भात नुकसान भरपाई निकषात बदल करा, नीतेश राणे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2017 21:43 IST2017-10-30T21:42:31+5:302017-10-30T21:43:30+5:30
अवकाळी पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात शेतींचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी. तसेच नुकसान भरपाईसाठी असलेल्या शासनाच्या जाचक अटीत बदल करावा, यासह अन्य मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार नितेश राणे यांनी मुंबई येथील वर्षा या त्यांच्या निवासस्थानी सोमवारी भेट घेतली.

भात नुकसान भरपाई निकषात बदल करा, नीतेश राणे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
कणकवली - अवकाळी पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात शेतींचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी. तसेच नुकसान भरपाईसाठी असलेल्या शासनाच्या जाचक अटीत बदल करावा, यासह अन्य मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार नितेश राणे यांनी मुंबई येथील वर्षा या त्यांच्या निवासस्थानी सोमवारी भेट घेतली. तसेच त्याना मागण्यांचे निवेदन दिले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या अखेर पासून दररोज पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे भात शेतीचे फार मोठे नुकसान झाले आहे. दरवर्षी भात शेतीचे नुकसान होते. मात्र, शासनाच्या नुकसान भरपाईच्या अटी व निकषामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पासून वंचित रहावे लागते. त्यामुळे सिंधुदुर्गात मुख्य पिक असलेल्या भातशेती खालील क्षेत्रामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात घट होत आहे.
यावर्षी 63000 हेक्टर क्षेत्र भातशेतीखाली येणे अपेक्षित असताना फक्त 53,320 हेक्टर क्षेत्रामध्ये भातशेतीची लागवड करण्यात आली. म्हणजे सुमारे 10000 हेक्टर भातशेतीचे क्षेत्र कमी झाले आहे. असेच यापुढेही चालु राहिल्यास शेतकरी भविष्यात भाताचे पिक घेणे बंद करतील की काय?असा प्रश्न निर्माण होण्यासारखी स्थिति निर्माण झाली आहे.
केंद्र शासनाच्या शेतीला द्यायच्या नुकसान भरपाईबाबतच्या निकषानुसार एकाच दिवशी 65 मिमी पाऊस पडल्याची नोंद ज्या गावामध्ये होते त्याठिकाणी 16000 रूपये नुकसान भरपाई देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. परन्तु सध्या कोकणात पडणारा पाऊस हा एकाच दिवशी 65 मिमी न पड़ता दरदिवशी 25 ते 30 मिमी पड़त आहे. त्यामुळे शासनाच्या निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकत नाही.
त्यामुळे नुकसान भरपाई मिळण्यासाठी एका दिवसात 65 मिमी पाऊसा ऐवजी सलग तिन दिवस पडणाऱ्या पावसाची नोंद 65 मिमी पेक्षा अधिक असेल तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल,असा सुधारित निर्णय व्हावा. अशी मागणी आमदार नीतेश राणे यांनी यावेळी केली.