कोट्यवधी मराठे २४ डिसेंबरनंतर मुंबईत, मनोज जरांगे-पाटील यांनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 12:47 PM2023-12-02T12:47:51+5:302023-12-02T12:48:43+5:30

Maratha Reservation: कोणाच्या दबावाखाली येऊन शासनाने २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण दिले नाही तर कोट्यवधी मराठे मुंबईत धडकतील आणि शांततेचे हे आंदोलन तुम्हाला जड जाईल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला.

Maratha Reservation: Millions of Marathas in Mumbai after December 24, Manoj Jarange-Patil warned | कोट्यवधी मराठे २४ डिसेंबरनंतर मुंबईत, मनोज जरांगे-पाटील यांनी दिला इशारा

कोट्यवधी मराठे २४ डिसेंबरनंतर मुंबईत, मनोज जरांगे-पाटील यांनी दिला इशारा

जालना - अंतरवालीसह महाराष्ट्रात दाखल झालेले गुन्हे अद्याप मागे घेतलेले नाहीत. कोणाला अटक करणार नाही, असे आश्वासन दिलेले असताना लोकांना अटक केली जात आहे. कोणाच्या दबावाखाली येऊन शासनाने २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण दिले नाही तर कोट्यवधी मराठे मुंबईत धडकतील आणि शांततेचे हे आंदोलन तुम्हाला जड जाईल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला. आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी अंतरवाली सराटी येथे १७ डिसेंबर रोजी बैठक होणार असल्याचेही ते म्हणाले.

शहरातील पांजरपोळ मैदानावर शुक्रवारी जरांगे-पाटील यांची सभा झाली. धनगर आरक्षणाबाबत ते भूमिका स्पष्ट करत नाहीत. ज्या जाती ओबीसीत आहेत त्या जातींवरही त्यांनी अन्याय केला आहे, अशी टीका त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर केली. 

आता आम्ही दंड आणि मांड्या थोपटल्या आहेत. लेकरांच्या न्यायासाठी कोणत्याही टाेकाला जाऊ. मुंबईत येऊ; परंतु उग्र आंदोलन करणार नाही आणि शांततेचे आंदोलन तुम्हाला पेलणार नाही. आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आले असून, ३२ लाख मराठ्यांच्या घरात प्रमाणपत्र गेले आहे. त्यामुळे कोणीही उग्र आंदोलन करू नये. 
- मनोज जरांगे पाटील, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते

या प्रश्नांची द्या उत्तरे
अंतरवाली सराटीसह महाराष्ट्रात दाखल झालेले गुन्हे का मागे घेतले नाहीत, कोणालाही अटक करणार नाही, असे आश्वासन दिलेले असताना आमच्या लोकांना अटक का केली, एमसीआर मिळालेला असताना पीसीआर कसा काय घेतला, आमच्यावर हल्ला करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना का रुजू केले, या प्रश्नांची उत्तरे शासनाने द्यावीत, अशी मागणीही जरांगे-पाटील यांनी सभेत केली.  

कुचेंवरही हल्लाबोल 
जरांगे-पाटील यांनी भाजपचे आमदार नारायण कुचे यांच्यावरही हल्लाबोल केला. आंदोलनादरम्यान मध्यस्थीस तुम्ही आले होते; परंतु त्यांना दोन नावे कोणी दिली. बीडमधील मराठा बांधवांना धनंजय मुंडे गुंतवत असल्याचे आ. कुचे यांनी फोनवर सांगितल्याचा आरोप करत एमसीआरचा पीसीआर तुम्ही दोघांनी करायला लावला, असा संशय असल्याचेही ते म्हणाले. 

सभास्थळी उसळला लाखोंचा जनसमुदाय 
- १४० एकर मैदानावर सभेचे नियोजन करण्यात आले होते. १०० एकरांत पार्किंग आणि ४० एकरांत सभा झाली. गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे मैदान ओले झाले होते.
- परंतु अशा ओल्या मैदानावरही लाखोंवर मराठा समाजबांधवांनी शुक्रवारी सकाळपासून ते रात्री सभा होईपर्यंत हजेरी लावली होती.
- जरांगे पाटील यांचे जालना शहरात स्वागत झाल्यानंतर २० हजार दुचाकींसह युवकांची रॅली काढण्यात आली. यावेळी जरांगे पाटील यांचे सर्वधर्मीयांच्या वतीने स्वागत करण्यात आले.  

 

Web Title: Maratha Reservation: Millions of Marathas in Mumbai after December 24, Manoj Jarange-Patil warned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.