लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर- आणीबाणीवर आधारित ‘इंदू सरकार’ चित्रपटाला काँग्रेस कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या विरोधाला दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘या गुंडगिरीला तुमची परवानगी आहे का? मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही?’ असा थेट सवाल त्यांनी कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना केला आहे.
"इंदू सरकार" चित्रपटाला काँग्रेसचा विरोध आता आणखी तीव्र होऊ लागला आहे. पुण्यापाठोपाठ रविवारी नागपुरातही चित्रपटविरोधात काँग्रेसने आंदोलन केल्याने भांडारकर यांना दोन वेगवेगळया ठिकाणी आयोजित कलेली पत्रकार परिषद रद्द करावी लागली. या प्रकारामुळे संतापलेल्या भांडारकर यांनी राहुल गांधींना टिष्ट्वट करून ‘या गुंडगिरीला तुमची परवानगी आहे का?’ असा सवाल केला.
चित्रपट न पाहताच गोंधळ घालणे आणि बोलण्याची संधी न देणे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. हा चित्रपट काल्पनिक असून कॉंग्रेसची भूमिका अयोग्य आहे, असे भांडारकर म्हणाले. हा चित्रपट कुठल्याही राजकीय पक्षाने ‘स्पॉन्सर’ केला नाही. जर असे असते तर मी १०० टक्के चित्रपट पूर्णपणे आणीबाणीवरच काढला असता आणि निवडणुकांच्या वेळी प्रदर्शित केला असता, असे भांडारकर यांनी नागपूर विमानतळावर पत्रकारांनी बोलताना सांगितले.
‘सेन्सॉर’ने या चित्रपटात १७ ‘कट’ करण्यास सांगितले आहे. मात्र माझी त्यासाठी तयारी नाही. याबाबत कायदेशीर दाद मागण्यात येईल व ‘ट्रिब्युनल’मध्ये जाण्यास तयार आहोत. एखाद्या लेखकाला पुस्तकात काय लिहिले आहे, असे विचारत नाहीत. मग चित्रपटाबाबतच का विचारणा होते, असा सवालही भांडारकर यांनी उपस्थित केला.
हा चित्रपट ७० टक्के काल्पनिक असून, फक्त ३० टक्केच वस्तुस्थितीवर आधारित आहे. अशातही विरोध होत असेल, तर ही माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. माझे तोंड काळे करून किंवा अंगावर शाई फेकून तुम्ही इतिहास बदलू शकणार नाही.
- मधुर भांडारकर, दिग्दर्शक