मुन्नाच्या उमेदवारीला बंटीचा खोडा; कोल्हापूरमध्ये आघाडीत आखाडा?

By राजा माने | Published: February 9, 2019 10:20 AM2019-02-09T10:20:54+5:302019-02-09T10:45:46+5:30

सतेज पाटील यांच्यासह अनेक काँग्रेस नेते कोल्हापूरच्या जागेसाठी आग्रही

congress leader satej patil claims kolhapur lok sabha seat indirectly hits out at ncp mp dhananjay mahadik | मुन्नाच्या उमेदवारीला बंटीचा खोडा; कोल्हापूरमध्ये आघाडीत आखाडा?

मुन्नाच्या उमेदवारीला बंटीचा खोडा; कोल्हापूरमध्ये आघाडीत आखाडा?

googlenewsNext

- राजा माने

मुंबई- २०१४च्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार म्हणून इमाने-इतबारे धनंजय महाडिक यांचे काम केले व निवडून आणले. पण त्या निवडणुकीनंतर जिल्ह्यात भाजपमय वातावरण करायचा प्रयत्न कुणी केला,हे सर्वांनाच माहिती आहे. जे पेरले,तेच उगवते,या उक्ती प्रमाणे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आता कोल्हापूरच्या जागेवर दावा केला आहे.पक्षाने जागा आपल्याकडे घ्यावी,आम्ही जिल्यातील सर्व नेते एकत्र बसून उमेदवार ठरवू व निवडून आणू, असा निर्धार बंटी ऊर्फ आमदार सतेज पाटील यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केला.

आम्ही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे कोल्हापूरची जागा काँग्रेसला घेण्याची मागणी केली आहे. कारण, जिल्ह्यात काँग्रेसला पोषक वातावरण असून आम्ही काँग्रेसचा उमेदवार निवडून आणू शकतो, आमच्याकडे प्रबळ उमेदवार आहे, असे माजी राज्यमंत्री आणि काँग्रेस नेते आ.सतेज पाटील यांनी म्हटले आहे. आघाडीतील जागावाटपाच्या स्पर्धेत कोल्हापूरसाठी अद्यापही काँग्रेस 'रेस'मध्येच असल्याचे सांगत पाटील यांनी राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार धनंजय महाडिक यांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे येथे 'बंटी विरुद्ध मुन्ना' हा संघर्ष टिपेला पोहोचणार असण्याचे संकेतच दिले आहेत. 

आगामी लोकसभा निवडणुकांची लगीनघाई सुरू असल्याने, कुटुंबात लग्न कार्याची धावपळ असतानाही  सतेज पाटील यांनी लोकमतशी संवाद साधला. त्यावेळी आगामी लोकसभा निवडणुका आणि जिल्ह्यातील आघाडीत असलेली बिघाडी याबाबत  आपली आणि पक्षाची भूमिका मांडली. लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी निश्चित झाली आहे. मात्र, अद्यापही काही जागांसाठी एकमत झाले नाही. त्यापैकीच कोल्हापूर लोकसभा मतदार संघाची जागा काँग्रेस की राष्ट्रवादीला हा पेच कायम आहे. याबाबत बोलताना, सतेज पाटील यांनी ही जागा काँग्रेसला मिळावी, अशी इच्छा बोलून दाखवली.

सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी जीवाचं रान केलं. मात्र, निकालानंतर जिल्ह्यातील परिस्थिती बदलली, सर्वत्र भाजपमय वातावरण करण्याचे प्रयत्न झाले. त्यामुळे, जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका सदस्यांमध्ये आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. आम्ही २०१४ साली जे कष्ट घेतले, त्याचे फळ आम्हाला काय मिळाले, असा सवाल कार्यकर्ते करीत आहेत. त्यामुळे याचे पडसाद उमटणारच. कारण आपण जे पेरतो तेच उगवतो, असे म्हणत सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीला नाव न घेता विरोध दर्शवला आहे. मात्र, शेवटी पक्ष श्रेष्ठींच्या निर्णयानुसार आम्ही काम करू. तरीही, राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत काहीही सांगता येत नाही, शेवटच्या क्षणापर्यंत काहीही अशक्य नसतं, असे म्हणतं धंनजय उर्फ मुन्ना महाडिक यांची उमेदवारी अद्याप अंतिम नसल्याचे संकेतच पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणात बंटी विरुद्ध मुन्ना असा राजकीय आखाडा पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 

Web Title: congress leader satej patil claims kolhapur lok sabha seat indirectly hits out at ncp mp dhananjay mahadik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.