मराठी विश्वकोश होणार अद्ययावत

By Admin | Published: June 1, 2016 12:36 AM2016-06-01T00:36:34+5:302016-06-01T00:36:34+5:30

विश्वकोशातील नोंदी कालबाह्य झाल्याने त्यांमध्ये सुधारणा करण्याबरोबरच मानव्य शाखांमधील नवीन संकल्पना, विचारप्रवाह या सर्व बदलांची नोंद

Marathi Encyclopedia will be updated | मराठी विश्वकोश होणार अद्ययावत

मराठी विश्वकोश होणार अद्ययावत

googlenewsNext

नम्रता फडणीस,  पुणे
विश्वकोशातील नोंदी कालबाह्य झाल्याने त्यांमध्ये सुधारणा करण्याबरोबरच मानव्य शाखांमधील नवीन संकल्पना, विचारप्रवाह या सर्व बदलांची नोंद घेण्यासाठी विश्वकोश अद्ययावत करण्यात येणार आहे. यासाठी राज्य मराठी विश्वकोश मंडळाकडून राज्यभरातील विविध विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने पहिल्या टप्प्यात २० ज्ञानमंडळांची स्थापना करण्यात आली आहे.
सद्य:स्थितीत मराठी विश्वकोशाच्या २३ खंडांपैकी २० खंड प्रकाशित झाले आहेत. हे खंड पूर्ण करण्यास लागलेल्या प्रदीर्घ कालावधीमुळे विश्वकोशातील अनेक नोंदी या कालबाह्य झाल्या आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नवनवीन संशोधनामुळे मोठ्या प्रमाणावर भर पडली असून, नव्या संकल्पना, विचारप्रवाह पुढे आले आहेत. त्यामुळे सर्व विषय आणि ज्ञानशाखांतील झालेल्या बदलांची नोंद घेऊन विश्वकोशामध्ये सुधारणा करण्याचा विचार शासनस्तरावर सुरू होता. हे अद्ययावतीकरण करताना विश्वकोशाचा मूळ दर्जा कायम ठेवून माहिती व तंत्रज्ञानाच्या साह्याने सर्व ज्ञानक्षेत्रातील माहिती एकाच वेळी उपलब्ध करून त्याचे समीक्षण-संपादन करून अंतिम नोंद करणे आवश्यक वाटत असल्याने विविध विषयांशी संबंधित ज्ञान मंडळे स्थापन करण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आला. त्यानुसार विविध विद्यापीठे, शैक्षणिक व संशोधन संस्थांशी चर्चा केल्यानंतर पहिल्या टप्प्यात २० ज्ञान मंडळे स्थापन करण्यात आल्याची माहिती राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबळेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
त्यानुसार मुंबई येथे १२ (आयसीटी आणि मराठी विज्ञान परिषद), पुणे ४ (डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ-३ आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर-१), जळगाव २, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, अहमदनगर १, नाशिक १ अशा ठिकाणी २० ज्ञान मंडळे स्थापन करण्यासंबंधी संबंधित विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांमध्ये करार झाले आहेत. पुणे विद्यापीठ, एसएनडीटी, नांदेड विद्यापीठाशी ज्ञान मंडळ निर्मित करण्यासंबंधी बोलणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येक ज्ञान मंडळाकडे सोपविण्यात आलेल्या विषयाची व्याप्ती व मर्यादा ठरवून विश्वकोशाच्या १ ते २० खंडांमधील शब्दांची नव्याने नोंद यादी तयार करणे, या नोंदयादीची जुन्या नोंदयादीशी पडताळणी करणे आणि नव्याने समाविष्ट करण्याच्या नोंदी, कालबाह्य नोंदी व अद्ययावत करायच्या नोंदी यांचा अहवाल तयार करणे तसेच ज्ञान मंडळातील तज्ज्ञांच्या साह्याने नोंदीचे लेखन, समीक्षण-संपादन व भाषांतर करणे, विश्वकोशातील नोंदींच्या लेखनासाठी लेखकांसाठी कार्यशाळा आयोजित करणे आणि नोंदींचे लेखन करणाऱ्या तज्ज्ञांनी दिलेले नोंदींचे संदर्भ, त्यासंबंधीची चित्रे, रेखाचित्रे, नकाशे, आराखडे, आॅडियो-व्हिज्युअल यांची पडताळणी व संपादन करणे या गोष्टी ज्ञान मंडळामार्फत केल्या जाणार आहेत. यामध्ये विश्वकोश मंडळावरील सदस्यांवर पालक म्हणून विशिष्ट विषयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच संबंधित विद्यापीठ, शैक्षणिक व संशोधन संस्था येथील मराठीतून संशोधनात्मक लेखन करण्याचा अनुभव असलेले विषयतज्ज्ञ, सेवानिवृत्त विषयतज्ज्ञ, संशोधक विद्यार्थी यांना समन्वयक म्हणून नेमले जाणार आहे.

Web Title: Marathi Encyclopedia will be updated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.