मुंबई : पाऊस गेल्यानंतरही मुंबई शहर-उपनगरांतील साथीच्या आजारांचे सावट कायम असल्याचे पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यातील अहवालातून उघडकीस आले आहे. या अहवालानुसार आॅक्टोबर महिन्यात साथींच्या आजारांमुळे तब्बल पाच बळी गेल्याची नोंद आहे. त्यात एका सहा वर्षांच्या लहानग्याचा, तर एका गर्भवतीचा समावेश आहे. त्यामुळे बदलत्या वातावरणात ताप, सर्दी, खोकला, अशी कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन पालिकेच्या आरोग्य खात्याने केले आहे.
 
पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अहवालानुसार, १ ते ३१ आॅक्टोबरदरम्यान शहर-उपनगरात ३ हजार २९३ डेंग्यूसदृश्य रुग्ण आढळून आले आहेत. मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यात ४ हजार ९८ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. यंदाच्या आॅक्टोबर महिन्यात स्वाईन फ्लूचे पाच रुग्ण आढळून आले आहे, सप्टेंबर महिन्यात ही संख्या ३३ एवढी होती.

आॅक्टोबर महिन्यात डेंग्यूमुळे भांडुप येथील ३५ वर्षीय गर्भवतीचा मृत्यू झाला, तिला टीबीसुद्धा झाला होता. याशिवाय, हृदयविकाराचा त्रास असलेल्या ५० वर्षीय महिलेचाही डेंग्युमुळे मृत्यू झाला. तर कांदिवली येथील २५ वर्षीय तरुणाचाही डेंग्यूमुळे मृत्यू झाला, हा रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत होता, त्यानंतर प्रकृती अत्यवस्थ असल्याने पालिकेच्या हलविण्यात आले त्यावेळेस त्याचा मृत्यू झाला.

हेपेटायटिसने मालवणी येथील सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. त्याच्यावरही पहिल्यांदा खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, नंतर पालिकेच्या रुग्णालयात हलविण्यात आले. याखेरीज मलेरियाने ग्रँट रोड येथील ७२ वर्षीय वृद्धाचा बळी घेतला. साथींच्या आजारांच्या बळीनंतर करण्यात त्या-त्या परिसरात करण्यात आलेल्या आरोग्य सर्वेक्षणात १ हजार ९८० घरांची तपासणी करण्यात आली, त्यात ८ हजार ७६० नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या. यात १३ जणांना ताप, सहा जणांना कफ, थंडी व तीन जणांना डायरिया आढळून आला, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर मालवणी परिसरात करण्यात आलेल्या आरोग्य सर्वेक्षणात १ हजार ३०० घरांतील  ४ हजार ९७० लोकांना तपासण्यात आले. त्यात ४ जणांना ताप, दोघांना डायरिया आढळून आला. तर ग्रँट रोड परिसरात करण्यात आलेल्या तपासणीत ५१७ घरांमधील १ हजार ७१० लोकांच्या तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये एकाला ताप असलेला दिसून आला.

आजार        सप्टेंबर २०१७     आॅक्टोबर २०१७
डेंग्यू                   ४१२               २१२
लेप्टो                     ५९                 १८
मलेरिया              ८४९              ५६३
गॅस्ट्रो                   ५३२              ५४६
हेपेटायटिस          १०५                ८९
स्वाइन फ्लू            ३३                 ०५


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.