मुंबई, दि. 13 - सोयाबीन आणि डाळीच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी अर्जेंटिना उत्सुक असल्याची माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे दिली. अर्जेंटिनाच्या कृषी व फलोत्पादनाचे राष्ट्रीय संचालक ओमर ओदारदा, अर्जेंटिनाचे कॉन्सुलेट जनरल आलेयंरो मेयेरे आणि कृषी खात्याचे सहसचिव जीजस सिल्व्हेरिया या त्रिसदस्यीय अर्जेंटिनीयन शिष्टमंडळाने मंत्रालयात कृषिमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी कृषिमंत्री बोलत होते.

कृषीमंत्री म्हणाले की,  कृषी तंत्रज्ञान क्षेत्रात अर्जेंटिनाने केलेली कामगिरी अतिशय प्रभावी असून, या तंत्रज्ञानाच्या मदतीने महाराष्ट्रातील कृषी व फलोत्पादन क्षेत्रात लक्षणीय बदल घडवून आणण्यासाठी अर्जेंटिनाशी कृषी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यास महाराष्ट्र शासन प्रयत्नशील असून अर्जेंटिनाने  देखील अशा प्रकारच्या सहकार्याची तयारी दर्शविली  आहे. कृषी प्रक्रिया उद्योगाला उभारी देण्यासाठी देखील या तंत्रज्ञानाचा मोठा फायदा महाराष्ट्राला होऊ शकेल.

अर्जेंटिनाला देखील दुग्धव्यवसाय, पोल्ट्री, मत्स्यव्यवसाय या क्षेत्रातील गुंतवणूकदारांची आवश्यकता असून भारतीय उद्योजकांनी अर्जेंटिनामध्ये गुंतवणूक करावी असे आवाहन ओमर ओदारदा यांनी यावेळी केले. कृषी क्षेत्रातील परस्पर सहकार्य वाढविण्यासाठी अर्जेंटिनामधील कृषी क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी अर्जेंटिना भेटीवर येण्याचे निमंत्रण देखील या शिष्टमंडळाने कृषिमंत्र्यांना दिले.