वृक्षसंवर्धनाच्या उद्दिष्टाला ‘खो’

By admin | Published: July 22, 2014 10:13 PM2014-07-22T22:13:13+5:302014-07-22T22:13:13+5:30

वृक्षरोपणावर पैशासारखा पाऊस, सहा वर्षात २९७.३८ कोटींचा खर्च, वनक्षेत्र वाढीचा दुष्काळ कायमच,

'Lose' for tree conservation | वृक्षसंवर्धनाच्या उद्दिष्टाला ‘खो’

वृक्षसंवर्धनाच्या उद्दिष्टाला ‘खो’

Next

वाशिम: वृक्षारोपणावर कोट्यवधी रुपयांचा पाऊस पाडला जात आहे तर दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या वृक्षांची अवैध कटाई सुरूच आहे. वृक्षरोपणाचे उद्दिष्ट देणारी यंत्रणा वृक्षसंवर्धनाच्या उद्दिष्टाला मात्र 'खो' देत आहे. वृक्षरोपणाचा गाजावाजा करणार्‍या यंत्रणेने वृक्ष संवर्धनही गांभीर्याने घेतले तर वनराईच्या घटणार्‍या प्रमाणाला आळा बसल्याशिवाय राहणार नाही.
समतोल निसर्गचक्रावरच आपले अस्तित्व असल्याच्या जाणीवेचा मानवाला विसर पडत चालल्याने पर्यावरणाचे ताळतंत्र बिघडत असल्याचा अनुभव जीवसृष्टी पदोपदी घेत आहे. भूमीच्या पोटात शिरून मानवाने अनेक धातू शोधून काढले, कृत्रिम पाऊस पाडला. काही प्रमाणात मानवाने निसर्गावर विजयही मिळविला. मात्र, असे करताना त्याचे पर्यावरण संवर्धनाकडे दुर्लक्ष होत गेल्याने पर्यावरण प्रदुषित झाले. प्रदुषित पर्यावरणाचे गंभीर परिणाम मानव भोगत आहे. गरजांची पुर्तता आणि भौतिक सुख-संपन्नतेसाठी निसर्गाला संकटात टाकून स्वत:ला सुरक्षित समजणार्‍या मानवाला आता भूतलावरील आपल्या अस्तित्वासाठी पर्यावरणाचे संरक्षण करणे अनिवार्य ठरू पाहत आहे. वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवी जीवनात अनेक चांगले बदल होत असले तरी त्याचे काही वाईट परिणामही मानवाला भोगावे लागत आहेत. उन्हाळ्यात अवकाळी पाऊस आणि पावसाळ्यात उन्हाचा उकाडा, हे बनू पाहणारे समिकरण पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालल्याचे द्योतक ठरत आहे. वनविभागाच्या लेखी वाशिम जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ५१८४ चौ.कि.मी. असून त्यापैकी केवळ पाच टक्क्याच्या आसपास वनराई डोलत आहे. वनक्षेत्राचा आकडा फुगविण्यासाठी दरवर्षी विविध विभागाच्या सहकार्यातून वृक्षारोपण मोहीम राबविली जाते. मात्र, वृक्ष संवर्धनासाठी ठोस उपाययोजना नसल्याने 'जीवंत' झाडांची संख्या अपेक्षेपेक्षाही कमीच राहत असल्याचे आकडेवारी सांगते. २0१३ या वर्षात जिल्ह्यात सात लाख ४७ हजार रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ठ होते. वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केले जाते. मात्र, वृक्ष संवर्धनाचे उद्दिष्टच नसल्याने 'जीवंत' झाडांची संख्या गुलदस्त्यातच आहे. एकिकडे वृक्षारोपण तर दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या वृक्षांवर ह्यकुर्‍हाडह्ण कोसळली जात असल्याने वनराईचे प्रत्यक्षातील प्रमाण 'जैसे थे'च राहत आहे. पर्यावरण र्‍हासाच्या संभाव्य धोक्याच्या पृष्ठभूमीवर पर्यावरण संवर्धन करणे, काळाची गरज बनले आहे. प्राचीन काळी निसर्ग नियमांच्या चौकटीत राहणार्‍या मानवाने आता सदर चौकटी उद्ध्वस्त करण्याचा जणू सपाटाच लावला आहे. निसर्गावर नानाविध प्रयोग करीत वर्तमानाशी जुळवून घेताना त्याचे भविष्याकडे पार दुर्लक्ष होत गेले आणि येथूनच खर्‍या अर्थाने पर्यावरण र्‍हासाची प्रक्रिया सुरू झाली. मानवाने आपल्या दैनंदिन व अनावश्यक गरजा भागविण्यासाठी निसर्गाशी खेटे घेण्यातदेखील मागे-पुढे पाहिले नाही. वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवी जीवनात अनेक चांगले बदल होत असले तरी त्याचे काही वाईट परिणामही मानवाला भोगावे लागत आहेत. मानवाने आपल्या या वर्तनात बदल केले नाहीत तर पर्यावरणच मानवी जीवन बदलवून टाकेल.

Web Title: 'Lose' for tree conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.