गदिमांच्या निवडक कथा ‘इंग्रजीत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 02:04 AM2018-07-25T02:04:43+5:302018-07-25T02:04:59+5:30

प्रा. विनया बापट यांनी चौदा कथा करण्याचा घेतला ध्यास

Gadhim's selective story 'In English' | गदिमांच्या निवडक कथा ‘इंग्रजीत’

गदिमांच्या निवडक कथा ‘इंग्रजीत’

googlenewsNext

- नम्रता फडणीस 

पुणे : मराठी साहित्य दर्जेदार साहित्यिकांच्या सिद्धहस्त लेखणीतून अधिकाधिक समृद्ध झाले. परंतु मायबोलीतील साहित्य इंग्रजीसह इतर भाषांमध्ये फारसे अनुवादित न झाल्यामुळे जागतिक क्षितिजापर्यंत त्याचा विस्तार अद्यापही होऊ शकलेला नाही. मात्र मराठीमधील विविध लेखकांच्या उत्तमोत्तम कलाकृती इंग्रजीमध्ये आणण्याचा ध्यास पुण्यातील प्राध्यापिका विनया बापट यांनी घेतला असून, ‘गीतरामायण’ घराघरांत पोहोचविणाऱ्या ग. दि. माडगूळकर यांच्या चौदा निवडक कथा त्यांनी इंग्रजीत अनुवादित केल्या आहेत. येत्या १ आॅक्टोबरला गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरूवात होत आहे. त्यानिमित्त नव्या पिढीसाठी गदिमांच्या कथा इंग्रजीमध्ये येणं हा सुंदर योग जुळून आला आहे.
‘इंग्रजी’ ही व्यवहाराची भाषा मानली जाते. जागतिक दर्जाचे साहित्य प्रादेशिक भाषांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनुवादित झाल्यामुळे इंग्रजी साहित्याशी नवी पिढी अवगत झाली आहे. मात्र वाङ्मयविश्वात अनेक साहित्यिकांनी मराठी साहित्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले असले तरी केवळ हे साहित्य इंग्रजीमध्ये अनुवादित न झाल्यामुळे नव्या पिढीला आपल्याच मायबोलीच्या साहित्यिकांची फारशी ओळख झालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. आपली मराठी ग्रंथ संपदा जागतिक ज्ञानभाषेमध्ये रूपांतरित झाली तर साहित्यिकांची थोरवी विश्वपटलावर गायली जाणार आहे. याच जाणीवेतून काही मराठी भाषिकांकडून इंग्रजी अनुवादासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत, त्यातीलच एक नाव म्हणजे प्रा. विनया बापट.
एसएनएनडी महाविद्यालयात दहा वर्षे इंग्रजीच्या प्राध्यापिका म्हणून त्या कार्यरत होत्या. पंचवीस वर्षे त्या इंग्रजी विषय शिकवित आहेत. इंग्रजीवर उत्तम प्रभुत्व असलेल्या बापट यांना अनुवादाची आवड असल्याने प्रारंभीच त्यांनी गदिमांच्या आत्मचरित्रासह त्यांच्या काही निवडक कथा इंग्रजीत अनुवादित करण्याचे शिवधनुष्य पेलले आहे. या कथांचा अनुवाद पूर्ण झाला असून, त्यासाठी त्यांचा प्रकाशकाचा शोध सुरू आहे.
याविषयी ‘लोकमत’शी बोलताना त्या म्हणाल्या, मी गदिमांच्या साहित्याची खूप मोठी चाहती आहे. गदिमांचे आत्मचरित्र मला आधी अनुवादित करायचे होते. पण गदिमांचे चिरंजीव श्रीधर माडगूळकर यांनी गदिमांच्या कथा उत्तम आहेत त्यापासून अनुवादाला सुरुवात करावी, असे सांगितले.

अमराठी वाचकवर्गाला डोळ्यासमोर ठेवून गदिमांच्या कथा अनुवादित केल्या आहेत. नवी पिढीदेखील मराठी साहित्यामधील अमूल्य ठेव्यापासून वंचित राहू नये, हा या अनुवादामागील उद्देश आहे. गदिमांचे आत्मचरित्र इंग्रजीत अनुवादित करण्याचे कामही सुरू आहे.
- प्रा. विनया बापट, अनुवादिका

गदिमांचे साहित्य इंग्रजीमध्ये अद्यापही अनुवादित झालेले नाही. केवळ ‘गीतरामायण’ हे एका निवृत्त न्यायाधीशांनी इंग्रजीमध्ये अनुवादित केले आहे. गदिमांच्या पुष्कळ कथा या जागतिक दर्जाच्या आहेत. नवीन पिढी इंग्रजीमध्ये शिकलेली आहे, त्यांच्यापर्यंत हे अनुवादित साहित्य पोहोचेल आणि त्यांच्यात मराठीची गोडी निर्माण होईल. ‘थोरली पाती’, ‘सोने आणि माती’, ‘बोलका शंख’ आदी पुस्तकातील ‘मी आणि माती’, ‘औंदाचा राजा’, ‘सिनेमातील माणूस’ अशा विविध चौदा कथा प्रा. विनया बापट यांनी घेतल्या आहेत. गदिमांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त कथांचा इंग्रजी अनुवाद होणे हा छान योग जुळून आला आहे.
- सुमित्र माडगूळकर, गदिमांचे नातू
 

Web Title: Gadhim's selective story 'In English'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे