारी रोजी घेतल्या जाणाऱ्या पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेस राज्यातील ९ लाख ४८ हजार २३६ विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरला असून, विद्यार्थ्यांना प्रथमच बहुसंच प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना एकूण प्रश्नांपैकी २० टक्के प्रश्नांची दोन उत्तरे द्यावी लागणार आहेत.
शिष्यवृत्ती परीक्षेस विद्यार्थ्यांना प्रथमच ए, बी, सी, डी या पद्धतीने प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहेत. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी (पाचवी) उत्तराच्या चार पर्यायांपैकी एकच पर्याय अचूक असेल. परंतु, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी (आठवी) प्रत्येक पेपरमध्ये कमाल २० टक्के प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या ४ पर्यायांपैकी दोन पर्याय अचूक असतील. दोन्ही पर्याय नोंदवणे बंधनकारक असून, दोन्ही अचूक पर्याय न नोंदवल्यास शून्य गुण दिले जातील. कोणत्या प्रश्नांची दोन उत्तरे द्यावीत याबाबत विद्यार्थ्यांना स्पष्ट सूचना प्रश्नपत्रिकेत दिल्या जाणार आहेत. प्रवेशपत्र परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असून, तेथून त्याची प्रिंट विद्यार्थ्यांनी काढून घ्यायची आहे, असे परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

पद्धतीत बदल

राज्याच्या शिक्षण विभागातर्फे यंदा चौथीऐवजी पाचवीच्या विद्यार्थ्यांची आणि सातवीऐवजी आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. इयत्ता पाचवीच्या एकूण ५ लाख ४५ हजार ३५९ तर आठवीच्या ४ लाख २ हजार ८७७ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज केला आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी केलेले बदल लक्षात घ्यावेत, असे आवाहन परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

Web Title: Multiple question papers for scholarship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.