जीएसटी घटल्याने हज यात्रेकरूंसाठी ‘अच्छे दिन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 06:03 AM2019-01-13T06:03:41+5:302019-01-13T06:03:53+5:30

दहा हजारांची होणार बचत : नव्या नियमानुसार १२ टक्क्यांऐवजी ५ टक्के जीएसटी आकारणी; इच्छुक यात्रेकरूंची संख्या वाढली

GST reduction for Haj pilgrims | जीएसटी घटल्याने हज यात्रेकरूंसाठी ‘अच्छे दिन’

जीएसटी घटल्याने हज यात्रेकरूंसाठी ‘अच्छे दिन’

Next

- जमीर काझी


मुंबई : केंद्र सरकारने नववर्षापासून हवाई प्रवासावरील जीएसटी दरात कपात केल्याने हज यात्रेकरूंसाठी खऱ्या अर्थाने ‘अच्छे दिन’ आल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे. जानेवारी महिन्यापासून हवाई प्रवासासाठी १२ टक्यांऐवजी ५ टक्के जीएसटी दर आकारला जात आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या हज यात्रेच्या तुलनेत यंदा सहा ते दहा हजार रुपये कमी खर्च येणार आहे.


हज यात्रेसाठी भारताला एक लाख ७५ हजार जागांचा कोटा आहे. त्याचा पाठपुरावा केंद्रीय हज कमिटीच्या मार्फत केला जातो. या वर्षी आॅगस्ट महिन्यात होणाºया हज यात्रेसाठी केंद्रीय हज कमिटीकडे २,६७,२६१ इच्छुकांनी अर्ज केले आहेत. राज्यनिहाय संगणकीय सोडत (कुरा) काढून त्यांची निवड केली जाणार आहे.


केंद्रीय हज कमिटीच्या मार्फत ग्रीन व अझिझा या दोन श्रेणींतून गेल्या वर्षी १ लाख २८ हजार भाविक सौदी अरेबियाला गेले होते. त्या वेळी प्रत्येक प्रवाशामागे सरासरी दोन लाख ४१ हजार ते दोन लाख ९५ हजार इतका खर्च आला होता. मात्र, गेल्या वर्षी हवाई वाहतुकीसाठी १२ टक्के जीएसटी आकारण्यात आला होता. केंद्र सरकारने १ जानेवारीपासून विविध २८ सेवांवरील जीएसटीचे दर कमी केले. त्यामध्ये हवाई प्रवासासाठी आकारण्यात येणारा जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या प्रवास खर्चात सरासरी ६ ते १० हजारांचा फरक पडणार असल्याचे हज समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मकसुद खान यांनी ‘लोकमत’ला सांगितले.


राज्यातील हज यात्रेकरू निश्चित
या वर्षी आॅगस्टमध्ये होणाºया हज यात्रेसाठी राज्यातून एकूण ३५ हजार ६५८ अर्ज आले होते. ९ हजार ३३० जागांचा कोटा असल्याने सोमवारी त्यांची निश्चिती संगणकीय लॉटरीद्वारे करण्यात आली. हज हाउसमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या वेळी राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री विनोद तावडे, अल्पसंख्याक विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, राज्य हज समितीचे गफर मगदुम, अधिकारी इम्तियाज काझी आदी उपस्थित होते.

महिला यात्रेकरूंच्या संख्येत वाढ
आत्तापर्यंत महिलांना हज यात्रेसाठी मेहरम म्हणजे आपले पती, पिता किंवा भावासमवेतच जाता येत होते. मात्र, गेल्या वर्षापासून केंद्र सरकारने पुरुषाविना चार महिलांनी एकत्रितपणे हज यात्रेला जाण्याची परवानगी दिली आहे. त्यासाठी ५०० जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यंदा अशा इच्छुक महिलांची संख्या २,२७९ इतकी आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण दुपटीहून अधिक आहे. गेल्या वर्षी ११०० महिला इच्छुक होत्या.

 

Web Title: GST reduction for Haj pilgrims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.