संमेलन भरीव असावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 04:24 AM2018-06-10T04:24:53+5:302018-06-10T04:24:53+5:30

अनेक नाटकांचे फक्त उल्लेख आपण चर्चेत किंवा नाट्यविषयक पुस्तकांमध्ये वाचतो. अशा नाटकांच्या संहिता आणि नाट्यविषयक साहित्य मिळण्यासाठी संमेलन एक महत्त्वाचं ठिकाण असायला हरकत नाही. तसंच वर्षभरात केलेल्या उल्लेखनीय आणि दर्जेदार कलाकृतींचे आणि बॅकस्टेज ते निर्माता ते बुकिंग क्लर्क या साखळीतल्या सगळ्यांच्या कामगिरीबद्दल परिषदेकडून या भव्य संमेलनात कौतुक झाले तर पुढे आणखी जोमाने कामाला लागता येईल.

Marathi Natya Sammelan, Mulund News | संमेलन भरीव असावे!

संमेलन भरीव असावे!

Next

- प्राजक्त देशमुख

मुलुंडमध्ये होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे वेगळेपण म्हणजे नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रसाद कांबळी या तरुण शिलेदारची झालेली निवड. मुंबई-पुण्याच्या चाकोरीबाहेर नाट्यचळवळ नेण्याची ही सुरूवात मानली जाते. त्यामुळे नव्या पिढीतील तरुण रंगकर्मींना यंदाच्या नाट्यसंमेलनाकडून, रसिकांकडून खूप अपेक्षा आहेत. अशाच रंगकर्मींपैकी एक म्हणजे लेखक, दिग्दर्शक प्राजक्त देशमुख. त्यांचे ‘संगीत देवबाभळी’ हे व्यावसायिक नाटक रंगभूमीवर गाजते आहे. त्यांनी या संमेलनाविषयी व्यक्त केलेल्या भावना...

शिकला कुंभमेळा भरतो. त्याविषयी एकदा वाचण्यात आलं होतं. प्राचीन काळी सर्व राज्यकर्ते, विद्वान, पंडित, अभ्यासक, शास्त्रज्ञ या लोकांचं ते संमेलन असायचं. ज्यात १२ वर्षांत आपापल्या भागात होत असलेल्या किंवा झालेल्या नव्या गोष्टींचं, ज्ञानाचं आदानप्रदान केलं जाई. आता तत्कालीन विद्वान म्हणजे सगळे ऋषीमुनी आणि तत्सम पंडित ते त्यांची दिनचर्या बरहुकूम पाळायचे. स्नानादी, होमहवन, पूजाअर्चा इ. नित्यनियम उरकून पुन्हा संमेलनात भाग घ्यायचे. भाविक लोक ऐकिवात असलेल्या विद्वान मंडळींना पाहायला, ऐकायला मिळणार म्हणून गर्दी करत असत. कालांतराने हे आदानप्रदान मागे पडलं आणि फक्त काही पुराणकालीन कथांचं अमृत वगैरे तेवढं राहिलं. आधीच धोक्याची पातळी ओलांडलेल्या नदीत नवी गर्दी धोका पत्करून आपल्या अनेक वर्षांच्या धूळमाखल्या जटांचे धोके त्यात मिसळून पुन्हा निर्जन स्थळी मार्गस्थ होतात. शहराचा मुठीतला जीव पुन्हा काठावर येतो.
हे सगळं आठवायचं कारण म्हणजे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन येऊ घातलंय. संमेलनाकडून माझ्यासारख्या रंगकर्मीला काय अपेक्षा आहेत, हा प्रश्न जेव्हा विचारला गेला तेव्हा मी आठवलं मी शेवटचं संमेलनात कधी गेलो होतो. यापूर्वी दोन वेळा एकांकिका सादरीकरणाच्या निमित्ताने संमेलनात सहभागी झालो होतो. पण त्याला जवळपास तीनेक वर्षं झाली असतील. संमेलन म्हणजे सादरीकरण, वैचारिक आदानप्रदान, पुरस्कार आणि साहित्य प्रदर्शन या तीन महत्त्वाच्या गोष्टींचा अंतर्भाव असावा असं मला वाटतं
सादरीकरणाबाबतीत बोलायचे झाल्यास, मराठी रंगभूमीला यंदा १७५ वर्षं पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने जुन्या-नव्याचा प्रवास पाहायला मिळावा. जेणेकरून सगळ्यांना आपण ज्या पालखीचे भोई आहोत त्याचे मूळ माहीत असावे. इतिहास माहीत असला की भविष्याकडे आणखी जोमाने प्रवास करता येतो. मराठी रंगभूमी या एका छत्राखाली अनेक रंगभूमी नांदत आहेत. जसे की व्यावसायिक, प्रायोगिक, झाडीपट्टी, दशावतार, पथनाट्ये, एकांकिका, दीर्घांक, बालनाट्य, लोकनाट्य, संगीत नाटक इ. या सगळ्यांचा एकत्रित संगम पाहायला मिळावा. अनेकांनी या नाटकांचा केवळ उल्लेख ऐकलेला असतो. अनेक जण चौकट मोडून नवं काही घडवण्याची चर्चा करतात. मग चौकट माहीत असणंही गरजेचं असतं. या सगळ्याच (किंवा जास्तीत जास्त, कारण कमी वेळेत सगळ्यांनाच व्यासपीठ उपलब्ध करून देणं जिकिरीचं ठरू शकतं) प्रतिनिधी नाटकांचे सादरीकरण ज्या संस्था सध्या तशा पद्धतीची नाटकं करत आहेत आणि तो तो नाटकप्रकार जिवंतच ठेवत नाही तर त्यात भर घालत आहेत, त्यात प्रयोगशीलता आणत आहेत.
चर्चासत्र, अधिवेशन अशा कार्यक्रमातून वेगवेगळ्या प्रतिनिधींची चर्चा घडवून त्यांच्या क्षेत्रातल्या येणाºया अडचणी आणि त्याचे निरसन करण्यासाठीच्या शक्यता वैचारिक आदानप्रदानामार्फत होतात. वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोगाच्या अनुभवातून तेथील प्रेक्षक आणि नाट्यगृहांबद्दलची सद्य:स्थिती याबद्दल ऊहापोह गरजेचा वाटतो. जो मराठी रंगभूमीला निर्णायक दिशेला घेऊन जाऊ शकेल. प्रातिनिधिक स्वरूपात प्रेक्षकांनाही यात समाविष्ट केलं तर ज्यांच्यासाठी हे सर्व चालू आहे त्या मायबाप रसिकांचं मतही लक्षात येईल.
जे कुंभमेळ्याच्या बाबतीत झालं ते संमेलनाच्या बाबतीत होऊ नये. शेवटी संमेलन हेही एकाअर्थी नाटकांचा कुंभमेळाच. वार्षिक अहवालापुरतं संम्ंोलन न होता ते भूतकाळाचा आढावा, वर्तमानाचा गौरव आणि भविष्याची नांदी असणारं असं भरीव असावं. यंदाच्या संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर झाली आहे. त्यात हे सगळे मुद्दे वाचायला मिळाल्याने अत्यंत आनंद झाला. आता ते अनुभवायला मी त्या दिवसाची वाट पाहतोय .
हे झालं संमेलनाच्या रंगकर्मींकडून असलेल्या अपेक्षांबाबत. पण रंगभूमीच्याही रसिक आणि रंगकर्मींकडून संमेलनाच्या अनुषंगाने काही अपेक्षा असतात. त्या जास्त महत्त्वाच्या. रसिकांची आणि रंगकर्मींची उपस्थिती आणि सहभाग हा मोलाचा आहे. ज्यांच्यासाठी हा घाट घातला जातोय त्यांनी तो पाहावा, अनुभवावा, सक्रिय सहभाग नोंदवावा. कारण हेच होणार नसेल तर नंतरच्या तक्रारींना अर्थच नसेल.

Web Title: Marathi Natya Sammelan, Mulund News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.