'त्या' नेत्यानं काँग्रेस प्रवेशाची ऑफर दिली होती, पण...; नितीन गडकरींनी सांगितला किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 03:42 PM2023-06-17T15:42:00+5:302023-06-17T15:43:24+5:30
नितीन गडकरी यांनी भाजपासाठी काम करण्याचे सुरुवातीचे दिवस आणि पक्षाच्या प्रवासाची आठवण सांगितली
मुंबई - केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेस प्रवेशाबाबतचा किस्सा लोकांसोबत शेअर केला आहे. एकदा एका मोठ्या नेत्याने नितीन गडकरींनाकाँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची ऑफर दिली होती. तेव्हा गडकरींनी काँग्रेसचा सदस्य होण्यापेक्षा एखाद्या विहिरीत उडी मारेन असं उत्तर दिले होते. काय होता हा किस्सा जाणून घेऊया.
भाजपा सरकारला देशात ९ वर्ष पूर्ण झाल्यात. या पार्श्वभूमीवर देशभरात ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गडकरींना असा दावा केला की, भाजपा सरकारने गेल्या ९ वर्षात काँग्रेसच्या ६० वर्षाच्या तुलनेत दुप्पट काम केली आहेत. काही दिवसांपूर्वी मी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर गेलो होतो तेव्हा तिथल्या लोकांना २०२४ च्या अखेरपर्यंत यूपीतील रस्ते अमेरिकेसारखे होतील असं आश्वासन दिल्याचे गडकरींनी सांगितले. गडकरींनी ९ वर्षात भाजपा सरकारने आणलेल्या योजनाही लोकांना सांगितल्या.
नितीन गडकरी यांनी भाजपासाठी काम करण्याचे सुरुवातीचे दिवस आणि पक्षाच्या प्रवासाची आठवण सांगितली. त्यात दिवंगत काँग्रेस नेते श्रीकांत जिचकर यांनी एक ऑफर दिल्याचाही उल्लेख केला. गडकरी म्हणाले की, एकदा जिचकर यांनी मला सांगितले, तुम्ही पक्षाचे खूप चांगले कार्यकर्ते आणि नेते आहात. जर तुम्ही काँग्रेसमध्ये आला तर तुमचे भविष्य उज्ज्वल आहे अशी ऑफर दिली. त्यावर मी काँग्रेसमध्ये सहभागी होण्याऐवजी विहिरीत उडी मारेन, मला भाजपा आणि त्याच्या विचारधारेवर विश्वास आहे. मी भाजपासाठीच काम करत राहीन असं प्रत्युत्तर जिचकर यांना दिले होते. आरएसएसच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतील कामाची गडकरींनी आठवण सांगितली.
दरम्यान, पक्ष बनल्यानंतर अनेकदा विखुरला आहे. आपल्याला देशाच्या लोकशाही इतिहासाचा विसर होता कामा नये. भविष्यासाठी भूतकाळापासून धडा घेतला पाहिजे. ६० वर्षाच्या शासन काळात काँग्रेसने गरिबी हटाओ नारा दिला परंतु त्या खासगी लाभासाठी अनेक शैक्षणिक संस्था उघडल्या. भारत सध्या आर्थिक महाशक्ती होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. देशाचे भविष्य खूप चांगले आहे असं म्हणत नितीन गडकरींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचेही कौतुक केले.