मुंबई- महापालिकेत नाट्यमय घडामोडींना वेग आला आहे. मुंबई महापालिकेसाठी अतिशय प्रतिष्ठेच्या भांडुप पोटनिवडणुकीत भाजपाने शिवसेनेना धूळ चारून विजय मिळवल्यानंतर भाजपाच्या महापौरपदाच्या दाव्याला बळ मिळालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं मनसेच्या 6 नगरसेवकांना फोडून पक्षप्रवेश दिला आहे. मनसेच्या 7 पैकी 6 नगरसेवकांनी कोकण विभागीय आयुक्तांना त्याबाबत पत्रसुद्धा दिलं आहे.  

विशेष म्हणजे राज ठाकरेंना विचारत न घेता मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे महापालिकेतील शिवसेनेचं संख्याबळ वाढलं आहे. भाजपासाठी हा मोठा धक्का समजला जातोय. शिवसेनेच्या या मास्टर स्ट्रोकमुळे भाजपासोबत मनसेलाही धक्का बसला आहे. मुंबई महापालिकेत नगरसेवक विकत घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. 

शिवसेनेचे सध्या महापालिकेत 84 नगरसेवक आहेत, तर भाजपाजवळ 83 नगरसेवकांचं संख्याबळ आहे. भांडुप पोटनिवडणुकीमुळे भाजपा नगरसेवकांच्या संख्येत एका अंकानं वाढ झाली होती. मात्र आता शिवसेनेकडे 91 नगरसेवकांचं संख्याबळ आहे. भाजपाचे खासदार किरीट सोमय्यांनी शिवसेना नगरसेवक फोडत असल्याचं सांगत निवडणूक आयोगाला पत्रसुद्धा दिलं आहे. 

तत्पूर्वी मनसेचे 5 ते 6 नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा होती, शिवसेना मनसेच्या नगरसेवकांना कोकण विभागीय आयुक्तांकडे घेऊन जाण्याच्या तयारीत आहे, मनसेनेही आमचे केवळ एकाच नगरसेवकाशी संपर्क झाल्याचे म्हटले होते. भाजपापाठोपाठ मनसेनंही कोकण विभागीय आयुक्तांना पत्र पाठवलं आहे.

2017च्या महापालिका निवडणुकीत मनसेचे सात नगरसेवक निवडून आले आहेत. शिवसेना व भाजपात दोन संख्याबळाचा फरक असल्याने शिवसेनेचे टेन्शन वाढले होते. त्यात भांडुप पोटनिवडणुकीत भाजपाच्या विजयामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली. मनसेचे काही नगरसेवक निवडणुकीपूर्वीच भाजपात गेले होते. तर काही शिवसेनेच्या संपर्कात होते. बुधवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे महापालिकेत आयुक्तांची भेट घेण्यासाठी आले होते. तेव्हापासून मनसेचे गटनेते दिलीप लांडे आणि आणखी एक नगरसेवक वगळता पाच जण गैरहजर होते. मनसेच्या हर्षला मोरे, अश्विनी माटेकर, अर्चना भालेराव, दिलीप लांडे, दत्ताराम नरवणकर, परमेश्वर कदम या नगरसेवकांनी मनसेला सोडचिठ्ठी सेना प्रवेश केला आहे. पक्षाच्या आदेशाविना नगरसेवकांनी निर्णय घेतला असून, एक दिवस मनसे सोडून गेलेल्या नगरसेवकांना नक्कीच पश्चात्ताप होईल, असंही मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले आहेत. 

गटनोंदणी करण्याआधी पक्षाशी चर्चा करा, असा आदेश मनसेनं वेगळा गट स्थापन करण्यासाठी निघालेल्या नगरसेवकांना दिला होता. परंतु मनसेच्या नगरसेवकांनी विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणीसाठी संमती पत्र दिल्याचा दावा शिवसेनेनं केला आहे. 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.