आगीच्या घटनांत घट

By admin | Published: November 3, 2016 03:46 AM2016-11-03T03:46:27+5:302016-11-03T03:46:27+5:30

दिवाळीच्या चार दिवसात एकीकडे नवी मुंबई, भिवंडीत मोठ्या आगी लागल्याच्या घटना

Decrease in fire incidents | आगीच्या घटनांत घट

आगीच्या घटनांत घट

Next


ठाणे : दिवाळीच्या चार दिवसात एकीकडे नवी मुंबई, भिवंडीत मोठ्या आगी लागल्याच्या घटना घडत असतांना दुसरीकडे ठाण्यात मात्र, त्या घडल्या असल्या तरी त्यांचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत कमी तर होतेच, शिवाय यामध्ये केवळ कचऱ्याला आग लागण्याचे प्रमाणच अधिक होते. दिवाळीच्या चार दिवसात शहरात आगीच्या २५ घटना घडल्या आहेत. तर मागील वर्षी याच कालावधीत ३३ घटना घडल्या होत्या.
दिवाळीच्या काळात यंदा भिवंडीत एका कंपनीला मोठी आग लागल्याची घटना घडली. तर नवी मुंबईत देखील आगीचा भडका उडाला होता. दुसरीकडे ठाण्यात मागील वर्षी दिवाळीच्या चार दिवसांच्या कालावधीत एका फोमच्या दुकानाला, उपवन येथे एका कंपनीला आणि इतर चार ठिकाणी आगीच्या मोठ्या घटना घडल्या होत्या. मागील वर्षी चार दिवसात आगीचे प्रमाण हे ३३ होते. मागील वर्षीचा अनुभव पाठीशी असल्याने यंदादेखील आगीच्या घटना घडू शकतात, ही बाब लक्षात घेऊन पालिकेने आधीपासूनच खबरदारी घेतली होती. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या घटनांवर आळा बसविण्यासाठी अग्निशमन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार हे दोन्ही विभाग त्या दृष्टीने सतर्क झाले होते.
दरम्यान यंदा चार दिवसात आगीच्या केवळ २५ घटना घडल्या असल्या तरी कचऱ्याला आगी लागण्याचे प्रमाण हे अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. कचऱ्यामध्ये असलेल्या केबलला देखील आग लागल्याची घटना सावरकर नगर भागात घडली होती. ही एकच घटना वगळता इतर सर्व आगीच्या घटना या तुरळत असल्याची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. (प्रतिनिधी)
गत वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन पालिकेने यंदा चोख व्यवस्था केली होती. आपत्ती आणि अग्निशमन विभागही सतर्क होते.

Web Title: Decrease in fire incidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.