गोवर-रुबेला मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी लसीकरण मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभागी व्हावे - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 04:28 PM2018-11-27T16:28:37+5:302018-11-27T16:32:44+5:30

महाराष्ट्राला गोवर-रुबेला सारख्या घातक आजारांपासून मुक्त करण्यासाठी सामान्य नागरिकांनी लसीकरणामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा आणि मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले.

Maharashtra government launches campaign against measles, rubella | गोवर-रुबेला मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी लसीकरण मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभागी व्हावे - मुख्यमंत्री

गोवर-रुबेला मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी लसीकरण मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभागी व्हावे - मुख्यमंत्री

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्राला गोवर-रुबेला आजारांपासून मुक्त करण्यासाठी लसीकरण मोहिमेत सहभागी व्हाआजपासून सहा आठवडे राज्यात सर्वत्र लसीकरण मोहीम'महाराष्ट्र झिरो मिझेल्स व झिरो रुबेला करण्यासाठी या मोहिमेत सहभागी व्हा'

मुंबई : महाराष्ट्राला गोवर-रुबेला सारख्या घातक आजारांपासून मुक्त करण्यासाठी सामान्य नागरिकांनी लसीकरणामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा आणि मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले.

विधानभवनाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात गोवर-रुबेला प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विधानपरिषद सभापती राजराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, मुंबईचे पालक मंत्री तथा उद्योग मंत्री सुभाष देसाई, आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी लसीकरण करण्यात आलेल्या 14 बालकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, देशात दरवर्षी हजारो बालके गोवर आणि रुबेला आजारामुळे मुत्यूमुखी पडतात. आपल्या बालकांमधील प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी लसीकरण आवश्यक असून युवा पिढी सुदृढ व्हावी यासाठी पालकांनी लसीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या मुलांना लस द्यावी. ही मोहीम सार्वजनिक आरोग्य विभाग, नगरविकास विभाग, महिला व बालकल्याण विभाग, आदिवासी विकास विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आदी विभागांच्या समन्वयातून सुरु करण्यात आली आहे. प्रत्येक विभागाने आपले योगदान देऊन मोहीम यशस्वी करावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. या मोहीमेचे यशस्वी नियोजन केल्या बद्दल मुख्यमंत्र्यांनी आरोग्य मंत्री तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी यांचे अभिनंदन करीत लसीकरण केलेल्या बालकांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र झिरो मिझेल्स व झिरो रुबेला करण्यासाठी या मोहिमेत सहभागी व्हा - आरोग्यमंत्री
आरोग्य मंत्री यावेळी म्हणाले की, केंद्र शासनाच्या साहाय्याने गोवर रुबेला लसीकरण हा महत्वाकांक्षी प्रकल्प आपण शहरी व ग्रामीण भागात सुरू केला आहे. 9 महीने ते 15 वर्षाखालील सुमारे 3 कोटी 38 लक्ष बालकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ही लस सुरक्षित आहे. तसेच यापूर्वी ही लस घेतली असल्यास देखील या मोहिमेत लस टोचून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. सध्या ही मोहीम 20 राज्यांमध्ये राबविली जात असून प्रथम सत्रात शालेय स्तरावर लसीकरण करण्यात येणार आहे. शिक्षकांनी व पालकांनी कर्तव्यदक्ष आणि जागरूक होऊन आपल्या बालकांचे लसीकरण झाले असल्याची खात्री करावी असे आरोग्यमंत्री या वेळी म्हणाले.

राज्यात सर्वत्र सरकारी, खासगी शाळांमध्ये, अंगणवाडी, सरकारी दवाखाने, आरोग्य उपकेंद्रे यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. गोवर चे उच्चाटन व रुबेला वर नियंत्रण असे २०२० पर्यंतचे लक्ष्य समोर ठेऊन ही राज्यव्यापी मोहिम सुरु करण्यात आली आहे.
यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त अनुपकुमार यादव, संचालक संजीव कांबळे आदी उपस्थित होते.

अशी आहे लसीकरण मोहीम
- आजपासून सहा आठवडे राज्यात सर्वत्र लसीकरण मोहीम.
- 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील बालकाचे लसीकरण करणे आवश्यक
- शाळा, सरकारी दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्रे यांवर मोफत लसीकरण उपलब्ध
- या आधी गोवर/ एम आर / एमएमआर लस दिली असल्यास पुन्हा या मोहिमेत लसीकरण करणे आवश्यक.
- पुन्हा लसीकरणाने कोणतेही दुष्परिणाम होणार नाही.
- एक गोवर-रुबेला लस करते, दोन आजारांवर मात

Web Title: Maharashtra government launches campaign against measles, rubella

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.