“जर कोणाच्या भाकरीवर टाच आणणार असाल तर...”; अभिनेता किरण मानेंसाठी मविआ नेते सरसावले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 09:36 AM2022-01-14T09:36:38+5:302022-01-14T09:37:13+5:30
अभिनेता किरण माने(Kiran Mane) यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेहमी चर्चेत असतात. परंतु किरण मानेंना मालिकेतून काढल्यानंतर त्यांचे चाहते आक्रमक झाले आहेत.
मुंबई – विविध राजकीय आणि सामजिक विषयांवर प्रखर भूमिका घेणारे अभिनेते किरण माने सध्या सोशल मीडियावर खुप चर्चेत आहेत. स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो या मालिकेतील विलास पाटील ही भूमिका त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर बिंबवली. मात्र आता किरण मानेंना या मालिकेतून बाहेर काढण्यात आल्याचं पुढे आलं आहे. आपण घेत असलेल्या राजकीय भूमिकांमुळेच मालिकेतून काढण्यात आल्याचा आरोप अभिनेता किरण माने यांनी केला आहे.
अभिनेता किरण माने(Kiran Mane) यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेहमी चर्चेत असतात. परंतु किरण मानेंना मालिकेतून काढल्यानंतर त्यांचे चाहते आक्रमक झाले आहेत. आय स्टँड विथ किरण माने या नावानं हॅशटॅग वापरत प्रेक्षकांनी किरण माने यांना पाठिंबा दर्शवला आहे. तर माने यांनीही फेसबुकवर पोस्ट करत “काट लो जुबान, आंसूओसे गाऊंगा... गाड दो, बीज हूँ मै, पेड बनही जाऊंगा” अशा शब्दात सूचक इशारा दिला आहे.
अभिनेता किरण माने यांना मालिकेतून तडकाफडकी काढल्यानंतर त्यावर राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. काँग्रेस नेते सचिन सावंत(Sachin Sawant) यांनी ट्विटरवरुन किरण मानेंना मालिकेतून काढल्याचा निषेध करत भाजपावर निशाणा साधला आहे. सावंत म्हणतात की, किरण माने या गुणी कलाकाराने सद्य राजकीय परिस्थितीबद्दल मत व्यक्त केले ते भाजपाला सहन झाले नाही. त्यामुळे दबाव आणून या कलाकाराला मालिकेतून काढले गेले. हा भाजपाचा सांस्कृतिक दहशतवाद आहे. भाजपा विरोधात बोलण्याची हिंमत कशी होते हा दंभ त्यामागे आहे असा आरोप त्यांनी केला आहे.
किरण माने या गुणी कलाकाराने सद्य राजकीय परिस्थितीबद्दल मत व्यक्त केले ते भाजपाला सहन झाले नाही त्यामुळे दबाव आणून या कलाकाराला मालिकेतून काढले गेले. हा भाजपाचा सांस्कृतिक दहशतवाद आहे. भाजपा विरोधात बोलण्याची हिंमत कशी होते हा दंभ त्यामागे आहे. #IStandWithKiranManepic.twitter.com/PE7Jn28si0
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) January 13, 2022
तर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड(Jitendra Awahad) यांनीही किरण मानेंच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे. स्टार प्रवाहावरील “मुलगी झाली हो” या मालिकेतील विलास पाटील पात्र साकारणाऱ्या किरण माने या अभिनेत्यास फुले, शाहु, आंबेडकर विचारांची कास धरुन सोशल मीडियावर लिहितो, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांबद्दल प्रश्न विचारतो म्हणून अचानक मालिकेतून काढून टाकले गेले. या महाराष्ट्रात दादा कोंडके, पु.ल.देशपांडे, निळु फुले या कलाकारांनी कधी टिका केली तरी त्यांच्या विचारांचा आदर करीत त्यांचा सन्मानच केला. याद राखा, हा महाराष्ट्र वैचारिक वारसा जोपासतो. तुमच्या विरोधात लिहिले म्हणून तुम्ही जर कोणाच्या भाकरीवर टाच आणणार असाल तर ते योग्य नाही असा इशाराच मंत्री आव्हाडांनी भाजपाला दिला आहे.
या महाराष्ट्रात दादा कोंडके, पु.ल.देशपांडे,निलु फुले या कलाकारांनी कधी टिका केली तरी त्यांच्या विचारांचा आदर करीत त्यांचा सन्मानच केला.
याद राखा,हा महाराष्ट्र वैचारीक वारसा जोपासत तुमच्या विरोधात लिहीले म्हणुन तुम्ही जर कोणाच्या भाकरीवर टाच आणणार असाल तर ते योग्य नाही— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 13, 2022