बाबरी मशिदीचा बदला घेण्यासाठी 1993 साली मुंबईत घडवले बॉम्बस्फोट

By Admin | Published: June 16, 2017 12:36 PM2017-06-16T12:36:20+5:302017-06-16T14:06:52+5:30

मुंबई 1993 बॉम्बस्फोटा प्रकरणी अबू सालेम, मुस्तफा डोसा, ताहीर मर्चंट, करीमुल्ला खान, फिरोझ अब्दुल राशिद खान यांना दोषी ठरवले.

Bomb blast in Mumbai in 1993, for the revenge of the Babri Masjid | बाबरी मशिदीचा बदला घेण्यासाठी 1993 साली मुंबईत घडवले बॉम्बस्फोट

बाबरी मशिदीचा बदला घेण्यासाठी 1993 साली मुंबईत घडवले बॉम्बस्फोट

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 16 - मुंबई शहराला हादरवून सोडणा-या 1993 सालच्या साखळी बॉम्बस्फोट मालिका प्रकरणी विशेष टाडा न्यायालयाने शुक्रवारी अबू सालेम, मुस्तफा डोसा, ताहीर मर्चंट, करीमुल्ला खान, फिरोझ अब्दुल राशिद खान यांना दोषी ठरवले. गुन्हेगारी कट रचणे आणि दहशतवादी कारवायांसाठी सालेमला न्यायालयाने दोषी ठरवले. शस्त्रास्त्र कायद्याखालीही न्यायालयाने त्याला दोषी ठरवले. सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने अब्दुल कय्यूमची सुटका केली. त्याची तात्काळ मुक्ततता करण्याचे न्यायालयाने आदेश दिले. 
 
सालेमने गुजरातला जाऊन नऊ एके-56 रायफल्स आणि 100 ग्रेनेडस घेतले. जानेवारी 1993 मध्ये अभिनेता संजय दत्त, झैबुनीसा काझीच्या घरी ही शस्त्रास्त्र उतरवण्यात आली होती. अनिस इब्राहिमच्या इशा-यावरुन ही शस्त्रास्त्रे या दोघांकडे ठेवण्यात आली होती. अबू सालेमला त्याच्या कृत्यासाठी फाशीची शिक्षा होऊ शकते पण पोर्तुगालकडून फाशीची शिक्षा न देण्याच्या अटीवर त्याचे प्रत्यर्पण झाले आहे. 
 
हवाला ऑपरेटर राहिलेल्या ताहीर मर्चंटलाही न्यायालयाने कट रचल्या प्रकरणी दोषी धरले. हल्ल्यासाठी ज्यांना प्रशिक्षित करण्यात आले त्यांच्यासाठी मर्चंटच्या दुबईमधील घराचा वापर झाल्याचे न्यायालयाने आपल्या निकाल वाचनात सांगितले. 
 
न्यायालयाने कट रचल्या प्रकरणी मुस्तफा डोसाला दोषी ठरवले आहे. कट रचण्यासाठी दुबईत झालेल्या बैठकीला मुस्तफा त्याचा भाऊ मोहम्मद डोसा आणि दाऊद इब्राहिमसह उपस्थित होता असे न्यायाधीशांनी सांगितले. शस्त्रास्त्र उतरवण्यासाठी मुस्तफा डोसाने मदत केल्याचेही सिद्ध झाले आहे.कोर्टामध्ये सर्व आरोपी त्यांच्यासाठी खास बनवण्यात आलेल्या बेंचवर शेवटच्या रांगेत बसले होते. निकालापूर्वी डोसाने आपण तणावामध्ये असल्याचे सांगितले. 
 
 
२०१३ मध्ये अबू सालेमवरील काही आरोप वगळण्यात आले. कारण सीबीआयने हे आरोप भारत व पोर्तुगालच्या प्रत्यार्पण करारात बसत नसल्याचे म्हणत विशेष न्यायालयाकडे अर्ज केला होता. या संपूर्ण खटल्यात न्यायालयाने ७५० साक्षीदारांची साक्ष नोंदवली, तर ५० बचावपक्षाच्या साक्षीदारांचीही साक्ष नोंदवली. सालेमने त्याचा गुन्हा सीबीआय चौकशीत कबूल केला आहे. २००७ मध्ये या खटल्याला सुरुवात झाली होती. मात्र सालेम, डोसा आणि सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांमुळे खटल्यास विलंब झाला. खटल्याला २०१२ मध्ये सुरुवात झाली आणि मार्च २०१७ मध्ये खटला संपला.
 
हा खटला सुरू असतानाच सर्वोच्च न्यायालयाने बॉम्बस्फोटाचा सूत्रधार याकुब मेमन याला विशेष टाडा न्यायालयाने दिलेल्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. तसेच अन्य आरोपींच्या अपिलावरही निर्णय दिला.  त्यात बॉलीवूड अभिनेता संजय दत्तचाही समावेश आहे. संजय दत्तच्या शिक्षेत कपात करण्यात आली. मे २०१३ मध्ये संजय दत्तने विशेष टाडा कोर्टापुढे शरणागती पत्करली व त्यानंतर त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. याकुबने फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर सर्वोच्च न्यायालयालयात अनेक अर्ज केले. सर्वोच्च न्यायालयाने मध्यरात्री बसून त्याच्या अर्जावर निर्णय दिला आहे. अखेरीस ३० जुलै २०१५ रोजी त्याला फाशी देण्यात आली.

Web Title: Bomb blast in Mumbai in 1993, for the revenge of the Babri Masjid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.