...तर मोदींना काळ्या पाण्याची शिक्षा करावी लागेल - काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 05:05 PM2019-04-17T17:05:02+5:302019-04-17T17:08:04+5:30

पाच वर्ष खोटं बोलून जनतेची फसवणूक केली, त्याबद्दल नरेंद्र मोदी यांना काळ्या पाण्याचीच शिक्षा द्यावी लागेल असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाला लगावला आहे. 

Lok Sabha elections 2019 : Congress Spokesperson Sachin Sawant criticism on BJP | ...तर मोदींना काळ्या पाण्याची शिक्षा करावी लागेल - काँग्रेस

...तर मोदींना काळ्या पाण्याची शिक्षा करावी लागेल - काँग्रेस

googlenewsNext

मुंबई - सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून माफीची अपेक्षा करणाऱ्या भाजपच्या विनोद तावडे यांनी आधी नोटाबंदीमुळे जनतेला जो त्रास सहन करावा लागला तसेच पाच वर्ष खोटं बोलून जनतेची फसवणूक केली, त्याबद्दल नरेंद्र मोदी यांना काळ्या पाण्याचीच शिक्षा द्यावी लागेल असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाला लगावला आहे. 

सचिन सावंत म्हणाले की, नोटाबंदीच्या त्रासाबद्दल नरेंद्र मोदी यांना कोणत्या चौकात शिक्षा द्यायची त्याचे उत्तर द्यावे, जनता वाट पाहत आहे. पन्नास दिवस द्या त्यानंतर जनता सांगेल ती शिक्षा भोगायला तयार असल्याचे मोदी म्हणाले होते त्याचे काय झाले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण यांच्यावर केलेल्या टीकेला सचिन सावंत यांनी उत्तर दिले आहे.

अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांनी भावनिक आवाहन करत मतं मागत आहेत, विकासकामं केली असती तर त्यांच्यावर अशी वेळ आली नसती असा आरोप विनोद तावडे यांनी केला होता. या आरोपाला उत्तर देताना सचिन सावंत यांनी विकास कामं केली नसती तर नांदेड महानगरपालिका निवडणुकीत जनतेने काँग्रेसला भरभरून मतं दिली नसती, भाजपने सर्वशक्ती लावूनही नांदेडमध्ये त्यांचे काय झाले हे कदाचित तावडेंना आठवत नसेल, असा टोला लगावला.

महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात सोलापूरचे दोन मंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत, महानगरपालिकेवरही भाजपची सत्ता आहे, तरीही शहराला पाच दिवसाआड पाणी पुरवठा का होतो? स्मार्ट सिटीअंतर्गत सोलापुरचा काय विकास केला हेही विनोद तावडेंनी सांगावे अशी मागणी काँग्रेसने केली. 
सुशीलकुमार शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते, केंद्रीय गृहमंत्री होते, कॉंग्रेस परिवाराच्या जवळ होते मग जे तुम्ही सोलापूरचे प्रश्न आज मांडत आहेत ते आतापर्यंत तुम्ही का सोडवू शकला नाहीत या प्रश्न भाजपाकडून विचारण्यात आला होता त्यावर काँग्रेसने  सुशीलकुमार शिंदे यांनी काय विकास केला हे सोलापूरच्या जनतेला माहीत आहे. भाजपसारखी जुमलेबाजी काँग्रेसने केलेली नाही. पराभव दिसू लागल्यामुळे भाजपचे नेते सैरभैर झाले आहेत, त्यातूनच विरोधकांवर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत असा आरोप सचिन सावंत यांनी भाजपावर केला.

Web Title: Lok Sabha elections 2019 : Congress Spokesperson Sachin Sawant criticism on BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.