The issue of farmers' problems, the symposium to find solutions to the problem of pink bundli | शेतक-यांच्‍या समस्‍या शासन दरबारी, गुलाबी बोंडअळीच्‍या समस्‍येवर उपाय शोधण्‍यासाठी परिसंवाद 

यवतमाळ :   कपाशीवर आलेल्‍या गुलाबी बोंडअळीमुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे. बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतक-यांच्‍या शेताचे सर्वेक्षण करण्‍याचे आदेशही शासनाने काढले आहे. शेतक-यांच्‍या ज्या काही समस्या असतील त्या शासन दरबारी मांडून सोडविण्‍याचा प्रयत्‍न करू, असे प्रतिपादन कै. वसंतराव नाईक शेती स्‍वावलंबन मिशनचे अध्‍यक्ष किशोर तिवारी यांनी केले. 
बळीराजा चेतना अभियान व कृषी विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने ‘कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचे व्‍यवस्‍थापन’ या विषयावर जिल्‍हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयातील श्रोतृगृहात आयोजित परिसंवादात ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्रकाश पोहरे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्‍हा परिषदेचे उपाध्‍यक्ष, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, कापूस संशोधन केंद्राचे शास्‍त्रज्ञ डॉ. विश्‍लेश नगराळे, डॉ. नेमाडे, कृषी विकास अधिकारी कैलास वानखेडे, प्रगतशील शेतकरी अमृत देशमुख, अॅड. पाटील उपस्थित होते. 
खरीप हंगामात कापूस पिकावर आलेली गुलाबी बोंडअळी तसेच भविष्‍यात कापूस पिकावर बोंडअळींचा प्रादुर्भाव होऊ नये, याबाबत परिसंवादात चर्चा करण्यात आली. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या संकटावर आता मात केली नाही तर पुढच्‍यावर्षी कापूस पीक घेणे कठिण जाणार असल्‍याचे मत मान्यवरांनी व्‍यक्‍त केले. त्‍यामुळे आतापासूनच सर्वच स्‍थरावर दक्ष राहून उपाययोजना करण्‍याबाबत  शेतक-यांना आवाहन करण्यात आले. 
कार्यक्रमाचे संचालन कृषी विकास अधिकारी कैलास वानखेडे यांनी तर उपस्थितांचे आभार बळीराजा चेतना अभियानाच्‍या वतीने मानन्‍यात आले. या परिसंवादाला जिल्‍हयातील उपविभागीय कृषी अधिकारी, प्रगतीशील शेतकरी, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, तालुका तंत्रज्ञान व्‍यवस्‍थापक उपस्थित होते.