डेंग्यूचे विघ्न

By admin | Published: September 2, 2014 01:16 AM2014-09-02T01:16:42+5:302014-09-02T01:16:42+5:30

उपराजधानीत एकीकडे विघ्नहर्त्याच्या आगमनाने उत्सवाचे वातावरण आहे तर दुसरीकडे मात्र डेंग्यूचे विघ्न गंभीर रूप धारण करीत आहे़ जवळजवळ अर्धे शहर ऐन सणासुदीच्या दिवसात तापाने फणफणले आहे.

Dengue Breakdown | डेंग्यूचे विघ्न

डेंग्यूचे विघ्न

Next

शाळांमध्ये डासांचा प्रतिबंध नाहीच : पालकांमध्ये भीतीचे वातावरण
नागपूर : उपराजधानीत एकीकडे विघ्नहर्त्याच्या आगमनाने उत्सवाचे वातावरण आहे तर दुसरीकडे मात्र डेंग्यूचे विघ्न गंभीर रूप धारण करीत आहे़ जवळजवळ अर्धे शहर ऐन सणासुदीच्या दिवसात तापाने फणफणले आहे. वस्त्यावस्त्यांमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. डेंग्यूचा डास दिवसाच चावतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी, लहान मुले याला बळी पडत आहेत. रविवारी दीनदयालनगरात डेंग्यूमुळे चौथ्या वर्गातील मुलीचा मृत्यू झाला़ आणखीही अनेक रुग्ण या आजाराच्या विळख्यात सापडले आहेत़ या आजारामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहरात वाढलेला डेंग्यूचा प्रकोप आणि शहरातील शाळांच्या स्थितीचे ‘लोकमत’ने सर्वेक्षण केले असता, अनेक शाळांमध्ये डासांच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना होतच नसल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले़
‘लोकमत चमू’ने सोमवारी शहरातील निवडक १० शाळांचे सर्वेक्षण केले. यात महापालिकेची विवेकानंद माध्यमिक शाळा, साऊथ पॉर्इंट हायस्कूल, दुर्गानगर माध्यमिक शाळा, भवन्स, पं. बच्छराज व्यास विद्यालय, न्यू इंग्लिश हायस्कूल, सांदीपनी स्कूल, मॉडर्न स्कूल, सीडीएस स्कूल आणि भारती क्रिष्णा विद्याविहार आदींचा समावेश आहे. सर्वेक्षणात प्रातिनिधिक स्वरूपात या शाळांचा समावेश करण्यात आला. या सर्वच शाळा प्रशासनाने डासांची उत्पत्ती होऊ नये याची खबरदारी घेतल्याचे दिसून आले. परंतु शाळाबाहेरील परिसरात महापालिकेच्या उघड्या गटारी, पाण्याचे डबके, कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत असून, विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे आढळून आले.
डेंग्यूने घेतला धरित्रीचा बळी
दीनदयालनगरात राहणारे विनय भट्टलवार यांची मुलगी धरित्री हिचा रविवारी पहाटे डेंग्यूने मृत्यू झाला. आठवडाभरापूर्वी तिला ताप आला होता. वैद्यकीय तपासणी केली असता तिला डेंग्यू असल्याचे निदान झाले. शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी तिच्यावर शर्थीचे उपचारही केले. मात्र त्यांना यश आले नाही. धरित्रीच्या अकाली निघून जाण्याने आई-वडिलांना जबर धक्का बसला आहे. सोमलवार निकालस शाळेची वर्ग ४ ची विद्यार्थिनी असलेली धरित्री एकुलती एक मुलगी. वडील एलआयसीमध्ये डेव्हलपमेंट अधिकारी तर आई सोमलवार निकालस शाळेत शिक्षिका. आई-वडिलांकडून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणाऱ्या धरित्रीला २१ आॅगस्टला ताप आला. ती तापाने चांगलीच फणफणायला लागल्यामुळे वडील तिला फॅमिली डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी औषधोपचाराबरोबरच तिच्या रक्ताची तपासणीही करवून घेतली. यात डेंग्यूचे निदान झाले. त्यामुळे फॅमिली डॉक्टरांनी तिला पुढच्या उपचारासाठी कलर्स रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. पालकांनी लगेच तिला रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर औषधोपचारही सुरू झाले. सुरुवातीला तिने औषधोपचाराला बऱ्यापैकी प्रतिसादही दिला. मात्र फार काळ ती सामना करू शकली नाही.डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. आई-वडिलांच्या प्रार्थना सुरू होत्या. मात्र डेंग्यूचा डंख तिच्या प्रतिकारशक्तीपेक्षा अधिक शक्तिशाली ठरला आणि रविवारी पहाटे धरित्रीचा मृत्यू झाला.

Web Title: Dengue Breakdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.