अहमदनगर पुन्हा दुहेरी हत्याकांडाने हादरले, जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोघांची गोळ्या घालून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 13:29 IST2018-04-28T21:38:00+5:302018-04-30T13:29:04+5:30
केडगाव येथील शिवसैनिकांच्या हत्याकांडाची घटना ताजी असतानाच जामखेड येथे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांचे हत्याकांड घडल्यामुळे जिल्हा पुन्हा हादरुन गेला आहे. अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन जणांचा मृत्यू झाला.

अहमदनगर पुन्हा दुहेरी हत्याकांडाने हादरले, जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोघांची गोळ्या घालून हत्या
जामखेड (अहमदनगर) : केडगावातील शिवसैनिकांचे हत्याकांड प्रकरण ताजं असतानाच आता जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन तरुण कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आल्यानं जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. बीड रस्त्यावरील वामनभाऊ ट्रेडर्ससमोर शनिवारी संध्याकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश अंबादास राळेभात (वय 30 वर्ष) आणि कार्यकर्ता राकेश उर्फ रॉकी अर्जुन राळेभात अशी हत्या करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत.
योगेश राळेभात व राकेश राळेभात हे दोघे दुकानासमोर बसलेले असताना संध्याकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास दोन मोटारसायकलवरून तीन अज्ञात व्यक्ती तोंडाला रुमाल बांधून आले होते. त्यांनी गावठी कट्ट्यातून योगेश व राकेश यांच्यावर लागोपाठ 8 गोळ्या झाडल्या. त्यानंतर तीनही हल्लेखोर मोटारसायकलवरुन पसार झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांचे हत्याकांड घडल्यामुळे जिल्हा पुन्हा हादरुन गेला आहे.
दरम्यान, स्थानिकांनी दोघांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. परंतु वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे योगेश व राकेशला उपचाराअभावी अर्धा तास तसेच पडून होते. अर्ध्या तासाने वैद्यकीय अधीक्षक सी. व्ही. लामतुरे आल्यानंतर प्राथमिक उपचार करून जखमींना नगरच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री राम शिंदे जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नागरिकांचा संताप पाहून राम शिंदे यांनी तेथून काढता पाय घेतला.