कंत्राटदाराकडून एसटी आगाराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 04:57 AM2017-12-28T04:57:39+5:302017-12-28T04:57:55+5:30

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने राज्यातील बस आगारांमधील स्वच्छतेसाठी खासगी कंत्राटदाराला काम दिलेले आहे.

Ignore the cleanliness of the contractor from the contractor | कंत्राटदाराकडून एसटी आगाराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष

कंत्राटदाराकडून एसटी आगाराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष

Next

महेश चेमटे 
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने राज्यातील बस आगारांमधील स्वच्छतेसाठी खासगी कंत्राटदाराला काम दिलेले आहे. तीन वर्षांसाठी ४४६ कोटी रुपयांचा करार महामंडळ आणि खासगी कंत्राटदार यांच्यात झाला. मात्र, मुंबईतील कुर्ला नेहरुनगर, परळ येथील आगारांमध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. खासगी कंत्राटदाराने प्रत्येक आगार आणि स्थानकावर १० स्वच्छता कर्मचारी नेमणे अपेक्षित होते. मात्र, कुर्ला नेहरुनगर आणि परळ आगारात फक्त प्रत्येकी ४ स्वच्छता कर्मचारी आहेत. यामुळे खासगी कंत्राटदाराकडून एसटी आगाराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
मुंबईतील परळ आणि कुर्ला आगाराचा विस्तृत परिसर पाहता, येथे १५-१६ स्वच्छता कर्मचाºयांची आवश्यकता आहे. मात्र, प्रत्यक्षात ४ स्वच्छता कर्मचाºयांची नियुक्ती केलेली आहे. सकाळी ४ स्वच्छता कामगार आणि सायंकाळी २ स्वच्छता कामगार आगारात स्वच्छतेसाठी येतात, पण रोजच्या रोज सर्वांची हजेरी असतेच असे नाही. त्यामुळे अनेकदा एका किंवा दोघांवरच स्वच्छतेची जबाबदारी पडते. कुर्ला आगारातील बस वाहनतळ, बस स्थानक, कार्यशाळा, वाहक-चालक विश्रांतीगृह, दत्त मंदिर परिसर, कार्यशाळा या भागात स्वच्छता राखणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात सर्व ठिकाणी कचरा पडलेला असतो. खासगी कंत्राटदारांचे केवळ ४ कर्मचारी येतात. तेदेखील नीट काम करत नाहीत. विशेष म्हणजे, खासगी कंत्राटदाराला आठवड्याभरात ‘बस वॉशिंग’ ठिकाणाच्या स्वच्छतेची जबाबदारीदेखील देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कराराआधी राज्यभरात एसटी आगार-स्थानकांतील स्वच्छतेची जबाबदारी महामंडळाच्या १ हजार ८०० कर्मचाºयांवर होती. या कर्मचाºयांच्या वेतनापोटी ५० कोटी रुपयांचा खर्च यायचा. मात्र, त्यांच्या कामात गुणवत्तेचा अभाव होता, असे महामंडळाचे म्हणणे आहे. तरीही आर्थिक तोटा असूनही महामंडळाने खासगी कंत्राटदारासोबत ४४७ कोटींचा करार केला. मात्र, एसटी आगार-स्थानकांतील अस्वच्छता ‘जैसे थे’ असल्याचे समोर आले आहे.
मुंबईसह राज्यभरातील बहुतांशी ठिकाणच्या एसटी आगार-स्थानके आणि परिसरात हीच अवस्था आहे. कराड, सांगलीसह दक्षिण महाराष्ट्रातून एसटी मुख्यालयात याबाबत तक्रार केल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली. परिणामी, खासगी कंत्राटदारावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करूनही, एसटी परिसरात घाणीचे साम्राज्य आहे.
भरती करू नये : एसटी महामंडळ आणि खासगी कंत्राटदार यांच्यात ‘एकात्मिक सुविधा व्यवस्थापन सेवा’ हा ठराव ५ जुलै २०१७ रोजी मंजूर करण्यात आला. या वेळी करारात, ‘सध्या महामंडळातील १,८०० सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्याबाबत संचालक मंडळाने निर्णय घ्यावा. भविष्यात एसटी महामंडळाने या पदांची भरती करू नये,’ असेदेखील नमूद केले आहे.
>३ वर्षांसाठी ४४७ कोटी
वर्ष कंत्राटदाराला देण्यात येणारी रक्कम
पहिले वर्ष १३५,०४,४७,६९६
दुसरे वर्ष १४८,५४,९२,४६५
तिसरे वर्ष १६३,४०,४१,७१२
एकूण रक्कम ४४६,९९,८१,८७३

Web Title: Ignore the cleanliness of the contractor from the contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.