तिकोना डिजिटल नेटवर्कला २००० दंड

By Admin | Published: November 3, 2016 03:48 AM2016-11-03T03:48:09+5:302016-11-03T03:48:09+5:30

तिकोना डिजिटल नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने प्लानचे पैसे तसेच २ हजार दंड परत करण्याचे आदेश दिले आहेत.

2000 penalty for Tikona Digital Network | तिकोना डिजिटल नेटवर्कला २००० दंड

तिकोना डिजिटल नेटवर्कला २००० दंड

googlenewsNext


ठाणे : ग्राहकाला त्रुटीची इंटरनेट सुविधा देणाऱ्या तिकोना डिजिटल नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने प्लानचे पैसे तसेच २ हजार दंड परत करण्याचे आदेश दिले आहेत.
कल्याण येथे राहणारे पी.व्ही. सनी यांनी तिकोना डिजिटल नेटवर्क यांच्याकडून ३३०८ रुपयांचा इंटरनेट प्लान आॅगस्ट २०११ रोजी घेतला. त्यानंतर, २२ दिवस उशिराने सुविधा सुरू झाली. त्यानंतरही केवळ दोन दिवसच सुविधा सुरू राहिली. सनी यांनी अनेकदा तक्रार करूनही नेटवर्क कंपनीने कोणतीच कार्यवाही केली नाही. अखेर, त्यांनी रक्कम परत करण्याची विनंती केली. मात्र, तीसुद्धा परत न केल्याने सनी यांनी तिकोना डिजिटल नेटवर्कविरोधात मंचाकडे तक्रार दाखल केली. तर, रजिस्ट्रेशन फॉर्मच्या तरतुदीप्रमाणे इंटरनेट सुविधा बंद केल्यावर १ महिन्यात ग्राहकाने मोडेम परत करायला हवे होते. मात्र, तसे त्यांनी केले नाही. तसेच त्याची किंमत वजा करता त्यांना रक्कम दिली असता सनी यांनी ती नाकारली, असे सांगून नेटवर्क कंपनीने तक्रार फेटाळण्याची मागणी केली आहे.
कागदपत्रे, पुरावे यांची पडताळणी केली असता इंटरनेट सुविधा सनी यांनी घेतल्याची आणि ती खंडित केल्यावर त्याची रक्कम परत न दिल्याचे तिकोना नेटवर्कने मान्य केले आहे. ग्राहकाला सुविधा बंद करायची असल्यास मोडेमही परत मिळाल्यावर ३० दिवसांमध्ये रक्कम परत केली जाईल, अशी तरतूद आहे. त्यानुसार, त्यांनी ते परत केले नव्हते. मात्र, इंटरनेटची सुविधा देतेवेळी नेटवर्क कंपनीचे प्रतिनिधीच मोडेम तसेच इतर उपकरणे बसवतात. त्यानुसार, ग्राहकाकडून इंटरनेट सुविधा बंद करण्याची सूचना आल्यावर कंपनीच्याच प्रतिनिधीने ती उपकरणे घेऊन जाणे आवश्यक आहे. परंतु, कंपनीने ही जबाबदारी ग्राहकावर लादली आहे. तसेच सनी यांनी १५ सप्टेंबर २०११ रोजी मेलद्वारे मोडेम घेऊन जाण्याची विनंती केली होती. मात्र, त्यांच्या रक्कम परताव्याची मागणी दीर्घकाळ प्रलंबित ठेवून कंपनीने त्रुटीची सेवा दिली आहे, असे मंचाने स्पष्ट केले. त्यामुळे वापर आणि सर्व्हिस टॅक्स वजा जाता २९६१ रुपये आणि मानसिक, तक्रार खर्च म्हणून २ हजार सनी यांना द्यावे, असे आदेश मंचाने तिकोना नेटवर्कला दिले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: 2000 penalty for Tikona Digital Network

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.