गणितातील संख्यावाचनाचा वाद बिनबुडाचा - डॉ. नारळीकर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 02:43 AM2019-06-19T02:43:39+5:302019-06-19T06:49:43+5:30

सोपे ते स्वीकारले; बदल पहिलीच्या गणित पुुस्तकापासूनच

The debate over mathematical calculations is absurd - Dr. Naralikar | गणितातील संख्यावाचनाचा वाद बिनबुडाचा - डॉ. नारळीकर

गणितातील संख्यावाचनाचा वाद बिनबुडाचा - डॉ. नारळीकर

Next

- राजानंद मोरे 

पुणे : इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पुस्तकामध्ये संख्यावाचनात केलेल्या बदलावरून वाद निर्माण झाला आहे. काही शिक्षणतज्ज्ञ, लेखक, राजकीय नेत्यांनी हा बदल मराठी भाषेला मारक असल्याचे उघडपणे म्हटले आहे. एकवीसला वीस एक म्हटल्याने विद्यार्थ्यांमध्येही गोंधळ निर्माण होईल, असा दावा केला जात आहे. बालभारतीच्या गणित विषयतज्ज्ञ समितीच्या अध्यक्ष डॉ. मंगला नारळीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना या वादावर विस्तृतपणे मांडणी करून सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे ठामपणे सांगितले. त्यामागे विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण करणे, हा एकमेव उद्देश आहे, असेही डॉ. नारळीकर यांनी स्पष्ट केले.

प्रश्न : इयत्ता दुसरीच्या पुस्तकातील बदल आणि त्यामागचा उद्देश नेमका काय आहे?
- मागील वर्षी पहिलीच्या पुस्तकापासूनच याची सुरुवात केली आहे. त्याची पुढची पायरी दुसरीच्या पुस्तकामध्ये आहे. आम्ही जो
छोटासा बदल केला आहे, त्यामुळे मुलांसाठी गणित निश्चितपणे सोपे होणार आहे, हा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. पन्नास पर्यंतच्या संख्यांचे शाब्दिक लेखन आणि १०० पर्यंतच्या संख्यांचे वाचन अपेक्षित आहे. आमच्या मुलांना गणिताची नावड निर्माण होऊ नये, त्यांना गणिताची भीती वाटू नये. त्यांनी आनंदाने, त्यात रस घेऊन गणित शिकावे, असे आम्हाला मनापासून वाटते.

प्रश्न : गणितातील बदलावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे.
- केवळ २१ ते १०० या ८० संख्यापैकी साधारणपणे ७० संख्याचे वाचन थोडे वेगळे सुचवले आहे. म्हणजे पंचवीस साठी वीस पाच, सत्तेचाळीससाठी चाळीस सात. तीन कारणांसाठी हे आम्ही सुचविले आहे. सत्तेचाळीस, अठ्ठ्याण्णव, त्र्याएेंशी या सगळ््यांमध्ये केवढी जोडाक्षरे आहेत ते तुम्हीच पहा. दुसरीतील मुलांकडून संख्या वाचनाबरोबर लेखनही अपेक्षित आहे. एवढ्या जोडाक्षरांचे शब्द लिहायला लागणे ही गणिताची भीती तयार करायला पहिले कारण ठरते. यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुलांना पंचवीस लिहायला सांगितल्यानंतर ते आधी ५ आणि नंतर २ लिहितात. कारण आपण बोलताना पाच आधी बोलतो. सत्तेचाळीस म्हटले की मुले आधी ७ व नंतर ४ लिहितात. प्राथमिक शाळेत शिकविणाऱ्या अनेक शिक्षकांचा हा अनुभव आहे की, मुले हा गोंधळ बºयाच वेळा करतात. त्याचे कारण म्हणजे, संख्या वाचन आणि लेखन हे विरूध्द क्रमाने होते. हा गोंधळ सुध्दा नव्या पध्दतीत संपतो.

प्रश्न : या बदलामुळे मराठीतील सगळीच जोडाक्षरे आता काढून टाकणार का, या टीकेला कसे उत्तर द्याल?
- जोडाक्षरे काढण्याबाबत आम्ही अजिबात म्हटलेले नाही. आम्ही फक्त साधारणपणे ७० संख्यांचे वाचन वेगळ््या पद्धतीने
स्वीकारार्ह आहे. तो पर्याय मुलांना द्यायला हवा, असे सुचविले आहे. आम्ही अठ्ठ्याण्णव शब्द काढून टाका असे कधीच म्हटले नाही. हा केवळ ७० संख्या सोप्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रश्न : चार, पाच अंकी मोठ्या संख्याही अशाच वाचल्या तर गोंधळ उडणार नाही का?
- तिसरी-चौथीपर्यंतच काही संख्या पुस्तकात शब्दांत सांगितल्या जातात. मोठ्या संख्या नंतर सगळ््या अंकातच दिल्या जाणार आहेत. मोठ्या संख्यांच्याबाबत याचा जास्त फायदाच दिसेल. ‘पाच हजार चारशे सत्तावण्ण’ हे आपण कसे वाचतो. आधी हजार नंतर शतकआणि मग दोन संख्या आली की आपण उलटी उडी मारतो. त्याऐवजी मुले पाच हजार चारशे पन्नास सात असे म्हणतील, यात हरकत असायचे कारण नाही.

Web Title: The debate over mathematical calculations is absurd - Dr. Naralikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.