स्वच्छतेच्या जनआंदोलनामुळे महाराष्ट्र पहिला

By admin | Published: October 14, 2016 03:30 AM2016-10-14T03:30:04+5:302016-10-14T03:30:04+5:30

लोकसहभागातून स्वच्छतेचे जनआंदोलन उभे राहिल्यामुळेच महाराष्ट्रातील १०० शहरे हागणदारीमुक्त झाली असून हागणदारीमुक्तीत महाराष्ट्र हे देशातील पहिल्या

The first one is due to the mass movement of cleanliness | स्वच्छतेच्या जनआंदोलनामुळे महाराष्ट्र पहिला

स्वच्छतेच्या जनआंदोलनामुळे महाराष्ट्र पहिला

Next

मुंबई : लोकसहभागातून स्वच्छतेचे जनआंदोलन उभे राहिल्यामुळेच महाराष्ट्रातील १०० शहरे हागणदारीमुक्त झाली असून हागणदारीमुक्तीत महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी काढले.
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत हागणदारीमुक्त व स्वच्छ शहरांचा प्रातिनिधिक सत्कार सभारंभ नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) येथे पार पडला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते हागणदारीमुक्त शहरांचे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, एकीकडे जगातील मोठी अर्थव्यवस्था बनणारा आणि मंगळावर यान पाठविणारा अशी भारताची ओळख बनत असताना नागरिकांना उघड्यावर शौचास बसावे लागणे ही लाजिरवाणी बाब आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची संकल्पना मांडली. त्यानुसार राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात आले आणि अवघ्या दीड वर्षात राज्यातील १०० शहरे हागणदारीमुक्त झाली. स्वच्छतेसाठी लोकसहभागातून उभ्या राहिलेल्या जनआंदोलनामुळेच हे शक्य झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
कोणत्याही धोरणाशिवाय विस्तारलेली शहरे आणि वाढत्या नागरीकरणामुळे शहरे बकाल झाली. नागरीकरणाला शाप न मानता संधी मानायला हवी. लोकसहभाग आणि नियोजनातून शहरांचे स्वरूप बदलून रोजगारनिर्मिती होणे आवश्यक आहे. शहरांच्या विकासाची संकल्पना बदलली आहे. रस्ते, वीज, गटार बांधले म्हणजे शहरांचा विकास झाला असे समजू नये. अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याबरोबरच स्वच्छ शहरांच्या निर्मितीसाठी हागणदारीमुक्त शहरे, कचऱ्याचे वर्गीकरण, घनकचरा व्यवस्थापन व सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी शहरे बनवावी लागणार आहेत. पर्यावरणपूरक शहरांच्या निर्मितीला प्राधान्य दिले तर खऱ्या अर्थाने शहरांचा विकास होईल, असे मुख्यमंत्री या वेळी म्हणाले.
केंद्र सरकारने देशातील निवडलेल्या १० स्वच्छ शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील ५ शहरांचा समावेश केला आहे, तर १० जिल्ह्यांच्या यादीत आपले ५ जिल्हे आहेत. ११८ हागणदारीमुक्त शहरांच्या यादीत राज्यातील ५२ शहरांची निवड झाल्याने हागणदारीमुक्तीत महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. सर्वांच्या प्रयत्नातून स्वच्छतेच्या बाबतीत महाराष्ट्र असाच अग्रेसर राहील, असा विश्वास व्यक्त करतानाच २ आॅक्टोबर २०१७ पर्यंत महाराष्ट्राचा संपूर्ण नागरी भाग हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी या वेळी केला.
यावेळेस तसेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वच्छतेबाबत जनजागृती करणाऱ्या विविध पुस्तकांचेही प्रकाशन करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: The first one is due to the mass movement of cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.