सर्व संघांना दूध दरवाढ लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:51 AM2017-07-25T00:51:13+5:302017-07-25T00:51:13+5:30

राजू शेट्टी : मुंबईतील बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Apply milk prices to all groups | सर्व संघांना दूध दरवाढ लागू करा

सर्व संघांना दूध दरवाढ लागू करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जयसिंगपूर : राज्य सरकारने दुधाची दरवाढ लागू केलेली दरवाढ फक्त कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील दूध संघच देत आहेत. इतर जिल्ह्यातील दूध संघ दरवाढ देण्यास टाळाटाळ करत असून, ही दरवाढ राज्यातील सगळ्याच दूध संघांना लागू करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी केली. शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील दूध संघाच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत खासदार शेट्टी यांनी ही मागणी केली. राज्यातील ३० दूध संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
खासदार शेट्टी म्हणाले, शेतकरी आंदोलनानंतर सरकारने राज्यात दुधाला तीन रुपये प्रतिलिटर दरवाढ केली. सरकारचा हा आदेश सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील दूध संघांनी मानलेला आहे. मात्र सातारासह बहुतांश जिल्ह्यांत दुधाच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. दुधाच्या पॅकिंगचा तसेच इतर खर्चात वाढ झाल्याचे कारण सांगून दुधाची दरवाढ करण्यास टाळाटाळ केली जात आहे. याचा फटका राज्यातील दूध उत्पादकांना बसत आहे. ही दरवाढ राज्यातील सर्वच दूध उत्पादक संघांना लागू करण्यात यावी. केंद्र सरकारकडे दूध पावडरला निर्यात अनुदान म्हणून १० टक्के देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी राज्य सरकारने त्वरीत पाठपुरावा करावा. राज्यात एकूण दुधापैकी १० टक्के दूध हे भेसळयुक्त असून यावर आळा घालण्याची गरज असल्याची खासदार शेट्टी यांनी मागणी केली. यावेळी अनेक दूध संघांनी दूध व्यवसायासंदर्भात येत असलेल्या अडचणी मांडल्या.
यावेळी आमदार अमल महाडिक, महानंदा दूध संघाचे माजी अध्यक्ष विनायकदादा पाटील, गोकुळ दूध संघाचे व्यवस्थापक डी. बी. घाणेकर, गिरीष चितळे, सोनाई दूधचे मोहन माने, विविध दूध संघांचे अध्यक्ष, खासगी दूध संघांचे मालक उपस्थित होते.


मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
मंत्री महादेव जानकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून सर्व उपाययोजनांचा प्रस्ताव सादर करेल. त्यावर या उपाययोजना अमलात आणल्या जातील. राज्यातील सर्वच दूध संघ एकाच ब्रँण्डखाली यावेत. जेणेकरून दुधाचा व्यवसाय सुरळीत पार पडेल. राज्यात दुधाचे मोठे मार्केट आहे. ते इतर राज्यांनी बळकावण्याऐवजी एकच ब्रॅण्ड करून दूध संघांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. दूध व्यवसायासाठी चढ-उतार निधीची तरतूद करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे खासदार शेट्टी यांनी सांगितले.

Web Title: Apply milk prices to all groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.