भुजबळ कुटुंबीयांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा

By admin | Published: May 27, 2016 04:32 AM2016-05-27T04:32:05+5:302016-05-27T04:32:05+5:30

महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांसह १२ जणांवर बेहिशोबी संपत्ती गोळा केल्याचा गुन्हा दाखल केला.

Corruption of Bhujbal family | भुजबळ कुटुंबीयांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा

भुजबळ कुटुंबीयांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा

Next

- डिप्पी वांकाणी,  मुंबई
महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांसह १२ जणांवर बेहिशोबी संपत्ती गोळा केल्याचा गुन्हा दाखल केला.
छगन भुजबळ यांनी १९९९ ते २०१४ या कालावधीत सरकारमधील त्यांच्या ताकदीच्या जोरावर २०३.२४ कोटी रुपये कमविले असून, उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा ही रक्कम ७,१५२.५० टक्के अधिक आहे. हे सर्व पैसे त्यांनी स्वत:चे नियंत्रण असलेल्या कंपन्यांत शेअरच्या माध्यमातून गुंतविले, असा एसीबीचा दावा आहे.
या प्रकरणी छगन भुजबळ यांच्यासह त्यांची पत्नी मीना, मुलगा पंकज, पुतण्या समीर, सून विशाखा, चार्टर्ड अकाउंटंट सुनील नाईक, हवाला आॅपरेटर सुरेश जजोदिया, प्रवीण जैन, संजीव जैन, चार्टर्ड अकाउंटंट चंद्रशेखर सारडा आणि कपिल पुरी यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचे कलम १३ (१) ई आणि १३ (२)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
छगन भुजबळांनी वेतनातून ८७,१६,११६ रुपये, शेतीतून १,६२,२०,०३७ रुपये, तर मीना भुजबळ यांनी शेती व्यवसायातून ३६,८८,३२२ रुपये मिळविले. प्रत्यक्षात एसीबीला १९९९ ते २०१४ या कालावधीत छगन व मीना भुजबळ यांचे खरेखुरे उत्पन्न ३७७८४३०७ रुपये असल्याचे आढळले. हे उत्पन्न त्यांच्या उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा ३२ टक्क्यांनी जास्त होते. तर पंकज भुजबळ आणि त्यांची पत्नी विशाखा यांचे उत्पन्न ज्ञात उत्पन्नाच्या ४५ टक्के अधिक आहे, असे एसीबीचे म्हणणे आहे.
एसीबी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, भुजबळ कुटुंबीयांच्या उत्पन्नापैकी ३२ टक्के रकमेची वजावट ही त्यांच्या खर्चापोटी केली, तरीही त्यांचे उत्पन्न हे त्यांनी जाहीर केलेल्या उत्पन्नापेक्षा अधिक आहे.
पंकज आणि समीर भुजबळ यांनी काही खोट्या कंपन्या स्थापन केल्या आणि छगन भुजबळ यांनी कमविलेली रक्कम एकत्र ठेवण्यासाठी त्यांचा उपयोग केला गेला. त्यानंतर ते हवाला आॅपरेटर आणि कोलकात्यातील काही आॅपरेटर्सच्या संपर्कात होते.
अर्थात, या कंपन्यांत गुुंतवणूक
करणारे जे कोणी होते ते फक्त कागदोपत्री नावालाच होते असे ईडीला (सक्तवसुली संचालनालय) आढळून आले आहे. महाराष्ट्र सदन बांधकाम गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबळ व समीर भुजबळ सध्या कोठडीत आहेत.

Web Title: Corruption of Bhujbal family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.