Marathi Bhasha Din : तंजावर- मराठीचा दक्षिण भारतात सदैव फडकणारा झेंडा 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 08:32 AM2018-02-27T08:32:09+5:302018-02-27T08:32:09+5:30

स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतरचनेमुळे एक राज्य म्हणजे एक प्रमुख भाषा व संस्कृती असे समीकरण लोकांच्या मनात दृढ झाले. त्यामुळे भारतातील भाषांच्या भौगोलिक व सांस्कृतिक पसाऱ्याचीही त्या अनुषंगाने पुनर्मांडणी झाली

Marathi Bhasha Din : Maharashtrian connection of South India | Marathi Bhasha Din : तंजावर- मराठीचा दक्षिण भारतात सदैव फडकणारा झेंडा 

Marathi Bhasha Din : तंजावर- मराठीचा दक्षिण भारतात सदैव फडकणारा झेंडा 

googlenewsNext

- निखिल बेल्लारीकर
स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतरचनेमुळे एक राज्य म्हणजे एक प्रमुख भाषा व संस्कृती असे समीकरण लोकांच्या मनात दृढ झाले. त्यामुळे भारतातील भाषांच्या भौगोलिक व सांस्कृतिक पसाऱ्याचीही त्या अनुषंगाने पुनर्मांडणी झाली. परिणामी फक्त दोनतीनशे वर्षांपूर्वी मराठी लोक महाराष्ट्रातच नव्हे तर त्याबाहेरही भारताच्या कानाकोपऱ्यात विखुरले होते याची कल्पनाही आज करणे खूप जणांना अवघड जाते कारण सध्याचीच स्थिती जुन्या काळीही होती असे अप्रत्यक्षपणे मानले जाते. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मराठी समाज आणि भाषेचा इतिहास या काल्पनिक सीमारेषांना उधळून देणारा आहे याची थोडी जरी जाणीव झाली तरी पुष्कळ आहे.

इ.स. १६४० च्या आसपास छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे महाराष्ट्रातून कर्नाटकातील बेंगळुरू येथे ते स्थायिक झाले ते इ.स. १६६४ मध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत ते कर्नाटक प्रांतीच होते. त्यांच्या आगमनामुळे तुंगभद्रेच्या दक्षिणेकडील कन्नड व तमिळ मुलुखात मराठी लोकांचा ओघ यायला सुरुवात झाली. त्यातही हा ओघ पुढे सर्वांत जास्त होता तो तंजावर भागात. छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजे यांनी इ.स. १६७६ साली बेंगळूरूहून तंजावरावर स्वारी केली आणि तो प्रदेश ताब्यात घेतला. पुढे दक्षिणदिग्विजय मोहिमेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनीही तंजावरच्या उत्तरेचा बराच मुलूख ताब्यात घेतला. पण काही दशकांत मराठ्यांना तो मुलूख सोडावा लागला. तुलनेने तंजावरचे राज्य मात्र पुढे इ.स. १८५६ पर्यंत, म्हणजे सुमारे १८० वर्षे टिकले.

व्यंकोजीराजांनी तंजावरच्या मराठी सत्तेचा पाया घातला. त्यांचे पुत्र शहाजीराजे हेही मोठे पराक्रमी निघाले. त्यांनी तब्बल अठ्ठावीस वर्षे राज्यकारभार सांभाळला आणि दक्षिणेत दबदबा निर्माण केला. काही थोडे अपवाद वगळता त्यांच्या पुढचे राजे तितके प्रभावी नव्हते. अर्काट, रामनाड, मदुरै, इ. जवळची राज्ये आणि चंदासाहेबासारखे हल्लेखोर यांना तोंड देण्यात तंजावरची खूप शक्ती खर्च पडली. राज्य वाचविण्यासाठी वेळप्रसंगी दुसऱ्याचे मांडलिकत्वही पत्करावे लागले. परिणामी ते राज्य महाराष्ट्रातील मराठी राज्यासारखे वर्धिष्णु राहिले नाही. पुढे इंग्रजांशी केलेल्या कराराने तंजावरचे उरलेसुरले स्वातंत्र्यही गेले आणि अखेरीस इ.स. १८५५ साली राजे दुसरे शिवाजी यांचा मृत्यू झाल्यानंतर ब्रिटिशांनी "दत्तक प्रतिबंधक कायद्या" अन्वये तंजावर राज्य खालसा केले. त्यासोबतच अतिदक्षिणेतील मराठी सत्तेचा अंत झाला.
मराठ्यांच्या इतिहासात राजकीय इतिहासावर सर्वांत जास्त भर दिल्यामुळे फक्त त्याच दृष्टिकोनातून पाहिल्यास तंजावरच्या राज्याबद्दल फारसे अनुकूल मत होत नाही. परंतु असे असले तरी या छोट्या राज्यात जे संस्कृतीसंवर्धन झाले त्याची बरोबरी क्वचितच अजून कुणाशी होऊ शकेल. सामाजिकदृष्ट्या पाहिल्यास यातील अनेक पदर दिसून येतात. व्यंकोजीराजांच्या अगोदरचे राजे तेलुगु होते. त्यामुळे तेलुगु भाषेला विशेष महत्त्व होते. मराठेशाहीत मराठीलाही तसेच महत्त्व आले. अगोदरच्या राजांची भाषा म्हणून तेलुगु, सध्याच्या राजांची भाषा म्हणून मराठी, आणि बहुसंख्य जनतेची भाषा म्हणून तमिळ अशा तीनही भाषा तंजावरच्या दरबारात एकत्र नांदत होत्या. स्वत: व्यंकोजीराजे हे उत्तम व्युत्पन्न होते आणि त्यांनी तेलुगु भाषेत रामायणही रचले होते. तंजावरचे बहुतेक मराठे राजे साहित्यप्रेमी होते. साहित्य, विविध कला, शास्त्रे, इ. सर्व पैलूंना तंजावर दरबारात मानाचे स्थान होते.

इ.स. १७९८ ते इ.स. १८३२ हा काळ सांस्कृतिकदृष्ट्या तंजावरचा सुवर्णकाळ होता. या काळात सर्फोजी दुसरे हे राजे होते. श्वार्झ नामक एका डॅनिश मिशनरींच्या प्रेरणेने त्यांना मद्रास इथे रेवरंड विल्हेल्म गेरिक यांनी शिक्षण दिले . युरोपीय शिक्षणाचा सर्फोजीराजांवरती खूप खोलवर परिणाम झाला. आपल्या राज्यात अनेक नवीन सुधारणा त्यांनी घडवून आणल्या. त्यांना मराठी, तमिळ, तेलुगु, उर्दू, संस्कृत, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, डच, डॅनिश व ग्रीक आणि लॅटिन इतक्या विविध भाषांचे ज्ञान होते. त्यांच्या वैयक्तिक ग्रंथालयात तब्बल चार हजार पुस्तके होती. विलासात वेळ न घालवता ते युरोपहून प्रत्येक वर्षी विविध प्रकारची आधुनिक पुस्तके मागवीत असत.

सर्फोजीराजांनी इ.स. १८०७ मध्ये छापखाना सुरू केला आणि त्यात कैक पुस्तके छापली. त्यातच इसापच्या कथांचे सर्वांत जुने मराठी भाषांतरही आहे! अनेक ग्रंथांची त्यांनी मराठीत भाषांतरे करवून घेतली. स्वत:ही कैक ग्रंथ लिहिले. तत्कालीन भारतातील राजेमहाराजांपैकी छापखाना सुरू करून काही वर्षे चालवणारे ते पहिलेच होते. त्यांना वैद्यकशास्त्रातही तितकीच गती होती. ते स्वत: डोळ्यांची शस्त्रक्रिया करीत आणि त्याची निरीक्षणे नोंदवून ठेवत. त्यासंबंधीचे अनेक मोडी कागदपत्रही उपलब्ध आहेत. त्यांच्या या कार्याची दखल २०१२ सालच्या "इंडियन जर्नल ऑफ ऑप्थॅल्मॉलॉजी" या जर्नलमध्ये "ऑप्थॅल्मिक काँट्रिब्यूशन्स ऑफ राजा सर्फोजी" नामक शोधनिबंध लिहून घेतली गेली आहे.

कर्नाटक शास्त्रीय संगीताची मुख्य त्रिमूर्ती मानले जाणारे त्यागराज, मुत्तुस्वामी दीक्षितर आणि श्यामशास्त्री हे तिघेही तंजावरच्या राज्यातील तिरुवारूर गावातले होते. यांपासून संगीत शिकून त्यात अनेक नवनवीन रचना करणाऱ्यांमध्ये "तंजावूर नाल्वर" अर्थात "तंजावर चौकडी" या नावाने ओळखले जाणारे चार भाऊ होते- चिन्नय्या, पोन्नय्या, शिवानंदम आणि वडिवेलु. हे चारही भाऊ सर्फोजीराजांच्या पदरी होते. यातील वडिवेलू यांनी प्रथम तंजावरला असताना दाक्षिणात्य संगीतसभांमध्ये व्हायोलिन वाजवण्याची प्रथा पाडली. आजही दाक्षिणात्य संगीतात व्हायोलिनला महत्त्वाचे स्थान आहे. भरतनाट्यमलाही तंजावरच्या राज्यात उत्तेजन दिले जात होते.

विद्या-कलांसोबत आपल्या घराण्याचा इतिहासही चिरस्थायी होईल याची सर्फोजीराजांनी काळजी घेतली होती. तंजावरमध्ये राजराजा चोळ याने इ.स. १०१५ साली अख्ख्या ग्रॅनाईटमध्ये बांधलेले एक शंकराचे देऊळ आहे - "बृहदीश्वरर कोईल" या नावाने ते ओळखले जाते. भव्यता ही या देवळाची खासियत आहे. देवळाची उंची दोनेकशे फूट, जवळपास कुतुब मिनार एवढी आहे. त्यावर शेकडो शिलालेख आहेत. त्या देवळाच्या भिंतीवर १८०३ साली डिसेंबर महिन्यात सर्फोजीराजांच्या प्रेरणेने एक अतिभव्य मराठी शिलालेख कोरण्यात आला. तो पुढे "भोसलवंशचरित्र" या नावाने प्रसिद्ध झाला. यात शहाजीराजांपासून ते सर्फोजीराजांपर्यंत एकूणच भोसले घराण्याचा इतिहास आलेला आहे. शिलालेखाची लांबी सहज दीडदोनशे मीटर असेल. अखिल भारतातील हा सर्वांत मोठा शिलालेख आहे.

तंजावरच्या राज्यात अनेक "कुरवंजी" अर्थात नाटकांची निर्मिती झाली. अनेक कुरवंजी मराठीत असत. मराठी नाटकांची निर्मिती विष्णुदास भाव्यांपासून झाली हे विधान महाराष्ट्रापुरते ठीकच आहे, परंतु तंजावरातील कुरवंजी पाहिले तर दिसून येते की हा उगमाचा काळ भाव्यांपेक्षा शंभरेक वर्षे तरी सहजच मागे जातो. देवेंद्र कुरवंजीसारख्या सर्फोजीकृत नाटकात भूगोलाचेही वर्णन येते. त्यातला सूत्रधार आपल्या बायकोला जगात किती खंड आणि त्यात किती देश आहेत ते सांगत असतो. युरोपात "इंग्ल्यांड स्काटल्यांड ऐसे देश" आहेत असे सांगतो तेव्हा ते वाचून मौज वाटल्याशिवाय रहात नाही.

सर्फोजीराजांनी सरस्वती महाल नामक ग्रंथालयाची स्थापना केली. यात प्रामुख्याने मराठी, तमिळ, तेलुगु व संस्कृत भाषांमधील हजारो ग्रंथ आहेत. त्या ग्रंथसूचीचेच पन्नासेक खंड आहेत. शिवाय मोडी लिपीतील लाखो कागद आहेत. तमिळ विद्यापीठ तंजावर व सरस्वती महाल या दोन्ही ठिकाणी मिळून कमीतकमी दहा लाख मोडी कागदपत्रे उपलब्ध आहेत. त्यांपैकी खूप थोड्या कागदपत्रांचा अभ्यास आजवर झालेला आहे. जुन्या पद्धतीने ग्रंथालयाची रचना केलेली असल्यामुळे तिथल्या कर्मचाऱ्यांचे हुद्दे "तमिळ पंडित", "मराठी पंडित", असे आहेत. तिथे अनेक संशोधक येऊन काम करतात. ग्रंथालयाची स्वत:ची प्रकाशनसंस्थाही असून त्याद्वारे अनेक ग्रंथ आजवर प्रकाशित करण्यात आलेले आहेत. तंजावर भागात रामदासी पंथाचेही अनेक मठ खूप अगोदरपासून आहेत. पैकी भीमस्वामींचा मठ तंजावर शहरातच आहे. शिवाय अन्य जवळपासच्या शहरांतही कैक मठ आहेत.

(तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथालयातील प्राचीन ग्रंथ)
तंजावरचे राज्य खालसा झाल्यावरही कैक वर्षे तिथे महाराष्ट्रीय मंडळींची संख्या काही लाखांपर्यंत होती. त्यांमधील काही लोक पुढे बडोदा इ. संस्थानांचे दिवाणही झाले. पुढे नोकरीधंद्यापायी खूप कुटुंबांनी स्थलांतर केल्यामुळे आजमितीस खुद्द तंजावर शहरात मराठी लोकांची संख्या कमी आहे- हैदराबादेतही कैक तंजावरी मराठी समाज आहे. तरी ते आपल्या प्रथापरंपरांना घट्ट धरून आहेत. विशेषत: शिवजयंती आणि गणेशोत्सव हे दोन सण मराठी समाज दणक्यात साजरे करतो. तमिळनाडू मराठा असोसिएशनसारख्या संस्थांच्या माध्यमातून समाजाकरिता अनेक कामे करण्यात येतात. विशेष उल्लेखनीय म्हणजे तंजावरी मराठी भाषा जपण्याकरिता त्यांनी "माजा गाव" नामक व्हिडिओ पॉडकास्ट काढलेले आहे. महाराष्ट्रातून खूप जुन्या काळी स्थलांतर केल्यामुळे तंजावरी मराठीचे रूप आजच्या मराठीपेक्षा अतिशय वेगळे आहे. बोलायचा लहेजा बऱ्यापैकी दाक्षिणात्य आहे, शब्दसंपदाही अंमळ जुन्या वळणाची आहे. ऐकायला ती भाषा फार गोड वाटते.

तंजावरच्या राजघराण्यानेही आपला सांस्कृतिक वारसा जपण्याकरिता प्रयत्न केलेले आहेत. बृहदीश्वरर मंदिराच्या व्यवस्थापनापासून त्यांनी अनेक गोष्टी केलेल्या आहेत. तंजावर मराठा पॅलेसमध्ये त्यांचे एक खाजगी संग्रहालयही आहे. सध्याचे युवराज प्रतापसिंह राजेभोसले यांनी "कॉट्रिब्यूशन्स ऑफ तंजावर मराठा किंग्ज" या नावाचे पुस्तकही लिहिले आहे. महाराष्ट्रापासून शेकडो किलोमीटर दूर, ऐन तमिळ मुलुखात शेकडो वर्षे राहून, स्थानिक भाषा व संस्कृतीशी जुळवून घेत आपली वेगळी ओळख कायम राखणाऱ्या आणि मराठीचा झेंडा आजही तिथे फडकत ठेवणाऱ्या सर्व तंजावर मराठी बंधुभगिनींचा अख्ख्या महाराष्ट्राला अभिमान आहे. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने हा जुना स्नेहबंध अजून दृढ व्हावा अशी अशा करायला हरकत नाही. अफाट तांत्रिक प्रगतीच्या या काळात ते सहज शक्यही आहे. गरज आहे ती खुल्या दिलाने आपला इतिहास जाणून घेऊन तो जपण्याची.

(लेखक इतिहास अभ्यासक असून पुण्यात टीसीएस कंपनीत नोकरी करतात).

Web Title: Marathi Bhasha Din : Maharashtrian connection of South India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.