'मी करिअर करण्यासाठी आलो नाही...', पंतप्रधानपदाच्या शर्यतीवर गडकरींनी दिले स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 11:45 AM2024-03-17T11:45:14+5:302024-03-17T11:46:08+5:30
गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये नितीन गडकरी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये नितीन गडकरी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यासह गडकरी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील संबंधांची जोरदार चर्चा होत आहेत. या चर्चांना गडकरी यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी एका मुलाखतीत या सर्व चर्चेवर स्पष्टीकरण दिले आहे. पंतप्रधान मोदी आणि फडणवीस यांच्याशी आपले संबंध कसे आहेत हे त्यांनी सांगितले आहे. पंतप्रधानपदाचे उमेदवार होण्याच्या शर्यतीत ते आहेत का या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला आहे.
नितीन गडकरी म्हणाले, फडणवीस यांचे गुरू असल्याचे त्यांनी सांगितले. राजकारणात करिअर करण्यासाठी आलो नसल्याचेही गडकरी म्हणाले. ते तळागाळातील कार्यकर्ते आणि संघ स्वयंसेवक राहणे पसंत करणार, असंही म्हणाले.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून खूप चांगले काम केले आहे. २०१४ मध्ये त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्याने भाजपला २०१४ च्या निवडणुका जिंकण्यास मदत झाली. २०१९ मध्येही आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या उत्कृष्ट कामगिरीची पुनरावृत्ती केली. भाजपने एका दशकात जे साध्य केले ते काँग्रेसने गेल्या ६०-६५ वर्षातही मिळवले नाही, देशातील जनतेने मोदी सरकारवर विश्वास व्यक्त केला आहे. पुन्हा एकदा विक्रमी मताधिक्याने निवडून देणार. यावेळी ४०० पार नक्कीच करू, असंही नितीन गडकरी म्हणाले.
गडकरी म्हणाले, राजकारण हे सामाजिक-आर्थिक सुधारणांचे साधन आहे, असे माझे मत आहे. त्यामुळेच मला पदांचे आकर्षण नाही. पंतप्रधान मोदींसोबत माझे संबंध अतिशय सौहार्दपूर्ण आहेत, असंही गडकरी म्हणाले. "देवेंद्र फडणवीस यांच्याशी काही मुद्द्यांवर एकवाक्यता नसल्याची अटकळ आहे. वडिलांची भेट घेऊन मी फडणवीस यांच्या राजकीय प्रवेशाची सुरुवात केली. एकाच प्रदेशातील दोन मोठे नेते असताना लोक अंदाज बांधत राहतात. मी या प्रकरणात हस्तक्षेप करत नाही. तसेच माझी काही तक्रार नाही. आमच्यात कोणताही मतभेद नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही माझ्याकडून सल्ला घेतात', असंही गडकरी म्हणाले.