व्यापाऱ्याच्या मुलाला भरदिवसा दांडक्याने मारहाण

By admin | Published: May 20, 2016 02:21 AM2016-05-20T02:21:04+5:302016-05-20T02:21:04+5:30

बारामती शहरातील व्यापाऱ्याच्या मुलाला भर दिवसा खोऱ्याच्या दांडक्याने अमानुष मारहाण केल्याचा प्रकार घडला

The businessman's son was beaten by a rowdy racket | व्यापाऱ्याच्या मुलाला भरदिवसा दांडक्याने मारहाण

व्यापाऱ्याच्या मुलाला भरदिवसा दांडक्याने मारहाण

Next


बारामती : बारामती शहरातील व्यापाऱ्याच्या मुलाला भर दिवसा खोऱ्याच्या दांडक्याने अमानुष मारहाण केल्याचा प्रकार घडला. हा प्रकार घडत असतानाच आरोपी संबंधित मुलाच्या वडिलांना मोबाईलवरून धमकावत होता. शहर पोलीस अधिकाऱ्यांना त्याची माहिती होती. मात्र, मारहाण करून आरोपी पळून गेला. पोलिसात तक्रार दिली, तर बघून घेईन, अशी धमकी आरोपीने दिली. त्यामुळे या व्यापाऱ्याच्या कुटुंबीयांमध्ये घबराटीचे वातावरण होते. आज पत्रकारांनी मारहाणीची ‘क्लिप’ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली. त्यानंतर सापडत नसलेला आरोपी गुन्हेशोध पथकाने पकडला.
आरोपी गणेश धोत्रे याने त्यापूर्वी मंगळवार, दि. १७ मे रोजी पतसंस्थेचे कर्ज का देत नाही, अशी विचारणा करून सचिवाला मारहाण केली होती. त्यानंतर पतसंस्थेत जाऊन रॉकेल ओतून कागदपत्रे जाळण्याचा प्रकार केला. त्याची तक्रारदेखील घेतली. मात्र, पोलिसांनी आरोपीला अटक केली नाही. त्यामुळे त्याचे धाडस बळावले. त्यानंतर बुधवार, दि. १८ मे रोजी व्यापारी संतोष मुथा यांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्री दुकानात जाऊन मुलगा पारस संतोष मुथा याला खोऱ्याच्या दांडक्याने जबर मारहाण केली.
हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. हा प्रकार घडत असताना पारस याचे वडील संतोष मुथा पोलीस ठाण्यात आरोपी धमकावत आहे, याची माहिती देण्यासाठी गेले होते. त्याच वेळी त्यांच्या मोबाईलवर आरोपी धोत्रे याने फोन केला. त्या वेळी मुलाला मारहाण करण्याचा आवाज येत होता.
मारहाणीपासून बचाव होण्यासाठी प्रयत्न करीत असताना पारस याचा पाठलाग करीत मारहाण केली. त्यामध्ये त्याचा हात मोडला, तरीदेखील पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नव्हते. आरोपी फरारी आहे, असेच आज दुपारपर्यंत पत्रकारांनी संपर्क साधल्यावर पोलीस निरीक्षक विजय जाधव सांगत होते. मारहाणीच्या प्रकाराची क्लिप वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली. त्यानंतर सूत्रे हालली. सायंकाळी गुन्हेशोध पथकाने आरोपी धोत्रे याला अटक करून आणले आहे, असे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.
धोत्रे याच्यावर पारस मुथा याला दांडक्याने मारहाण करून जखमी केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. तसेच, पतसंस्थेत जाऊन कागदपत्रे जाळण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पारस संतोष मुथा (वय २४, रा. अष्टविनायक अपार्टमेंट, प्लॅट नं. ११, मार्केट यार्डसमोर, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी गणेश धोत्रे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी धोत्रे हा मुथा यांच्या भिगवण रस्त्यावरील अरिहंत फर्निचर या दुकानात शिरला. तुझ्या वडिलांना फोन लाव, असे म्हणून आरोपी धोत्रे याने मागील भांडण्याच्या कारणावरून फिर्यादी मुथा यास डोक्यात, पायावर, पाठीवर मारहाण केली. यामध्ये डाव्या हाताचे हाड फॅ्रक्चर होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी आरोपी धोत्रे याच्यावर बालाजी नागरी पतसंस्थेचे कागदपत्रे जाळण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्मचारी राजेंद्र श्रीरंग घनवट (रा. शिरवली, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी गणेश धोत्रे हा मंगळवारी दुपारी १ वाजता पतसंस्थेत गेला. फिर्यादी घनवट, तसेच इतर कर्मचाऱ्यांना ‘मला कर्ज देत नाही’ असे म्हणून पिशवीमध्ये आणलेली रॉकेलची बाटली टेबलावर टाकली. तसेच, रॉकेल इतर कागदपत्रांवर टाकून आग लावण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखल्याने अनर्थ टळला, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दोन घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर करीत आहेत.

Web Title: The businessman's son was beaten by a rowdy racket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.