जामखेड : संत तुकाराम महाराज प्रवचनातून माणुसकीचे दर्शन घडवीत होते. परंतु मनुवाद्यांना हे मान्य नव्हते. त्यांनी तुकाराम महाराज यांना इंद्रायणीत बुडवून मारले व ते विमानाने वैकुंठाला गेल्याचा खोटा इतिहास रचला. तशाच प्रकारे राज्यघटना मोडीत काढण्याचा प्रयत्न भाजपा व आरएसएस करीत आहेत, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.
जामखेड येथे विविध सामाजिक संघटनांच्या वतीने दोन दिवसीय राज्यस्तरीय भटके - विमुक्त अधिकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी या परिषदेचा समारोप झाला. या वेळी आंबेडकर बोलत होते.
आंबेडकर म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळूनही भटके-विमुक्त समाजाला न्याय मिळण्यासाठी पंधरा वर्षे लागली. इंग्रज गेले तरी त्यांची कृती कायम आहे. यापुढे समाजाला आपला हक्क पाहिजे असेल, तर आपण सत्तेत बसल्याशिवाय न्याय मिळणार नाही़ आज भटक्या-विमुक्त समाजाने जगण्याची साधने स्वत:च निर्माण केली पाहिजे. ब्रिटिशांनी निर्माण केलेला क्रिमिनल ट्राइब अ‍ॅक्ट रद्द करण्यासाठी मुंबईला मोर्चा काढला. त्यानंतर हा कायदा रद्दही झाला, परंतु सवयीने चोरी करणारा नवीन कायदा आणण्याचे काम सरकारमधील मंडळींनी केले. ब्रिटिश गेले, परंतु ती प्रवृत्ती मात्र आजही जागेवरच आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.