राजाने मारले; निसर्गाने अव्हेरले!

By Admin | Published: January 6, 2015 11:22 PM2015-01-06T23:22:55+5:302015-01-08T00:05:55+5:30

रावसाहेब दानवे हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष झाले या बातमीने हुरळून जाण्यासारखे काही नाही; पण मराठवाड्याच्या भाजपामध्ये याचाही आनंद होत आहे.

The king killed; Nature has availed! | राजाने मारले; निसर्गाने अव्हेरले!

राजाने मारले; निसर्गाने अव्हेरले!

googlenewsNext

रावसाहेब दानवे हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष झाले या बातमीने हुरळून जाण्यासारखे काही नाही; पण मराठवाड्याच्या भाजपामध्ये याचाही आनंद होत आहे. हा आनंद का होतोय, याचे भान नाही. आपला हा उगाचच कशातही आनंद वाटावा. दानवे सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात आहेत. मंत्री होऊन उणे-पुरे सहा महिने झाले नाहीत तोच त्यांचे नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत आणले गेले. वास्तविक दोन वर्षांपूर्वी जेव्हा देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष बनले, त्याच वेळी दानवे यांचेही नाव होते आणि ते स्वत: उत्सुकही होते. दानवे हे गेल्या तीस वर्षांपासून सक्रिय राजकारणात आहेत. विधानसभा आणि लोकसभा असा प्रतिनिधी म्हणून प्रदीर्घ अनुभव गाठीशी आहे. साखर कारखानदारीचा अभ्यास आहे. अवघड परिस्थितीत साखर कारखाना चालविण्याचा अनुभव आहे. शिवाय ते कोणत्याही वादात सहसा अडकत नाहीत. असे असताना त्यांना वरून खाली पाठविणे ही काही २ + २ = ४ अशी सरळ प्रक्रिया नाही. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींना काम करणारी अभ्यासू, धडाडीची आणि दृष्टी असणारी माणसे हवी आहेत आणि नेमका त्याचा दुष्काळ भाजपाकडे दिसतो. म्हणूनच मनोहर पर्रीकर, सुरेश प्रभंूसारखी माणसे त्यांनी उचलली. दानवे हे त्या चौकटीत बसणारे ‘स्मार्ट’ नाहीत की त्यांच्याकडे शोमनशिप नाही. मराठवाड्याचा रांगडा गडी असेच म्हणता येईल. दिल्लीच्या दरबारी राजकारणाचे रीतीरिवाज कळत नसतील, फर्डे इंग्रजी बोलता येत नसेल; पण मंत्रीपदाची ही काही पात्रता नाही. तसे पाहिले तर हिंदुत्ववादाची मुक्ताफळे उधळणाऱ्या साध्वी निरंजना ज्योती यांच्यासारखी बरीच मंडळी मंत्रिमंडळात आहेत. दानवेंना प्रदेशाध्यक्ष केल्यास केंद्रात मराठवाड्याचे प्रतिनिधित्व कोण करणार, हा प्रश्नच आहे. दानवेंच्या माध्यमातून मराठवाड्यातील रेल्वेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागू शकतात, शिवाय संसदीय कामकाजाचा अनुभव लक्षात घेऊन या भागाच्या विकासाला ते गतिमान करू शकतात. त्यांचे मंत्रिमंडळातून जाणे ही गोष्ट मराठवाड्यासाठी फायद्याची निश्चित नाही.
भाजपाचे प्रदेशाध्यक्षपद त्यांना देण्याचा घाट घालण्यात आला; पण त्यामुळे या प्रदेशाचे काय भले होणार? केंद्रात आणि राज्यात भाजपा सत्तेवर आहे. विरोधी पक्ष असणारा काँग्रेस मरगळ आणि निराशेतून अवसान गमावून बसलेला दिसतो. राष्ट्रवादी पक्षाची अवस्था लकवा झाल्यासारखी आहे. म्हणजे भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांसमोर कोणतेही आव्हान नाही. सध्या हे पद बिनकामाचे आहे आणि ते मराठवाड्याच्या माथी मारले जाते. आठवड्यात पैठण तालुक्यातील केकतजळगावच्या हनुमंत बनकर या शेतकऱ्याने आत्महत्या केली. आत्महत्या करणारा हनुमंत हा काही मराठवाड्यातील पहिला शेतकरी नाही. गेल्या वर्षभरातच ५११ आत्महत्या झाल्या, याचा अर्थ समाजाच्या जाणिवा बोथट झाल्या असेच म्हणावे लागेल. मराठवाडा दुष्काळी, पाण्याची टंचाई कायमची; पण गेली तीन वर्षे नापिकीने पाठ सोडली नाही. ‘तीन तिघाडा काम बिघाडा’ अशा अवस्थेत मराठवाडा सापडला. दोन वर्षांपूर्वी भीषण दुष्काळाने काही पिकले नाही, गेल्या वर्षी अतिवृष्टीत सगळे मातीमोल झाले आणि यावर्षी पावसाने पाठ फिरविली. म्हणजे ये रे माझ्या मागल्या. याचाच परिपाक म्हणजे सरत्या २०१४ या वर्षात ५११ शेतकऱ्यांनी जीवन संपविले. ज्या हनुमंतचा उल्लेख केला, त्याची कहाणी कमी-अधिक फरकाने या सर्वांसारखीच. हनुमंतला विहिरीसाठी ‘मनरेगा’तून १ लाख ९० हजार रुपये शेतात विहिरीसाठी मंजूर झाले होते. पैसे मिळण्यापूर्वी त्याने उधार-उसनवार करून विहीर खोदली; पण मंजूर झालेले पैसे मिळाले नाहीत. इकडे देणेकऱ्यांनी तगादा लावला. मंजूर पैसे देण्यासाठी सरकारी यंत्रणा हलली नाही. शेवट त्याने स्वत:ला संपविण्यात केला. पैठण तालुक्यात ‘रोहयो’च्या कामाचे ७०० कोटी रुपये वाटप व्हायचे आहेत, अशी कबुली प्रशासनच देते. कामे झाली; पण पैसेच दिले नाहीत.
या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये झालेल्या ३२ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे अध्यक्ष चित्रपट दिग्दर्शक नागनाथ मंजुळे यांच्या अध्यक्षीय भाषणातील उदय प्रकाश यांच्या कवितेतील उद्धृत केलेल्या ओळी समर्पक आहेत. ते म्हणतात -
आदमी मरने के बाद
कुछ नहीं बोलता हैं
आदमी मरने के बाद
कुछ नहीं सोचता हैं
कुछ ना बोलने
कुछ ना सोचने से
आदमी मर जाता हैं ।।
- सुधीर महाजन

Web Title: The king killed; Nature has availed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.