आरोपांच्या फैरी झडल्या आणि सगळेच निर्दोष मुक्त झाले! मुनगंटीवार, रावते, विखे, पाटील यांची उलटतपासणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 05:51 AM2018-07-14T05:51:13+5:302018-07-14T05:54:21+5:30

लोकमततर्फे आयोजित विधानसभा आणि विधान परिषदेत सर्वाेत्कृष्ट कार्य करणाऱ्या आमदारांना ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. नागपूरच्या वसंतराव देशपांडे सभागृहात रंगलेल्या या पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी लोकमत वाचकांच्या वतीने चार प्रमुख पक्षांच्या नेत्यांवर आरोप ठेवले

Lokmat Ki Adalat : accusations and everyone was acquitted! | आरोपांच्या फैरी झडल्या आणि सगळेच निर्दोष मुक्त झाले! मुनगंटीवार, रावते, विखे, पाटील यांची उलटतपासणी

आरोपांच्या फैरी झडल्या आणि सगळेच निर्दोष मुक्त झाले! मुनगंटीवार, रावते, विखे, पाटील यांची उलटतपासणी

googlenewsNext

लोकमततर्फे आयोजित विधानसभा आणि विधान परिषदेत सर्वाेत्कृष्ट कार्य करणाऱ्या आमदारांना ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. नागपूरच्या वसंतराव देशपांडे सभागृहात रंगलेल्या या पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी लोकमत वाचकांच्या वतीने चार प्रमुख पक्षांच्या नेत्यांवर आरोप ठेवले आणि त्या आरोपातून सुटका करून घेण्यासाठी वित्तमंत्री व भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार, परिवहन मंत्री व शिवसेनेचे नेते दिवाकर रावते, विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या चारही नेत्यांनी धमाल उत्तरे देत, स्वत:ची सुटका करून घेतली. या अनोख्या खटल्याच्या वेळी सभागृहात स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सभापती रामराजे नाईक निंबाळकर, अध्यक्ष हरिभाऊ बागडे, लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा आणि संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांची उपस्थिती होती. त्याचाच हा विस्तृत वृत्तांत.


अ‍ॅड. निकम : नाणार प्रकल्प व बुलेट ट्रेन प्रकल्पाला शिवसेनेचा प्रखर विरोध आहे. आपण तो तडीस नेण्याचे केंद्र सरकारला अभिवचन दिल्याचे ऐकिवात आहे. हे प्रकल्प मी लादणार नाही. तर चर्चेने मार्ग काढू असे आपण जाहीररीत्या सांगत असता. २०१९ च्या आत या प्रकल्पांची कामे सुरू होतील का?

मुख्यमंत्री फडणवीस : बुलेट ट्रेनचे काम गुजरातेत सुरू झाले आहे. आपल्याकडे चर्चा सुरू आहे. लोकसंवादातूनच प्रकल्प करण्यावर आमचा भर आहे. नागपूर-मुंबई समृध्दी मार्ग करताना आम्ही नागरिकांशी संवाद केला. ९३ टक्के जमीन संमतीनेच मिळाली आहे. नागरिकांच्या मनातली भीती काढण्याचा प्रयत्न आहे. तशीच ती नाणारबाबतीत आहे. शिवसेनेशी चर्चा सुरू आहे. दोघांच्या मनातील भीती काढू. संवाद संपलेला नाही. मी सर्वांना मनविण्याचा, शंका दूर करण्याचा प्रयत्न करेन.

स्वतंत्र विदर्भ राज्य व्हावे की होऊ नये? / पर्याय - १) व्हावे २) होऊ नये
सुधीर मुनगंटीवार यांनी होकार दिला. विखे पाटील यांनी आम्ही जनतेच्या भावनांबरोबर असल्याचे सांगितले. तर जयंत पाटील यांनी आधी सरकारच्या माध्यमातून विदर्भाचा विकास करावा व नंतर बघावे, असे सुचविले. दिवाकर रावते यांनी मात्र ठामपणे अखंड महाराष्ट्राची भूमिका मांडत शिवसेनेचा वेगळ्या विदर्भाला असलेला विरोध नोंदविला. त्यावर सभागृहातून जय विदर्भचा नारा बुलंद झाला.

अ‍ॅड. निकम : विरोधात असतांना भाववाढ झाली की आपला पक्ष आंदोलने करत असे. परंतु आज भाडेवाढ होताना आपण गप्प आहात, कारण आपण सत्तेत आहात आणि विरोधकांच्या आंदोलनांना धार येत नाही. काय सांगाल ?

मुख्यमंत्री फडणवीस : आम्ही एवढी वर्षे विरोधात होतो. त्यामुळे आता सत्ता मिळाली तरी आमच्यातला विरोधकांसारखे वागण्याचा गुण अजून गेलेला नाही आणि विरोधक एवढी वर्षे सत्तेत होते. त्यामुळे ते अजूनही विरोधात राहूनही सत्तापक्षासारखे वागत आहेत. पण आता विरोधकांना पुढेही बराच काळ विरोधी पक्षात राहायचे आहे. त्यामुळे त्यांनी विरोधी पक्षाने कसे वागले पाहिजे त्यासाठीचे गुण आमच्याकडून घेतले पाहिजेत.

गुन्हेगारी राजकारण्यांच्या उदात्तीकरणावर सगळ्यांनीच हात झटकले
अ‍ॅड. निकम : निवडणुका जवळ आल्या की उड्या मारण्याचा खेळ सुरू होतो. यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले समाजकंटक आणि गुन्हेगारही असतात. आपल्या सर्व पक्षांवर असा आरोप आहे की, पक्षवाढीच्या नादात आपले पक्ष येईल त्याचे निर्माल्य करून घेतात व अशा लोकांना घेऊन आपण आपल्या पक्षाची सूज वाढवता; ताकद नाही... असा आपल्यावर आरोप आहे.
सुधीर मुनगंटीवार : निवडणूक लढण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्या अधिकाराचे हनन करू शकत नाही. माझ्यावरही केसेस आहेत, पण त्या राजकीय आहेत. पण खून, बलात्काºयांना आमचा पक्ष सामावून घेणार नाही.
विखे पाटील : दोन, तीन वर्षांत एका पक्षाने गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांचे उदात्तीकरण केल्याचे दुर्दैवी चित्र पाहायला मिळत आहे. राजकारणातील गुन्हेगारीकरण संपले पाहिजे. सर्वच पक्षांनी स्वत:साठी आचारसंहिता केली पाहिजे. काँग्रेसने कोणत्याही गुन्हेगाराला पक्षात घेतलेले नाही. गंभीर गुन्हा असलेली व्यक्ती निवडणूक लढण्यासाठी अपात्र ठरली पाहिजे.
जयंत पाटील : गंभीर गुन्हा असेल, दोषी असेल तर उमेदवारी देऊच नये.
दिवाकर रावते : शिवसेनेचा दरारा सर्वांनाच माहिती आहे. गुंडच आमच्यापासून घाबरून असतात. असे लोक आमच्यापर्यंत येतच नाहीत. (असे रावते म्हणताच सभागृहात शिवसेनेचे नारे लागले. टाळ्या पडल्या आणि हंशादेखील.)

सभागृहात कायदेच होतात!
विधिमंडळ हे कायदे तयार करण्याचे पवित्र सभागृह आहे. सभागृहात कागदी बोळ्यांचा मारा करणे, परस्परांवर धावून जाणे, राजदंड पळवणे, सभापती, अध्यक्षांच्या समोरील हौद्यात बैठक मारणे असे अनेक प्रकार आमदारांकडून घडताना दिसते. विधिमंडळे कायदे बनवण्यासाठी आहेत की गोंधळासाठी...?
हा प्रश्न अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना विचारला गेला.
यावर सभापती निंबाळकर म्हणाले, विधिमंडळ हे कायदे करण्यासाठीच असते यात शंका नाही. मात्र, जेवढे असंसदीय आहे तेवढेच आपल्याला का दिसते ? टीव्हीवर दाखविले जाते ते १० टक्केच असते. पण जर मंत्री रात्री १२ पर्यंत थांबून उत्तरे देत असतील तर हे सभागृह नक्कीच कायदे करण्यासाठी आहे, असे म्हणावे लागेल. राजेंद्रबाबूंनी येथे सांगितलेले आपण विसरलात का? की ते स्वत: रात्री साडेबारा पर्यंत बसून विधेयकावर चर्चा करत होते ते... तर अध्यक्ष बागडे म्हणाले, हे कायदे मंडळ आहे. पण काही वेळा गोंधळ होतो. पण असे अपवादात्मक घडते. दररोज काही गोंधळ होत नाही. कायदे करण्याचे कामही होतेच.

धमाल रॅपिड फायर राउंड आणि तेवढीच धमाल उत्तरे

रॅपिड फायर राउंड खूप गाजला. त्यात एक कॉमन प्रश्न सगळ्यांना विचारला गेला. त्याचे उत्तर एका शब्दात द्यायचे होते. त्याची उत्तरे अशी आली.

१) ज्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले जाईल त्या दिवशीचा पगार आमदारांना देऊ नये?
- पगार द्यावा
- पगार देऊ नये
च्मुनगंटीवार, विखे पाटील व रावते यांनी पगार द्यावा, असे उत्तर दिले. तर जयंत पाटील यांनी पहिल्या सत्रात गोधळ झाला तर देऊ नये व दुसºया सत्रात झाला तर द्यावा, अशी भूमिका मांडली. यावर खटला हरला तर तुम्ही वकील फी परत देता का, असा चिमटा सुधीर मुनगंटीवार यांनी अ‍ॅड. निकम यांना घेतला आणि त्यात निकम यांचीच विकेट गेली.
२) राज्यात सगळ्यात प्रभावी विरोधी पक्ष कोणता? आॅप्शन होते...
- राष्टÑवादी
- काँग्रेस
- शिवसेना
च्विखे पाटील यांच्यासह मुनगंटीवार व रावते यांनीही काँग्रेसला मत दिले. तर जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचा झेंडा उचलून धरला. यावर अ‍ॅड. निकम यांनी, म्हणजे भाजपा राष्टÑवादीला विरोधी पक्ष मानत नाही, अशी कोपरखळी मारली.
३) काँग्रेस, राष्टÑवादीची आघाडी झाली आणि ती सत्तेवर आली तर मुख्यमंत्रिपद कोणाला मिळेल. (हा प्रश्न राधाकृष्ण विखे आणि जयंत पाटील यांना विचारला गेला)
- अजितदादा
- सुप्रियाताई
- पृथ्वीराज चव्हाण
- अशोक चव्हाण
च्यावर विखे पाटील यांनी निवडून आल्यावर पाहू, असे सांगत थेट उत्तर देणे टाळले. अ‍ॅड. निकम यांनी राष्ट्रवादीकडून दिलेल्या पर्यायांमध्ये जयंत पाटील यांचे नाव नव्हते. पण जयंत पाटीलही होऊ शकतात, असे लोकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा म्हणाले. मात्र त्यावर जयंत पाटील यांनी ज्यांची नावे चर्चेत येतात ते कधीच मुख्यमंत्री होत नाहीत, असे मिश्कील उत्तर देताच सभागृहात हास्याचा स्फोटच झाला.
४) भाजपा-शिवसेनेची युती झाली आणि ती सत्तेवर आली तर मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होईल? (हा प्रश्न सुधीर मुनगंटीवार आणि दिवाकर रावते यांना विचारण्यात आला) त्यांना पर्याय दिले होते -
- देवेंद्र फडणवीस
- उद्धव ठाकरे
- सुधीर मुनगंटीवार
च्या प्रश्नावर मुनगंटीवार म्हणाले, ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री होईल. भाजपाचे जास्त सदस्य विजयी झाले तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर रावते यांनी पुन्हा भाजपाशी युती होण्याचा प्रश्नच नाही, असे मुख्यमंत्र्यांसमक्ष ठणकावून सांगितले. शिवसेना स्वबळावर महाराष्टÑ जिंकेल व उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील, असा दावा त्यांनी केला. रावतेंचे उत्तर ऐकून विखे पाटील व जयंत पाटील यांनी भाजपा एवढी अगतिक का झालीय, असा चिमटा घेतला. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगेच ‘एवढी वर्षे सोबत राहूनही तुम्ही त्यांच्यावर (रावतेंवर) विश्वास ठेवता का’ असा टोला जयंत पाटलांना लगावला आणि सभागृह हास्यकल्लोळात बुडून गेले.

 


समारंभात मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, खासदार डॉ. विकास महात्मे, विधिमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे, आ. प्रताप सरनाईक, आ. हरिभाऊ राठोड, आ. संजय दत्त, आ. नितेश राणे, आ. सुभाष सबाने, आ. ज्ञानराज चौगुले, आ. ख्वाजा बेग, आ. सुधाकर देशमुख, आ. सुधाकर कोहळे, आ. सुरेश धस, आ. पंकज भोयर, आ. अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, आ. विप्लव बाजोरिया, आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. कृष्णा गजभिये, आ. प्रकाश गजभिये, आ. विद्या चव्हाण, आ. अ‍ॅड. आशिष शेलार, आ. प्रा. अनिल सोले, आ. देवराव होली, आ. भाई गिरकर, आ. स्मिता वाघ, आ. सतेज पाटील, आ. डॉ. आशिष देशमुख, आ. सुनील शिंदे, आ.डॉ. परिणय फुके, आ. हेमंत पाटील, आ. विश्वजीत कदम, आ. वीरेंद्र जगताप, आ. अनिल कदम, आ. शिरीष चौधरी, आ. डॉ. राहुल पाटील, आ. शशिकांत खेडेकर, आ. रमेश बुंदिले, आ. सुनील प्रभू, आ. गोपालदास अग्रवाल, आ. देवयानी फरांदे, आ. दीपक चव्हाण, आ. सरदार ताराचंद, आ. किशोर आप्पा पाटील, आ. प्रताप सरनाईक, आ. सचिन अहिर, आ. भाऊराव कांबडे, आ. सुरेश दास, आ. समीर कुणावार, आ. योगेश सागर, आ. संजय कुटे, आकांक्षा यशोमती ठाकूर, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री रमेश बंग, माजी आ. दीनानाथ पडोळे. डीआयजी (एसआरपीएफ) संदीप कर्णिक, अतिरिक्त पोलीस आयुक्त श्याम दिघावकर, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, पोलीस उपायुक्त राहुल माखनीकर, पोलीस उपायुक्त राकेश ओला, प्रदेश काँग्रेसचे सचिव डॉ. बबनराव तायवाडे, अतुल कोटेचा यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Lokmat Ki Adalat : accusations and everyone was acquitted!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.