लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : आंतरजातीय विवाह केल्याचा राग वर्षभर मनात धरून नऊ महिन्यांच्या गर्भवती लेकीची हत्या करणाऱ्या जन्मदात्यास सोमवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी एकनाथ किसन कुंभारकर (४४) यास फाशीची शिक्षा सुनावली.
कुंभारकर यांनी २८ जून २०१३ रोजी रिक्षामध्ये विवाहित मुलगी प्रमिला हिची गळा आवळून हत्या केली होती. कामगारनगरमधील काशीनाथ कांबळे यांच्या कु टुंबातील दीपक कांबळे (२३) या तरुणाशी प्रमिलाचे प्रेमसंबंध जुळले होते. वणीच्या गडावर २०१२ मध्ये त्यांनी विवाह केला होता. विवाहानंतर सहा ते सात महिन्यांनंतर कुंभारकर याने मुलीच्या घरी येणे-जाणे सुरू केले. जावयासह सासरच्या लोकांचा विश्वास संपादन केला. प्रमिला नऊ महिन्यांची गर्भवती असताना प्रसुतीच्या काही दिवसांपूर्वीच त्याने पहाटे तिच्या सासरी जाऊन आजीची प्रकृती बिघडली आहे, असे खोटे सांगून प्रमिलाला सोबत घेतले. तिला रिक्षामधून निर्जन ठिकाणी फिरविले. सावरकरनगरमध्ये एका खासगी रुग्णालयासमोर रिक्षा थांबविली आणि रिक्षाचालकाला रुग्णालयातून मामाला बोलवायला सांगितले. रिक्षाचालक रुग्णालयाच्या दिशेने गेल्यानंतर कुंभारकरने प्रमिलाचा गळा आवळला. रिक्षाचालकाने हा प्रकार बघितला. प्रमिलाच्या तोंडातून फेस येत होता.
मात्र कुंभारकरने घटनेनंतर पलायन केले होते. न्यायालयाने एकूण दहा साक्षीदार तपासले. जिल्हा व सत्र न्यायाधीश सुचित्रा घोडके यांनी कुंभारकर यास फाशीची शिक्षा सुनावली.

प्रमिलाच्या हत्येच्या निषेधार्थ अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मोर्चा काढला होता. त्यानंतर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी ८ आॅगस्ट २०१३ रोजी नाशिकला परिषद घेतली होती. त्यानंतर आठवडाभराने लातूरमध्येही त्यांनी परिषद घेतली होती. दुर्दैवाने २० आॅगस्ट २०१३ रोजी दाभोलकरांचीच हत्या झाली. १३ एप्रिल २०१६ रोजी राज्य सरकारने सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा संमत केल्याने या लढ्याला यश आले.